यमकनमर्डी मतदारसंघात 13.35 कोटीच्या विकासकामांचा खासदारांच्या हस्ते शुभारंभ
बेळगाव : लोकसभा निवडणूक काळात यमकनमर्डी मतदारसंघातील ग्रामस्थांनी काही समस्या आपल्या निदर्शनास आणून दिल्या. त्यामुळे या मतदारसंघातील कलखांब, चंदगड, अष्टे, मुचंडी गावांमध्ये एकूण 13.35 कोटी रुपयांची विकासकामे सुरू केली असल्याची माहिती खासदार प्रियांका जारकीहोळी यांनी दिली. कलखांब येथे 4.5 कोटी, चंदगड 70 लाख, अष्टे 1.80 कोटी व मुचंडी येथे 6.80 कोटी खर्चातून नवे रस्ते, रस्त्यांची सुधारणा, मंगल कार्यालये, खड्ड्यांचे सपाटीकरण, भुयारी गटारीची कामे सुरू करण्यात आली आहेत. मागील अठरा वर्षांत यमकनमर्डी मतदारसंघात मंत्री सतीश जारकीहोळी यांनी विविध विकासकामे करून मतदारसंघाचा कायापालट केला आहे.
लोकसभा निवडणुकीच्या काळात यमकनमर्डी मतदारसंघातून आपणाला अपेक्षेप्रमाणे मते मिळालेली नाहीत. याबद्दल खासदार प्रियांका जारकीहोळी यांनी खंत व्यक्त केली. सतीश जारकीहोळी यांनी या भागातील शैक्षणिक विकासासाठी मोठे योगदान दिले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन निदान पुढील निवडणुकीत तरी मतदारांनी मताधिक्य द्यावे. मतदारांचा पाठिंबा असल्यास अधिक विकासकामे मतदारसंघात करण्याला प्रोत्साहन मिळेल, असेही त्या म्हणाल्या. दरम्यान, कलखांब, चंदगड, अष्टे, मुचंडी येथील ग्रामस्थांसह विविध संघ-संस्था, समित्यांतर्फे खासदार जारकीहोळी यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी ग्रा. पं. अध्यक्ष, उपाध्यक्ष, गावातील ज्येष्ठ नागरिक, ग्रामस्थ व कंत्राटदार उपस्थित होते.