अश्लील चित्रफितींमुळे देवेगौडांचा नातू अडचणीत
अनेक चित्रफिती व्हायरल : विदेशात पळाल्याची चर्चा : तपासासाठी एसआयटी स्थापन
प्रतिनिधी/ बेंगळूर
लोकसभा निवडणुकीदरम्यान कर्नाटकच्या राजकारणात मोठा भूकंप घडला आहे. माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांचे नातू आणि हासन लोकसभा मतदारसंघाचे खासदार प्रज्ज्वल रेवण्णा कथित स्वरुपात लैंगिक शोषणाच्या आरोपामुळे अडचणीत आले आहेत. अश्लील चित्रफिती सोशल मीडियावर प्रसारित झाल्या असून अनेक महिलांचे लैंगिक शोषण झाल्याचा आरोप होत आहे.
कर्नाटक सरकारने या प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटी स्थापन केली आहे. तर दुसरीकडे प्रज्ज्वल यांनी देश सोडत जर्मनीतील फ्रँकफर्ट येथे आश्रय घेतल्याचे समजते. 26 एप्रिल रोजी कर्नाटकातील पहिल्या टप्प्याच्या मतदानाच्या दोन दिवसांपूर्वी सोशल मीडियावर अनेक चित्रफिती व्हायरल झाल्या होत्या. तर दुसरीकडे हासनच्या खासदाराने एफआयआर नोंदवत चित्रफितींमध्ये फेरफार करत माझी प्रतिमा मलीन करण्याचा आणि मतदारांच्या मनात द्वेष निर्माण करण्याचा कट रचण्यात आल्याचा दावा केला होता.
इंटरनेटवर चित्रफिती व्हायरल झाल्यावर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना एसआयटीमार्फत तपास करण्याची विनंती केली होती. प्रज्ज्वल रेवण्णांच्या अश्लील चित्रफिती प्रकरणी सरकारने एसआयटी स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. हासन जिल्ह्यात अश्लील चित्रफिती प्रसारित होत असून यात महिलांचे लैंगिक शोषण झाल्याचे मानण्यात येतेय, असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सोशल मीडियावरील एका पोस्टमध्ये नमूद केले आहे.
व्हिडीओ पडताळणीसाठी एफएसएलकडे
महिलांचा लैंगिक छळ केल्याचा आरोप असलेल्या खासदार प्रज्ज्वल रेवण्णांचे व्हिडिओ पडताळणीसाठी एफएसएल प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. या प्रकरणाची गंभीर दखल घेतलेल्या राज्य सरकारने वेगाने तपास चालविला आहे.
पीडित महिलेची महिला आयोगाकडे तक्रार
खासदार प्रज्ज्वल रेवण्णा यांच्या अश्लील व्हिडीओ प्रकरणी हासन येथील एका पीडित महिलेने राज्य महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. वडील रेवण्णा आणि प्रज्ज्वल रेवण्णा या दोघांविऊद्ध तक्रार दाखल केली असून दोघांनी अत्याचार केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. महिलेची तक्रार आल्यानंतर राज्य महिला आयोगाने तपास सुरू केला आहे, असे महिला आयोगाच्या अध्यक्षा नागलक्ष्मी चौधरी यांनी सांगितले.
चौकशीसाठी एसआयटीची स्थापना
हासन अश्लील व्हिडिओ प्रकरणाच्या चौकशीसाठी एडीजीपी बी. के. सिंग यांच्या नेतृत्त्वाखाली विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात आले आहे. राज्य सरकारने हे प्रकरण गांभीर्याने घेतले असून तपासाची जबाबदारी एसआयटीकडे सोपवणार असल्याचे गृहमंत्री डॉ. जी परमेश्वर यांनी सांगितल्यानंतर सरकारने एसआयटी स्थापन करण्याचा अधिकृत आदेश जारी केला आहे. प्रकरणाच्या तपासासाठी एडीजीपी बी. के. सिंग यांच्या नेतृत्त्वाखालील पथकात साहाय्यक पोलीस महासंचालक सुमन डी. पेन्नेकर, म्हैसूर जिल्ह्याच्या एसपी सीमा लाटकर यांचा समावेश करण्यात आला आहे. याबाबत राज्यातील इतर पोलीस स्थानकात दाखल झालेल्या प्रकरणांची एसआयटी चौकशी करेल, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
होळेनरसीपूर पोलिसांत एफआयआर दाखल
महिलांवरील लैंगिक अत्याचाराच्या आरोपावरून खासदार प्रज्ज्वल रेवण्णा यांच्याविऊद्ध होळेनरसीपूर शहर पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. महिलेने दिलेल्या तक्रारीच्या आधारे होलेनरसीपूर कलम 354-ए, 354-डी, 506, 509 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रज्वल रेवण्णा यांचे वडील, निजदचे आमदार एच. डी. रेवण्णा यांच्याविरोधात एफआयआरही नोंदवण्यात आला आहे.
भाजपने राखले अंतर
प्रज्वल रेवण्णा यांच्या याप्रकरणापासून भाजपने अंतर राखले आहे. राज्यात भाजप आणि निजद यांच्यात आघाडी झाली आहे. एक पक्ष म्हणून आमचे या चित्रफितींशी कुठलेच देणेघेणे नाही. तसेच प्रज्वल रेवण्णांशी निगडित कथित अश्लील चित्रफितींप्रकरणी राज्य सरकारकडून घोषित एसआयटीच्या तपासावर आम्ही टिप्पणी करू इच्छित नाही असे भाजप प्रवक्ते एस. प्रकाश यांनी नमूद केले आहे. कथित लैंगिक शोषणाप्रकरणी कुठलीच टिप्पणी न करण्याचा निर्णय भाजपने घेतला असल्याचे समजते.
बेंगळुरात महिलांचे आंदोलन
खासदार प्रज्ज्वल रेवण्णा यांनी हजारो महिलांवर केलेल्या लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणी काँग्रेसच्या महिला सदस्य आणि महिला समर्थक संघटनांच्या सदस्यांनी रस्त्यावर उतरून निषेध नोंदविला. प्रज्ज्वल रेवन्ना यांना तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी काँग्रेस महिला युनिटच्या सदस्यांनी रविवारी बेंगळूरमध्ये आंदोलन छेडले.
मीठ खाल्लेल्यांना पाणी प्यावेच लागेल : कुमारस्वामी
खासदार प्रज्ज्वल रेवण्णा यांच्या व्हायरल व्हिडिओ प्रकरणाचा तपास एसआयटीकडे सोपवण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर प्रतिक्रिया देताना माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी, मीठ खाल्लेल्यांना पाणी प्यावेच लागेल. मी आणि माजी पंतप्रधान देवेगौडा दोघेही मुलींबद्दल आदराने वागत आलो आहे. अडचणींबद्दल तक्रार करणाऱ्यांना आम्ही प्रतिसाद दिला आहे, असे त्यांनी सांगितले.
चुकीवर पांघरूण घालणार नाही : जी. टी. देवेगौडा
कोणीही चूक केली असावी, मग तो माझा मुलगा असो, भावांनी केली तरी ती चूकच आहे. मी चूक केली नाही असा युक्तिवाद मी करणार नाही. त्यावर पांघरूण घालण्याचा कोणताही प्रयत्न करणार नाही. एसआयटीसह सर्व तपास यंत्रणा सरकारच्या अखत्यारीत आहेत. हासनच्या अश्लील व्हिडिओ व्हायरल प्रकरणाचा एसआयटीच नव्हे तर कोणत्याही पद्धतीने चौकशी केली तरी त्याचे आम्ही स्वागत करू, असे निजद कोअर कमिटीचे अध्यक्ष जी. टी. देवेगौडा यांनी स्पष्ट केले.