किरण सामंतांमुळे विकासाला चालना मिळेल
राजापुरातील पत्रकार परिषदेत भाजपचे उपाध्यक्ष माधव भंडारी यांचा विश्वास
वार्ताहर राजापूर
गेली अनेक वर्षे विकासाच्या दृष्टीने मागास राहिलेल्या राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदार संघाचा कायापालट करण्यासाठी महायुतीच्या माध्यमातून नव्या दमाचा उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवण्यात आला आहे. किरण सामंत यांचे राजकीय व सामाजिक काम पाहता ते या मतदार संघाच्या विकासाला निश्चितच चालना देतील, असे सांगतानाच एक चांगला लोकप्रतिनिधी म्हणून किरण सामंत यांना येथील जनता या निवडणुकीत विजयी करेल, असा विश्वास भाजपचे उपाध्यक्ष माधव भंडारी यांनी राजापुरात आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केला. महाविकास आघाडीने यापूर्वीच्या अडीच वर्षात राज्याला सर्वच क्षेत्रात पिछाडीवर नेले. महाविकास आघाडीच्या सत्ता काळात राज्यात अपेक्षित विकास झाला नाही. गुंतवणूक वाढली नाही. गुंतवणूकदारांनी काढता पाय घेतला होता. परिणामी औद्योगिक क्षेत्रात महाराष्ट्र पिछाडीवर गेला. विकासकामांना विरोध झाला होता. त्यानंतर महायुतीचे शासन आले आणि मागील सव्वा दोन वर्षात विकासाची घोडदौड सुरू झाली. आमच्या शासनाने अनेक लोकाभिमुख योजना सुरू केल्या व यशस्वीपणे राबवल्या. औद्योगिक क्षेत्रात पिछाडीवर पडलेला महाराष्ट्र पुन्हा एक नंबरवर आला. राज्यात थेट गुंतवणूक वाढली, असे त्यांनी यावेळी सांगितले.