For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मुख्यमंत्रिपदासाठी फडणवीस यांचे नाव आघाडीवर

06:41 AM Nov 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
मुख्यमंत्रिपदासाठी फडणवीस यांचे नाव आघाडीवर
Advertisement

भाजप संसदीय मंडळाकडून शिक्कामोर्तब : मंत्रिमंडळ निवडीच्या हालचालींना वेग

Advertisement

प्रतिनिधी /मुंबई

राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा धुव्वा उडवत महायुतीने जोरदार मुसंडी मारली. सत्तास्थापनेसाठी महायुतीकडून वेगवान हालचाली सुरू झाल्या असून राज्यात नवे सरकार केंव्हाही स्थापन होऊ शकते. दरम्यान, महायुतीत सर्वाधिक जागा भाजपला मिळाल्याने देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री बनतील अशी चर्चा आहे. मुख्यमंत्रिपदाची माळ त्यांच्याच गळ्यात पडणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. भाजपच्या केंद्रीय नेतृत्त्वाने मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला मंजुरी दिली असून, शिवसेना आणि राष्ट्रवादीनेही या निर्णयला होकार दिला आहे.

Advertisement

विधानसभा निवडणुकीत मोदी लाटेपेक्षाही जास्त जागा जिंकत भगव्या वादळात विरोधकांचे मनसुबे धुळीस मिळवणाऱ्या भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्रिपदी नियुक्ती करण्यावर भाजप संसदीय मंडळाने शिक्कामोर्तब केले आहे. मुख्यमंत्रिपदाबाबत आमच्यात कोणताही वाद नाही, असे म्हणणाऱ्या महायुतीच्या नेत्यांनी स्पष्ट बहुमत मिळविल्यानंतर मात्र मुख्यमंत्रिपदासाठी भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी या तिन्ही घटकपक्षांनी दावा करायला सुऊवात केली आहे.

महायुतीमध्ये मुख्यमंत्रिपदाबाबत कोणताही फॉर्म्युला ठरविण्यात आला नव्हता. ज्यामुळे निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळूनसुद्धा महायुतीकडून अद्यापही मुख्यमंत्रिपदासाठीचे नाव निश्चित करण्यात येत नाही. पण दिल्लीतून मात्र मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. ज्यांच्या जास्त जागा त्यांना मुख्यमंत्रिपद या सूत्राप्रमाणे भाजप स्वत:कडेच मुख्यमंत्रिपद ठेवणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. या निवडणुकीत भाजपने 132 जागांचा विक्रमी आकडा गाठला आहे. 2014 मध्ये मोदी लाट असतानाही भाजपने 122 जागाच जिंकल्या होत्या. त्यानंतर 2019 ही संख्या खाली येत भाजपचे 105 उमेदवार निवडून आले. पण 2024 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने 132 जागा जिंकत मोदी लाटेचा रेकॉर्डही मोडला.

बिहार मॉडेलचा विचार नाही

गुंतागुंतीची परिस्थिती असती तर भाजपने अनेक पर्यायांचा विचार केला असता. 2022 मध्ये शिवसेनेत बंड झाले. त्यावेळी भाजपकडे 105 जागा असतानाही 40 आमदार असणाऱ्या एकनाथ शिंदे यांना भाजपने मुख्यमंत्रिपद दिले. बिहारमध्ये विधानसभेचे 243 सदस्य आहेत. त्यापैकी एनडीएचे 137 आमदार आहेत. त्यात बीजेपी आमदारांची संख्या 80 आहे. मात्र 45 आमदार असणाऱ्या जनता दल युनायटेडच्या नितेश कुमार यांना मुख्यमंत्रिपद देण्यात आले. मग महाराष्ट्रात अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात एकनाथ शिंदे यांनी विकासकामांचे अनेक धाडसी निर्णय घेतल्याने महायुतीला घरघोस मतदान झाले. त्यामुळे भाजपपेक्षा कमी जागा आल्या असल्या तरी महाराष्ट्रात बिहार मॉडेल राबवावा, अशी मागणी शिंदे सेनेची आहे. मात्र भाजपने त्या मागणीवर विचार केलेला नाही. भाजपने हा युक्तिवाद फेटाळून लावला आहे. त्या निवडणुकीपूर्वीच नितीश कुमार यांना मुख्यमंत्रिपद देण्याचे ठरले होते, पण महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांना तसा शब्द देण्यात आला नव्हता, असे भाजपने स्पष्ट केल्याचे सांगण्यात येत आहे.

एकनाथ शिंदे यांच्या नेतफत्वाखाली महायुतीने विधानसभा निवडणूक लढविली आहे. आता एवढे यश मिळाल्यानंतर त्यांना लगेच या पदावरून बाजूला करणे योग्य ठरणार नाही. त्यामुळे त्यांना किमान एक वर्ष मुख्यमंत्रिपद द्यावे, असे शिंदे गटाचे म्हणणे आहे. मात्र भाजपने त्याच्याशी सहमती दर्शवली नसल्याचे सांगण्यात येत आहे.

एकनाथ शिंदे यांच्यापुढे दोन पर्याय

भाजपने एकनाथ शिंदे यांच्यासमोर दोन पर्याय ठेवले असल्याचे सांगण्यात येत आहे. शिंदे यांना पेंद्रीय मंत्रिमंडळात एखाद्या खात्याची जबाबदारी देऊन त्यांचा मुलगा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना उपमुख्यमंत्री करायचे किंवा एकनाथ शिंदे यांनी फडणवीस यांच्याप्रमाणे यावेळी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावे, अशी ऑफर भाजपने दिल्याचेही सांगण्यात येत आहे.

रामदास आठवलेंना टोला

देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री बनवले पाहिजे. एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत आले पाहिजे, असे विधान पेंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केले आहे. यावर संजय शिरसाट म्हणाले की, आम्ही काय करायचे ते आम्हाला रामदास आठवलेंनी सांगू नये. ते असे का म्हणाले ते माहीत नाही. यात त्यांचा काही रोल नाही तरी ते बोलतात, असे शिरसाट म्हणाले.

उदय सामंत यांचे विरोधकांना आव्हान

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत, अशी भूमिका उदय सामंत यांनी मांडली आहे. विरोधक एकनाथ शिंदे यांच्या विरोधात दावे करत आहेत. पण त्यांच्या दाव्यात दम नाही. त्यांनी आपला विरोधी पक्षनेता निवडून दाखवावा. आम्हाला सल्ला देण्याची आवश्यकता नाही. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत ही सर्वांची इच्छा आहे. अद्याप मुख्यमंत्रिपदावर शिक्कामोर्तब झालेले नाही. अडीच वर्ष राज्याच्या विकासाची आम्ही कामे केली आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री व्हावे असे आम्हाला वाटते, असे सामंत म्हणाले.

Advertisement
Tags :

.