आजपासून पुन्हा देवेंद्रपर्व सुरू
आज घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ : भाजपच्या गटनेतेपदी एकमताने निवड
प्रतिनिधी/ मुंबई
भाजपच्या विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची बुधवारी निवड झाली. राज्याच्या मुख्यमंत्रिपदी ते विराजमान होण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. त्यामुळे ‘मी परत येईन, मी परत येईन’ असे 2019 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठ्या आत्मविश्वासाने सांगणारे देवेंद्र फडणवीस अखेर मुख्यमंत्री होणार आहेत. भाजपच्या कोअर कमिटीची बुधवारी बैठक होऊन एकमताने फडणवीस यांच्या नावाला मंजुरी मिळाली. या बैठकीसाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी हे निरीक्षक होते. फडणवीस यांच्या नावाची घोषणा होताच संपूर्ण सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. बैठकीनंतर विधानभवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये भाजपच्या आमदारांची विधिमंडळ गटनेता निवडीची बैठक घेतली. यावेळी गटनेतेपदाचा प्रस्ताव सुधीर मुनगंटीवार आणि चंद्रकांत पाटील यांच्याकडून मांडला. तर आशिष शेलार, रवीद्र चव्हाण, मेघना बोर्डीकर, पंकजा मुंडे, योगेश सागर, संजय कुटे, प्रवीण दरेकर, रणधीर सावरकर व अन्य काही आमदारांनी या प्रस्तावावर अनुमोदन देत पाठिंबा असल्याचे सांगितले. त्यानंतर एकमताने देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब करत त्यांची गटनेतेपदी निवड केली. त्यामुळे आता गुऊवारी, 5 डिसेंबरला होणाऱ्या शपथविधी सोहळ्यात देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचे निश्चित झाले.
ते पुन्हा येणार म्हणाले आणि आले
विधानसभेच्या 2019 मध्ये झालेल्या निवडणुकीत युतीला जनधार मिळालेला असतानाही केवळ मुख्यमंत्रिपदासाठी उद्धव ठाकरे .यांनी भाजपबरोबर काडीमोड घेतला. त्या दरम्यान अजित पवार यांनी भाजपबरोबर संधान बांधले आणि पहाटेचा शपथविधी होऊन फडणवीस मुख्यमंत्री आणि अजित पवार उपमुख्यमंत्री झाले. पण ते सरकार औटघटकेचे ठरले. नंतर उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन केले. यामुळे शिवसेनेत शिंदे यांची होत असलेल्या घुसमटीतून झालेल्या बंडाळीचा आणि महाविकासआघाडी सरकारमध्ये अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून निधी वाटपात होत असलेल्या सापत्न वागणुकीमुळे आमदारांच्या नाराजीचा फायदा फडणवीस यांनी घेतला. 2022 मध्ये झालेल्या सत्तांतरात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्रिपद मिळाले. वरिष्ठांचा आदेश मान्य कऊन त्यांनी ते स्वीकारले होते. त्यावेळी ‘मी पुन्हा येईन’ या त्यांच्या घोषणेची महाविकासआघाडी आणि उद्धव ठाकरे यांनी अनेकदा खिल्ली उडवली होती. फडणवीस एकटे काय करू शकतात, असे राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाआघाडीला चांगले यश मिळाले. त्यामुळे फडणवीस यांची राजकीय कारकीर्द संपली असे अनेकांना वाटले होते. पण 2024 च्या विधानसभा निवडणुकीत इतिहास घडला. मागील 30 वर्षांत जे झाले नव्हते, ते झाले. भाजपसह महायुतीला भरघोस यश मिळाले आणि महाविकास आघाडीचा सुपडासाफ झाला. महायुतीतही भाजप मोठा पक्ष ठरल्याने आणि प्रथम राष्ट्रवादी, त्यानंतर शिवसेनेने पाठिंबा दिल्याने देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्रिपदाचा मार्ग मोकळा झाला.
त्रास होऊनही आमच्या आमदारांनी साथ सोडली नाही - फडणवीस
भाजपच्या विधीमंडळ गटनेतेपदी निवड झाल्यानंतर आपल्या पहिल्या भाषणामध्ये सर्वांचे त्यांनी आभार मानले. फडणवीस म्हणाले, ज्या अडीच वर्षांमध्ये आपले सरकार नव्हते, तेव्हा आम्हाला, आमच्या आमदारांना त्रास देण्यात आला मात्र एकाही आमदारानं आपली साथ सोडली नाही असे फडणवीसांनी सांगितले. तसेच एका बूथवरच्या कार्यकर्त्याला पंतप्रधान मोदी, अमित शहा यांनी थेट तीन वेळा मुख्यमंत्री होण्याची संधी दिली,असे ही भावनोद्गार त्यांनी काढले.
भाजपची राज्यातील सर्वोत्तम कामगिरी
देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीत मोठे यश मिळविले. लोकसभा निवडणुकीत पीछेहाट झाल्यानंतर अवघ्या सहा महिन्यांनंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी अभूतपूर्व 85 टक्के स्ट्राइक रेटसह 132 जागा निवडून आणल्या. त्यांच्या नेतफत्वाखालील भाजपची ही राज्यातील सर्वोत्तम कामगिरी होती. महाराष्ट्रातील विजयाला भाजपमधील अनेकजण फडणवीस यांच्या रणनीतीला श्रेय देतात. त्यामुळेच विधिमंडळ पक्षाच्या गटनेतेपदी त्यांची एकमताने निवड झाली. त्याचबरोबर त्यांच्या मुख्यमंत्रिपदावरही शिक्कामोर्तब झाले.
नव्या सरकार स्थापनेचा दावा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची राजभवन, मुंबई येथे भेट घेतली. यावेळी सर्व नेत्यांनी नव्या सरकार स्थापनेचा दावा सादर केला. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण, गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी, चंद्रशेखर बावनकुळे, प्रफुल्ल पटेल, रावसाहेब दानवे, अशोक चव्हाण, सुनील तटकरे, चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार व इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.
नागपुरातील घरासमोर जल्लोष
भाजप गटनेते पदाची घोषणा व भाजपचे कोर कमिटीमध्ये मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस यांचे नाव निश्चित होताच नागपुरात त्यांच्या घरासमोर भाजपच्या युवा कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. ढोल ताशाच्या निनादात कार्यकर्ते आपला आनंद व्यक्त करत होते.
आजच्या शपथविधीची तयारी पूर्ण
विधानसभा निवडणुकीनंतर सत्तास्थापनेचा सुरू असलेला घोळ शपथविधीनंतर संपुष्टात येणार आहे. गुरुवारी नव्या सरकारचा शपथविधी होणार आहे. मुंबईतील आझाद मैदानावर हा शपथविधी होणार आहे. या शपथविधीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, पेंद्रीय गफहमंत्री अमित शहा यांच्यासह पेंद्रातील अनेक मंत्री उपस्थित राहणार आहेत. या शपथविधी सोहळ्यासाठी तब्बल 22 राज्यातील मुख्यमंत्री हजेरी लावणार आहेत. विशेष म्हणजे या शपथविधी सोहळ्यासाठी लाडक्या बहिणींना विशेष निमंत्रण देण्यात आलं आहे. तब्बल चाळीस हजार लोकांची उपस्थिती राहणार आहे. महायुतीच्या नव्या सरकारामध्ये एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री असा जुनाच पॅटर्न कायम राहणार असून आणखी कोण कोण मंत्रिपदाची शपथ घेणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
आमदारांचा 7 डिसेंबरला शपथविधी
आज मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांनी शपथ घेतल्यानंतर 7 आणि डिसेंबर रोजी नवनिर्वाचित 288 आमदारांचा शपथविधीची कार्यक्रम विधानभवनात होणार आहे, तर 9 डिसेंबर रोजी विधानसभा अध्यक्षाची निवड होणार आहे.
शिंदे-दादांची फटकेबाजी
एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत बोलताना तुफान फटकेबाजी केल्याचं पाहायला मिळाले. एकनाथ शिंदे यांना तुम्ही मंत्रिपदाची शपथ घेणार का? असे विचारले असता, त्यांनी आज संध्याकाळपर्यंत स्पष्ट होईल असे सांगितले. शिंदेंचे बोलणे सुरू असतानाच अजित पवार म्हणाले, ‘त्यांचे संध्याकाळपर्यंत स्पष्ट होईल, पण मी तर उद्या शपथ घेणार आहे.’ यावर एकनाथ शिंदे यांनी अजित दादांना सकाळी आणि संध्याकाळीही शपथ घेण्याचा अनुभव असल्याचे म्हटल्याने एकच हशा पिकला.