For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

देवगडच्या समुद्रात बेकायदा मासेमारी करणारी कर्नाटकची ‘सुलतान’ नौका जप्त

10:29 AM Nov 03, 2026 IST | Tarun Bharat Portal
देवगडच्या समुद्रात बेकायदा मासेमारी करणारी कर्नाटकची ‘सुलतान’ नौका जप्त
Advertisement
देवगड : महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत विनापरवाना मासेमारी करणाऱ्या कर्नाटकातील ‘सुलतान’ या ट्रॉलर नौकेवर मत्स्यव्यवसाय विभागाने कारवाई करत ती जप्त केली. सोमवारी रात्री मुणगे परिसरातील समुद्रात सुरू झालेली कारवाई देवगड किनाऱ्याजवळ यशस्वी झाली. गस्ती नौकेला पाहून पळण्याचा प्रयत्न करणाऱ्या ट्रॉलरचा पाठलाग करून अधिकाऱ्यांनी तिला ताब्यात घेतले.

मुणगे किनाऱ्यापासून सुमारे पाच ते सहा नॉटिकल मैल अंतरावर ही नौका ट्रॉलिंग पद्धतीने मासेमारी करत असल्याचे गस्ती पथकाच्या निदर्शनास आले. ‘सुलतान’ (IND-KA-02-MM-6335) या नौकेचा परवाना केवळ विशेष आर्थिक क्षेत्रासाठी (EEZ) वैध असल्याचे तपासात स्पष्ट झाले. नौकेवर तांडेलसह सात खलाशी होते. पकडण्यात आलेली नौका देवगड बंदरात आणण्यात आली असून महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियमांतर्गत पुढील कारवाई सुरू आहे.

Advertisement

तिसऱ्या प्रयत्नात कारवाईला यश

मलपी बंदरातील नौकांकडून स्थानिक मच्छिमारांच्या जाळ्यांचे नुकसान होत असल्याच्या तक्रारी सातत्याने येत होत्या. त्यानंतर मत्स्यव्यवसाय विभागाने संबंधित भागातील गस्त वाढवली होती. मागील पाच दिवसांत दोनदा संशयित नौकांचा पाठलाग करण्यात आला होता; मात्र वेगवान ट्रॉलर निसटण्यात यशस्वी झाले. अखेर तिसऱ्या प्रयत्नात ‘सुलतान’ नौका पकडण्यात पथकाला यश आले.

‘शीतल’ गस्ती नौकेद्वारे धडक मोहीम

मत्स्यव्यवसाय मंत्री नीतेश राणे यांच्या कठोर भूमिकेमुळे बेकायदा मासेमारीविरोधातील कारवाईला गती मिळाल्याचे सांगण्यात येत आहे. सहाय्यक आयुक्त सागर कुवेसकर यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलबजावणी अधिकारी प्रतीक महाडवाला आणि किरण वाघमारे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ‘शीतल’ गस्ती नौकेच्या मदतीने ही कारवाई केली. सागरी सुरक्षा कर्मचाऱ्यांचेही या मोहिमेत सहकार्य लाभले.

Advertisement

परराज्यातील नौकेवर झालेल्या या कारवाईमुळे स्थानिक मच्छिमारांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत बेकायदा मासेमारी करणाऱ्या नौकांविरोधात कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचे मत्स्यव्यवसाय विभागाने स्पष्ट केले आहे.

Advertisement
Tags :

.