काँग्रेसच्या अडचणी वाढवणाऱ्या घडामोडी
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना बदलण्याच्या मन:स्थितीत नाहीत. अहिंद नेत्याला बाजूला काढल्यास आगामी निवडणुकीत पक्षावर त्याचा परिणाम होणार याची भीती पक्षाला आहेच. ठरल्याप्रमाणे डी. के. शिवकुमार यांच्याकडे सत्ता सोपवली नाही तरीही एक मोठा वर्ग काँग्रेसपासून दूर जाणार, हे स्पष्ट आहे. हायकमांडचा निर्णय काही असला तरी कर्नाटकातील तिढा सुरळीतपणे सुटेल असे सध्या तरी वाटत नाही.
कर्नाटकातील काँग्रेस सरकारला अडीच वर्षे पूर्ण झाल्यानंतर ठरल्याप्रमाणे डी. के. शिवकुमार यांना मुख्यमंत्रिपद सोपवायला हवे, याविषयीच्या चर्चेने पुन्हा एकदा उचल खाल्ली आहे. अधूनमधून ही चर्चा असतेच. डिसेंबरमध्ये बेळगाव येथील सुवर्ण विधानसौधमध्ये झालेल्या कर्नाटक विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या आधीच नेतृत्वबदलावरून तू तू मैं मैं सुरू होती. बेळगाव अधिवेशनापर्यंत दोन्ही गटाच्या नेत्यांनी तोंड बंद ठेवावे, अशी सूचना हायकमांडने केल्यानंतर सर्व काही शांत झाले होते. बेळगाव अधिवेशनानंतर पुन्हा नेतृत्वबदलाची चर्चा सुरू झाली. मध्यंतराच्या काळात हायकमांडच्या सूचनेवरून मुख्यमंत्री सिद्धरामय्या व उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार या नेत्यांनी एकमेकांच्या निवासस्थानी ब्रेकफास्ट मिटींग केली. आता सर्व काही सुरळीत होणार, नेतृत्वबदलाच्या चर्चेला पूर्णविराम मिळणार, अशी शक्यता होती. उलट ही चर्चा वाढली. मुख्यमंत्री सिद्धरामय्या सर्वाधिक काळापुरते मुख्यमंत्रिपदावर राहण्याचा विक्रम नोंदवल्यानंतर तरी या चर्चेला पूर्णविराम मिळणार अशी शक्यता होती. ती शक्यताही मालवली.
उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, त्यांचे बंधू डी. के. सुरेश या नेत्यांनी गुरुवारी नवी दिल्ली येथे सोनिया गांधी व राहुल गांधी यांची भेट घेऊन कर्नाटकात सत्ता स्थापन करताना आपल्याला दिलेले शब्द पाळा, असे सांगत सत्तासंघर्षाचा शेवटचा खेळ सुरू केला आहे. बुधवारी या नेत्यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे व के. सी. वेणुगोपाल या नेत्यांची भेट घेऊन त्यांच्याशीही चर्चा केली आहे. नवी दिल्लीत डी. के. शिवकुमार व त्यांचे बंधू पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेत असतानाच मुख्यमंत्री सिद्धरामय्या मात्र बेंगळूर येथे अर्थसंकल्पाच्या तयारीसाठी विविध सरकारी विभागांच्या बैठकांचा सपाटाही सुरू केला आहे. त्यांचे चिरंजीव डॉ. यतिंद्र सिद्धरामय्या यांनी तर कर्नाटकात नेतृत्वबदलाचा प्रश्नच उद्भवत नाही. आपले वडील मुख्यमंत्रिपदावर पाच वर्षे राहणार, असे पुन्हा एकदा जाहीर केले आहे. मंत्री बी. झेड. जमीर अहमद यांनीही यतिंद्र यांच्या सुरात सूर मिसळत सिद्धरामय्या हेच मुख्यमंत्रिपदावर पाच वर्षे राहतील, असे सांगितले आहे. त्यामुळे काँग्रेसमधील संघर्ष आणखी वाढला आहे.
डी. के. शिवकुमार समर्थक आमदार ज्यावेळी त्यांच्या बाजूने बॅटिंग करीत होते, त्यावेळी पक्षाने त्यांना तंबी दिली. त्यांना कारणे दाखवा नोटिसा देण्यात आल्या. नेतृत्वबदलाच्या मुद्द्यावर कोणीही उघडपणे वक्तव्य करू नये, अशी सूचना करण्यात आली. गेल्या दोन-तीन महिन्यांपासून डॉ. यतिंद्र हे आपल्या वडिलांच्या बाजूने सतत वक्तव्य करीत आहेत. तरीही त्यांच्यावर कारवाई का होत नाही? असा प्रश्न शिवकुमार समर्थक नेत्यांनी उपस्थित केला आहे. या वादात तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रे•ाr यांचाही प्रवेश झाला आहे. ठरल्याप्रमाणे डी. के. शिवकुमार यांना सत्ता सोपवा, असे सांगत त्यांनी हायकमांडवर दबाव वाढवला आहे. डी. के. सुरेश यांनी तर मुख्यमंत्र्यांना त्यांनी दिलेला शब्द आठवून दिले आहेत. शिवकुमार यांनीही मुख्यमंत्री व आपल्यामध्ये लपूनछपून चर्चा झाली नाही. जे काही झाले आहे ते उघडपणे झाले आहे. सगळ्यांच्या समोरच चर्चा झाली आहे, असे सांगत सत्तावाटपाचे सूत्र आठवून दिले आहे. सध्याच्या घडामोडी लक्षात घेता काँग्रेसच्या अडचणी वाढवणाऱ्या या घडामोडी म्हणता येतील.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे सिद्धरामय्या यांना बदलण्याच्या मन:स्थितीत नाहीत. अहिंद नेत्याला बाजूला काढल्यास आगामी निवडणुकीत पक्षावर त्याचा परिणाम होणार याची भीती पक्षाला आहेच. ठरल्याप्रमाणे डी. के. शिवकुमार यांच्याकडे सत्ता सोपवली नाही तरीही एक मोठा वर्ग काँग्रेसपासून दूर जाणार, हे स्पष्ट आहे. हायकमांडचा निर्णय काही असला तरी कर्नाटकातील तिढा सुरळीतपणे सुटेल असे सध्या तरी वाटत नाही. केवळ डी. के. शिवकुमार व त्यांचे बंधू डी. के. सुरेश यांनी हायकमांडशी चर्चा करूनही हा तिढा सुटणार नाही. यासाठी सिद्धरामय्या यांचा पुढाकार लागणारच आहे. स्वत: सिद्धरामय्या यांनी तर नेतृत्वबदलासंदर्भात हायकमांडचा निर्णय अंतिम असणार आहे. वारंवार या मुद्द्यावर प्रश्न विचारू नका. गेले तीन महिने आपण एकच उत्तर देत आहोत. हायकमांड जे सांगेल ते मला आणि त्यांना (शिवकुमार यांना) ऐकावेच लागणार आहे, असे सांगितले आहे. सिद्धरामय्या यांना मुख्यमंत्रिपदावरून बाजूला काढू नये या मागणीसाठी मुख्यमंत्री समर्थक आमदार व विधान परिषद सदस्य परदेश दौऱ्यावर जात आहेत. मुख्यमंत्री समर्थकांना शह देण्यासाठी डी. के. शिवकुमार समर्थक आमदारांनी एखाद्या रिसॉर्टमध्ये ठाण मांडण्याचा विचार चालविला आहे. हायकमांडने सिद्धरामय्या समर्थकांच्या विदेश दौऱ्याला ब्रेक लावावा, यासाठी डी. के. शिवकुमार यांनी आपली ताकद पणाला लावली आहे.
अहमद पटेल यांना राज्यसभेवर निवडून देताना गुजरातमधील आमदारांना कर्नाटकात ठेवण्यात आले होते. आमदारांची फोडाफोडी होऊ नये, यासाठी हायकमांडने डी. के. शिवकुमार यांच्यावर जबाबदारी दिली होती. ही जबाबदारी पार पाडण्यासाठी त्यांना सीबीआय, ईडी आदी केंद्रीय यंत्रणांचा सामना करावा लागला. तिहार कारागृहाची हवा खावी लागली. याची आठवण शिवकुमार यांनी हायकमांडला करून दिली आहे. काँग्रेस सरकारला अडीच वर्षे पूर्ण झाल्यानंतर लगेच सिद्धरामय्या बाजूला होतील. त्यानंतर ठरल्याप्रमाणे डी. के. शिवकुमार यांच्या खांद्यावर मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी येईल, अशी अपेक्षा होती. ही अपेक्षा फोल ठरली. तरीही शिवकुमार यांनी आपला संयम ढळू दिला नाही. कोणत्याही परिस्थितीत सिद्धरामय्या यांना मुख्यमंत्रिपदावरून बाजूला काढू नये यासाठी काँग्रेसमधील एक मोठा गट प्रयत्नशील आहे. डी. के. शिवकुमार यांना मुख्यमंत्री करणारच, असा चंग त्यांच्या समर्थकांनी बांधला आहे.
कर्नाटकातील सत्तासंघर्षावर कोणता निर्णय घ्यायचा, या विवंचनेत हायकमांड आहे. हायकमांडच्या निर्णयामुळे एका गटाचे समाधान होणार तर दुसरा गट नाराज होणार हे स्पष्ट आहे. यापूर्वी वीरेंद्र पाटील यांना बदलताना दाखवलेला धाडसीपणा काँग्रेसचे हायकमांड आता दाखवण्यासाठी कचरत आहे. सत्तासंघर्षामुळे काँग्रेसमधील लाथाळ्या पुन्हा एकदा चव्हाट्यावर आल्या आहेत. या संघर्षाला पूर्णविराम दिला नाही तर नेत्यांमधील चढाओढ आणखी वाढणार आहे.