ऑक्टोबरमध्येच देवगड हापूसची वाशी मार्केटमध्ये एन्ट्री; दोन बागायतदारांनी पाठविल्या पहिल्या पेट्या; दराबाबत उत्सुकता
गिर्ये-रामेश्वर येथील प्रगतशील आंबा बागायतदार मिलेश वसंत बांदकर यांनी साडेसहा डझन आंब्यांची पेटी वाशी बाजारपेठेकडे पाठवली आहे. तर वाडातर येथील आंबा उत्पादक वीरेंद्र दत्तात्रय कांबळी यांनी सहा डझन हापूस आंब्यांची पेटी बाजारपेठेत रवाना केली आहे. एकाच दिवशी देवगड तालुक्यातील दोन वेगवेगळ्या भागांतून हापूसच्या पेट्या वाशी मार्केटमध्ये दाखल होण्यासाठी रवाना झाल्याने यंदाच्या हंगामाची चाहूल ऑक्टोबरमध्येच लागली आहे.
संकष्टीच्या मुहूर्तावर मिलेश बांदकर यांची पहिली पेटी
गिर्ये-रामेश्वर येथील मिलेश बांदकर यांनी संकष्टीच्या मुहूर्तावर आपल्या बागेतील साडेसहा डझन हापूस आंब्यांची पहिली पेटी वाशी मार्केटकडे पाठवली. जनार्दन अँड कंपनी (जेएसी) या फर्ममार्फत 30 ऑक्टोबर रोजी या आंब्यांची विक्री होणार आहे. विशेष म्हणजे, दोन वर्षांपूर्वीही त्यांनी नोव्हेंबर महिन्यात हापूस आंब्याची पेटी वाशी बाजारपेठेत पाठविण्याचा प्रयोग केला होता. यंदा मात्र ऑक्टोबर महिन्यातच उत्पादन घेण्यात त्यांना यश आले आहे.
जूनमधील मोहोराचे केले विशेष संगोपन
मिलेश बांदकर यांच्या बागेतील काही आंबा कलमांना जून महिन्यातच मोहोर आला होता. या मोहोराचे योग्य संगोपन करून फळधारणा साधण्यासाठी त्यांनी विशेष मेहनत घेतली. मोहोर आलेल्या चार ते पाच कलमांना प्लास्टिक कागदाचे आवरण घालून संरक्षण देण्यात आले. त्याचबरोबर वेळोवेळी आवश्यक फवारण्या करून मोहोर आणि फळांची काळजी घेण्यात आली.
प्रतिकूल परिस्थितीतही सातत्यपूर्ण देखभाल, योग्य नियोजन आणि मेहनतीच्या जोरावर ऑक्टोबर महिन्यातच हापूसचे उत्पादन घेणे शक्य झाले. पहिल्या पेटीनंतरही त्यांनी हा प्रयोग सुरू ठेवला असून, दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर पाच डझन क्षमतेच्या आणखी सहा ते सात पेट्या बाजारपेठेत पाठविण्याचे नियोजन केले आहे.
मिलेश बांदकर हे आपले बंधू विद्याधर बांदकर यांच्यासोबत आंबा व्यवसाय करतात. बागेचे व्यवस्थापन, मोहोराचे संगोपन आणि उत्पादनाचे नियोजन यामध्ये वडील आणि भावाची मोलाची साथ मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
वीरेंद्र कांबळी यांचीही वाशी बाजारपेठेत आंब्याची पेटी
वाडातर येथील आंबा बागायतदार वीरेंद्र दत्तात्रय कांबळी यांनीही गुरुवारी सहा डझन हापूस आंब्यांची पहिली पेटी वाशी मार्केटकडे रवाना केली. शहा अँड बाटे या फर्ममार्फत त्यांनी ही पेटी पाठवली आहे. नियमित हंगाम सुरू होण्यापूर्वीच दोन्ही बागायतदारांनी बाजारपेठेत हापूस पाठविल्याने देवगडच्या आंबा उत्पादकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
पहिल्या पेटीला किती दर मिळणार?
देवगड हापूस हा आपल्या वैशिष्ट्यपूर्ण चवीसाठी, सुगंधासाठी आणि उत्तम दर्जासाठी देशभर प्रसिद्ध आहे. दरवर्षी उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणावर बाजारपेठेत दाखल होणाऱ्या या आंब्याचे ऑक्टोबर महिन्यातच आगमन झाल्याने पहिल्या पेट्यांना किती दर मिळणार, याकडे व्यापारी आणि आंबा उत्पादकांचे लक्ष लागले आहे.
हंगामापूर्वी बाजारात दाखल होणाऱ्या हापूसला चांगला दर मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मात्र, प्रत्यक्ष विक्री झाल्यानंतरच दराचे चित्र स्पष्ट होणार आहे. ऑक्टोबर महिन्यातच देवगड हापूसची वाशी बाजारपेठेत झालेली एन्ट्री ही आंबा उत्पादकांच्या प्रयोगशीलतेची आणि नियोजनबद्ध शेतीची प्रचिती देणारी ठरली आहे.
