सातारा जिल्ह्यातील विकास कामे राज्यासाठी रोल मॉडेल- उपमुख्यमंत्री अजित पवार
सातारा प्रतिनिधी
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना २०२४-२५ च्या राज्यस्तरीय बैठकीत पुणे विभागाच्या सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यातील जिल्हा वार्षिक योजनांचा आढावा घेण्यात आला. जिल्हा वार्षिक योजनेमध्ये देण्यात येणारा निधी प्राधान्याने सामाजिक क्षेत्रातील विविध योजनांवर विशेषत: शिक्षण, आरोग्य, पर्यटन, महिला व बाल विकास, कृषी, मृद व जलसंधारण क्षेत्रासाठी उपयोगात आणावा, असे निर्देश श्री.पवार यांनी दिले.
बैठकीला पुणे विभागातील चारही जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, जिल्हा नियोजन समिती सदस्य, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा नियोजन अधिकारी, विविध यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी आदी उपस्थित होते. आयुक्त कार्यालयात झालेल्या या बैठकीस सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ, सांगलीचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, उपसचिव नितीन खेडकर, नियोजन उपायुक्त संजय कोलगणे आदी उपस्थित होते.
जिल्हा नियोजन समिती साताराने मंजूर केलेला आराखडा या बैठकीत सादर करण्यात आला यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सर्व विकास आराखड्यांचे सादरीकरण अत्यंत उत्कृष्टपणे केल्याबद्दल अभिनंदन करून अभिनंदन करून अजित पवार म्हणाले, सातारा जिल्ह्यामध्ये माझी शाळा आदर्श शाळा आणि स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र या संकल्पना अत्यंत प्रभावीपणे राबविण्यात येत असून सर्वसामान्य माणसाच्या जीवनात परिवर्तन आणणाऱ्या या संकल्पना आहेत . माझी शाळा आदर्श शाळा आणि स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र या संकल्पना राज्यात सर्व जिल्ह्यांमध्ये राबविण्याबाबत सर्व जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.