वर्षा बंगल्यावर मध्यरात्री खलबतं; जरांगेंच्या कुणबी प्रमाणपत्राच्या मागणीवर सरकारची उच्चस्तरीय बैठक
मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालन्यातील अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू असून आंदोलनाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. उपोषणाच्या ११व्या दिवशी जरांगे पाटील यांची प्रकृती खालावल्याची माहिती समोर आल्याने राज्य सरकारची चिंता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी सोमवारी मध्यरात्री उच्चस्तरीय बैठक पार पडली.
मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या मागणीसह आंदोलनातील विविध मुद्द्यांवर या बैठकीत सविस्तर चर्चा झाल्याची माहिती आहे. जरांगे पाटील यांच्या मागण्यांवर सरकारने कोणती भूमिका घ्यावी, आंदोलनावर तोडगा कसा काढता येईल आणि पुढील काळात कायदेशीर व प्रशासकीय पातळीवर कोणती पावले उचलता येतील, याबाबत बैठकीत विचारविनिमय झाल्याचे समजते.
दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून एकीकडे जरांगे पाटील यांचे आंदोलन सुरू असतानाच दुसरीकडे ओबीसी समाजाकडूनही विविध आंदोलने आणि भूमिका मांडल्या जात आहेत. त्यामुळे सरकारसमोर मराठा आणि ओबीसी या दोन्ही समाजांच्या मागण्यांमध्ये समतोल साधण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे.
जरांगे पाटील यांच्या प्रकृतीची स्थिती आणि आंदोलनाची पुढील दिशा याकडेही सरकारचे लक्ष आहे. त्यांच्या मागण्यांवर तातडीने तोडगा निघाला नाही तर आंदोलन आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या पार्श्वभूमीवर ‘वर्षा’वरील मध्यरात्रीच्या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. सरकारकडून पुढील काही दिवसांत कोणता निर्णय घेतला जातो आणि जरांगे पाटील यांच्या मागण्यांवर काय तोडगा काढला जातो, याकडे मराठा समाजासह संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.