For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बेंगळूर विमानतळाच्या धर्तीवर बेळगावचा विकास

11:35 AM Mar 11, 2024 IST | Tarun Bharat Portal
बेंगळूर विमानतळाच्या धर्तीवर बेळगावचा विकास
Advertisement

सांबरा येथे नव्या टर्मिनल बिल्डिंगची पायाभरणी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची व्हर्च्युअल पद्धतीने उपस्थिती

Advertisement

बेळगाव : केंद्र सरकार केवळ घोषणांपूर्ती मर्यादित नसून सातत्याने विकासकामे राबविली जात आहेत. देशातील विमानतळांच्या अद्ययावत करण्यासोबतच देशाच्या विकासासाठी रेल्वे स्टेशन, रेल्वे मार्ग, नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी व किसान सन्मान योजनेचा समावेश केला जात असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. बेळगाव विमानतळाच्या नवीन टर्मिनलच्या बांधकामाची पायाभरणी व्हर्च्युअल पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी करण्यात आली. यावेळी ते देशाला उद्देशून बोलत होते. छोट्या शहरांमध्ये मेट्रो तसेच विमानतळ बांधणे, रेल्वे स्थानकांची दुरुस्ती, नवीन रेल्वे मार्गांचे बांधकाम हाती घेण्यात आले आहे. यामुळे देशातील तरुणांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहेत. तंत्रज्ञानाच्या विकासामुळे नजीकच्या काळात ऊसपीकातून इथेनॉल व बायोगॅसची निर्मिती केली जाणार आहे. यामुळे उसाला अधिक मागणी राहणार असून देशाच्या प्रगतीलाही मदत होईल, असे पंतप्रधानांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उत्तरप्रदेशमधील आझमगड येथून बेळगावसह 15 विमानतळांच्या नवीन टर्मिनलच्या बांधकामाची पायाभरणी व्हर्च्युअल पद्धतीने करण्यात आली. यावेळी बोलताना राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी म्हणाले, बेळगाव हे एक ऐतिहासिक ठिकाण आहे. विमानतळ, लष्कराचे तळ याबरोबरच देशाच्या सुरक्षेसंबंधित संस्था बेळगावमध्ये आहेत. तीन राज्यांच्या सीमा बेळगावला लागून असल्याने विमान प्रवाशांची संख्या वाढली आहे. त्यामुळे भविष्यात विमानतळावर लिफ्ट, कार पार्किंग, धावपट्टीचे रुंदीकरण, विमानांसाठी पार्किंगची व्यवस्था करण्यात येणार आहे. अंदाजे 350 कोटी रुपये खर्च करून निविदा काढण्यात काढण्यात आल्या आहेत. बेंगळूर येथील केंपेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धर्तीवर बेळगाव विमानतळाचा विकास केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. खासदार मंगला अंगडी यांनी बेळगावला आंतरराष्ट्रीय विमानतळाचा दर्जा देण्याबाबत पंतप्रधानांकडे मागणी केली. यावेळी बेळगाव उत्तरचे आमदार राजू सेठ, कर्नाटक सरकारचे दिल्लीतील विशेष प्रतिनिधी प्रकाश हुक्केरी, महापौर सविता कांबळे, विमानतळाचे संचालक त्यागराजन उपस्थित होते.

Advertisement

755 एकर जागेमध्ये विमानतळ

बेळगावच्या सांबरा गावानजीक 755 एकर जागेमध्ये विमानतळ आहे. सध्या सहा ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. केंद्र सरकारकडून 322 कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला असून 19,600 चौ. मीटर क्षेत्रफळाचे भव्य टर्मिनल बांधले जाणार आहे. यामुळे एकाचवेळी 2400 प्रवाशी प्रवास करण्याची क्षमता नव्या टर्मिनल बिल्डिंगमध्ये करण्यात येणार आहे.

Advertisement
Tags :

.