For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

देवगड किल्ल्याच्या ऐतिहासिक खंदकात साकारणार नयनरम्य उद्यान; 1 कोटींचा निधी मंजूर; पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत भूमिपूजन

05:39 PM Oct 30, 2026 IST | Tarun Bharat Portal
देवगड किल्ल्याच्या ऐतिहासिक खंदकात साकारणार नयनरम्य उद्यान  1 कोटींचा निधी मंजूर  पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत भूमिपूजन
Advertisement
देवगड / प्रतिनिधी : ऐतिहासिक देवगड किल्ल्याच्या पर्यटन विकासात आणखी एक महत्त्वपूर्ण भर पडणार आहे. किल्ल्याच्या ऐतिहासिक खंदकात नयनरम्य उद्यान साकारण्यात येणार असून, या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे भूमिपूजन पालकमंत्री तथा मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून या प्रकल्पासाठी सुमारे एक कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

ऐतिहासिक वारसा, निसर्गसौंदर्य आणि समुद्राचे विहंगम दर्शन यांचा अनोखा संगम या उद्यानाच्या माध्यमातून पर्यटकांना अनुभवता येणार आहे. देवगड किल्ल्याच्या ऐतिहासिक महत्त्वाला आधुनिक पर्यटन सुविधांची जोड मिळणार असल्याने हे उद्यान पर्यटकांसाठी नवे आकर्षण ठरण्याची अपेक्षा आहे.

Advertisement

या प्रकल्पामुळे देवगडच्या पर्यटन विकासाला चालना मिळण्यासोबतच स्थानिक नागरिकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होणार आहेत. पर्यटनपूरक व्यवसाय, स्थानिक दुकानदार आणि अन्य व्यावसायिकांनाही याचा फायदा होण्याची शक्यता आहे. देवगडचा ऐतिहासिक वारसा जपत परिसराचा पर्यटनदृष्ट्या विकास करण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वाचा मानला जात आहे.

भूमिपूजन सोहळ्यावेळी माजी आमदार अजित गोगटे, नंदकुमार घाटे, सभापती गणेश राणे, उपसभापती अमोल लोके, नगराध्यक्षा साक्षी प्रभू, मुख्याधिकारी हरिदत्त माने, महिला व बालकल्याण सभापती अनुराधा नारकर, उपनगराध्यक्षा मिताली सावंत, गटनेते शरद ठूकरूल, स्वच्छता व आरोग्य सभापती बुवा तारी, माजी नगराध्यक्ष योगेश चांदोसकर, वैभव करंगुटकर, दयानंद पाटील, भाजप जिल्हा उपाध्यक्ष बाळा खडपे, तालुकाध्यक्ष राजा भुजबळ, अभियंता अभिजित कामत, उल्हास मणचेकर, प्रकाश राणे, डॉ. सुनील आठवले आदी उपस्थित होते.

Advertisement

देवगड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संतोष उगलमुगले, सार्वजनिक बांधकाम मंडळाचे अधीक्षक अभियंता तथा सिंधुदुर्ग कार्यकारी अभियंता दिनेश कुमार बागुल, सार्वजनिक बांधकाम विभाग देवगडचे उपविभागीय अभियंता शैलेश मोरजकर आणि कनिष्ठ अभियंता अविनाश पवार यांचीही उपस्थिती होती.

या उद्यानाच्या निर्मितीमुळे देवगड किल्ल्याच्या पर्यटन आकर्षणात भर पडून ऐतिहासिक वारसा आणि निसर्गसौंदर्य अनुभवण्यासाठी पर्यटकांना नवे ठिकाण उपलब्ध होणार आहे.

Advertisement
Tags :

.