Political News: 8 तासांच्या 3 शिफ्ट, प्राईमटाईमची ड्युटी अन् राजकारणाचे स्टेअरिंग मात्र फडणवीसांकडेच...
‘राज्याचे स्टेअरिंग आमच्या हातात आहे आणि आम्ही तिघे 8-8 तास शिफ्ट करतो.’
By : संतोष पाटील
कोल्हापूर : हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या अंतिम टप्प्याचे उद्घाटन झाल्यानंतर 76 किलोमीटरच्या रस्त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गाडीचे स्टेअरिंग उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हातात घेतले. दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार मात्र येता-जाता मागील सीटवर बसून होते. राज्यातील राज्यकारणाची स्थिती सांगणारीच ही घटना होती.
आठ-आठ शिफ्टमध्ये तिघेजण काम करत असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले असले तरी कोणी गडबड केलीच तर अडचणी वाढतील, असा संदेशही त्यांनी अनेक उदाहरणातून आजवर दिला आहे. आठ तासांच्या तीन शिफ्टमधील प्राईमटाईमची ड्युटी फडणवीस यांच्याकडेच असून बाजूला आणि मागेपुढे कोणीही असले तरी राजकारणाच्या स्टेअरिंगवर आपलीच पकड मजबूत असल्याचे जणू स्पष्ट संकेतच दिले.
समृध्दी महामार्गाने महाराष्ट्राच्या पायाभूत सुविधांना नवा आयाम मिळाला आहे. उद्घाटन कार्यक्रमातील नेत्यांच्या कृती आणि भाषणातून महायुतीतील अंतर्गत स्पर्धेचे आणि सत्तेच्या समीकरणाचे सूचक संकेत पुढे आणले आहेत. इगतपुरी येथे 5 जून रोजी झालेल्या या सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्घाटन केले.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासह वरिष्ठ नेते उपस्थित होते. या महामार्गाने नागपूर ते मुंबईचा प्रवास अवघ्या आठ तासात शक्य होणार आहे. मुख्यमंत्री पदाची पहिल्यांदा धुरा सांभाळल्यानंतर फडणवीस यांनी हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला होता. फडणवीस यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट होता.
प्रोजेक्ट पूर्ण होईपर्यंत राज्याने तीन-तीन वेळा सत्तांतरं पाहिली. प्रकल्पाची पायाभरणी आणि शेवटच्या टप्प्यातील उद्घाटन मुख्यमंत्री म्हणून करत असल्याचा विशेष आनंद देवेंद्र फडणवीस यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट जाणवणारा होता. उद्घाटन झाल्यानंतर या रस्त्यावऊन देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी गाडीतून सवारी करत आनंद लुटला.
आलटून पालटून गाडीचे स्टेअरिंग दोघांकडे राहिले. अजित पवार मागील सीटवर बसून होते. योगायोगाने का असेना हा घडलेला किस्सा राज्यातील राजकारणाकडे अंगुलीनिर्देष करणारा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी हलक्या-फुलक्या शब्दात म्हटले, ‘राज्याचे स्टेअरिंग आमच्या हातात आहे आणि आम्ही तिघे आठ-आठ तास शिफ्ट करतो.’ ही कृती महायुतीतील सत्तेच्या वाटणीवरून सुरू असलेल्या चर्चेचा आणि प्रत्येक नेत्याच्या आकांक्षेचा एक प्रतिकात्मक खेळ आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी महामार्गाला ‘महाराष्ट्राच्या समृद्धीचा मार्ग’ आणि त्यांचे स्वप्न असे संबोधले. त्यांनी या प्रकल्पाला त्यांच्या नेतृत्वाशी जोडले. त्यांनी पुढील शक्तिपीठ महामार्गाच्या नियोजनाचा उल्लेख करून मराठवाड्याला नवीन उभारी देण्याचे वचन दिले. दुसरीकडे शिंदे यांनी महामार्गाला पर्यावरणस्नेही आणि शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असे संबोधले. त्यांचे हे वक्तव्य त्यांच्या सध्याच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळातील कामगिरीवर आधारित आहे.
यातून त्यांनी महायुतीच्या विजयात आपली महत्त्वपूर्ण भूमिका अधोरेखित केली. अजित पवार यांनी पर्यावरण दिनाच्या निमित्ताने 10 कोटी झाडे लावण्याचे लक्ष्य जाहीर करून आपल्या राजकीय अनुभवाचा आणि नवीन प्रकल्पांना गती देण्याच्या क्षमतेचा प्रत्यक्षपणे उल्लेख केला. हे वक्तव्य त्यांच्या सत्तेत समतोल राखण्याच्या आणि आर्थिक प्रगतीसाठी योगदान देण्याच्या इच्छेचे द्योतक आहे.
पवार यांनी महामार्गाला आर्थिक प्रगतीचा पाया म्हणून संबोधले. ज्याने त्यांनी आपल्या अर्थमंत्रीपदाच्या काळातील योगदानाची आठवण करून दिली. पुढील सत्तेत महत्त्वपूर्ण भूमिका मिळवण्याचा प्रयत्न अधोरेखित केला. महायुतीतील अंतर्गत स्पर्धा ही 2024 च्या विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर अधिक तीव्र झाली आहे. या उद्घाटनातील तिघांच्या सहभागाने वैचारिक मतभेद विसरून विकासावर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न दिसतो.
फडणवीस यांनी आम्ही तिघे शिफ्ट करतो हा संदर्भ महायुतीतील समन्वयाचे प्रदर्शन घडवणारा असला, तरी त्यांचे स्टेअरिंग हाती घेणे हे त्यांच्या नेतृत्वावर नियंत्रण असल्याकडे लक्ष वेधते. शिंदे यांचे गाडी चालवणे हे त्यांच्या सध्याच्या सत्तेच्या दाव्याचे सूचक म्हणावे लागेल. तरपवार यांचे मागील शीटवर बसणे हे प्रभावी भूमिकेचे द्योतक आहे. सत्तेच्या समीकरणांचा प्रतीकात्मक खेळ उद्घाटन सोहळ्यातील गाडी चालवण्याच्या या कृतीने महायुतीतील नेत्यांमधील अंतर्गत स्पर्धा आणि समन्वय यांचे सूक्ष्म राजकीय संकेत मिळतात.
भविष्याचे संकेत
समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनाने महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा मिळाली असली, तरी या कार्यक्रमातील गाडी चालवण्याची कृती आणि भाषणातील संदर्भांनी महायुतीतील अंतर्गत स्पर्धेचे आणि सत्तेच्या समीकरणांचे नवे पर्व दाखवले आहे. फडणवीस, शिंदे आणि पवार यांनी एकत्रित काम करण्याचा निर्धार दाखवला असला, तरी त्यांच्या कृतींमधील सूचकता हे दर्शवते की सत्तेची लढाई अद्याप संपलेली नाही. या तिघांमधील समन्वय कायम राहील की सत्तेच्या आकांक्षेने नवीन राजकीय समीकरणे उदयास येतील, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.