मनरेगा योजनेद्वारे गावांचा विकास
ग्राम पातळीवरील जनतेच्या आर्थिक स्थितीत सुधारणा : मनरेगा योजनेला 19 वर्षे पूर्ण
खानापूर : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेमुळे ग्रामीण भागाचा विकास झाला आहे. तसेच ग्राम पातळीवरील जनतेची आर्थिक स्थिती सुधारलेली आहे. नरेगा योजनेमुळे महिला सबलीकरणही झालेले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील जीवनमान पूर्णपणे बदललेले दिसून येत आहे. हेच नरेगाचे यश असल्याचे मत तालुका पंचायत साहाय्यक संचालिका रुपाली बडकुंद्री यांनी नरेगा दिनाच्या कार्यक्रमावेळी व्यक्त केले. बिडी येथे जि. पं. बेळगाव, ता. पं. खानापूर आणि बिडी ग्रा. पं. च्यावतीने मनरेगाच्या माध्यमातून खोदण्यात आलेल्या तलावाच्या ठिकाणी मनरेगा दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बिडी ग्रा. पं. अध्यक्ष संतोष काशीलकर होते.
मनरेगाचे तांत्रिक साहाय्यक शशीधर सत्तेगिरी यांनी उपस्थितांचे स्वागत करून प्रास्ताविक करताना 2 फेब्रुवारी हा मनरेगा दिन म्हणून साजरा केला जातो. कारण ही योजना 2006 साली देशभरात लागू करण्यात आली होती. या योजनेला 19 वर्षे पूर्ण होऊन 20 वर्षात पदार्पण झाले असून, भविष्यातही या योजनेतून ग्रामीण भागात जलसंधारण तसेच इतर विकासकामे राबविण्यात येणार आहेत, अशी माहिती नरेगा समन्वयक अधिकारी महांतेश जंगटी यांनी दिली. यावेळी बिडी ग्रा. पं. अध्यक्ष संतोष काशीलकर म्हणाले की, बिडी ग्रा. पं. क्षेत्रात 1300 हून अधिक मनरेगा मजूर असून, दरवर्षी सर्व मजुरांना 100 दिवस काम दिले जाते. ग्राम पंचायत अंतर्गत सर्व गावांमध्ये योजनेंतर्गत विकासकामे करण्यात येत आहेत. ग्रामस्थांचेही सहकार्य लाभत असल्याने मनरेगा योजना राबविणे सुलभ होत असल्याचे त्यांनी सांगितले.
मनरेगा मजुरांचा सन्मान
मनरेगा दिनानिमित्त 2023-24 या वर्षामध्ये ज्या मनरेगा मजुरानी 100 दिवस काम पूर्ण केले आहे त्यांचा तसेच 65 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांचा आणि मनरेगा विभागातील कर्मचाऱ्यांचा मनरेगाच्यावतीने विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी सदस्य जयवंत काळे, रमेश कम्मार, राजू टोपगोळ, तांत्रिक साहाय्यक शशीधर सत्तीगेरी, प्रशासकीय साहाय्यक गणेश अलबादी, बिस्टप्पा तलवार, शंकर इटगी, नरसप्पा अलाबादी, गीता पेडणेकर यांच्यासह मनरेगा मजूर आणि बिडी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.