For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

देवदत्त पडिक्कलचे सलग दुसरे शतक

06:58 AM Aug 24, 2026 IST | Tarun Bharat Portal
देवदत्त पडिक्कलचे सलग दुसरे शतक
Advertisement

कर्णधार शुभमन गिलचे अर्धशतक,  असिता फर्नांडोचे 3 बळी, जैस्वाल-जडेजाचे उपयुक्त योगदान, भारताच्या 5 बाद 300 धावा

Advertisement

वृत्तसंस्था, कोलंबो

देवदत्त पडिक्कलच्या सलग दुसऱ्या शतकाच्या जोरावर तसेच कर्णधार गिल, जैस्वाल आणि जडेजा यांच्या समायोचित फलंदाजीने येथे रविवारपासून सुरु झालेल्या दुसऱ्या आणि शेवटच्या कसोटीत भारताने पहिल्या डावात 5 बाद 300 धावा जमविल्या. भारतीय संघातील यष्टीरक्षक आणि फलंदाज रिषभ पंतला दुखापतीमुळे निवृत्त व्हावे लागले. लंकेच्या असिता फर्नांडोने 46 धावांत 3 गडी बाद केले.

Advertisement

आयसीसी कसोटी चॅम्पियनशिप अंतर्गत 2 सामन्यांची ही कसोटी मालिका खेळविली जात असून भारताने पहिला सामना जिंकून लंकेवर 1-0 अशी आघाडी यापूर्वीच मिळविली आहे. पहिल्या कसोटीतही देवदत्त पडिक्कलने शतक नोंदवून सामनावीराचा बहुमान घेतला होता. पडिक्कलचा हा चौथा कसोटी सामना आहे. मात्र या दुसऱ्या कसोटीत त्याला लंकेकडून दोन जीवदाने मिळाली. एसएससी मैदानाची खेळपट्टी वेगवान गोलंदाजीला अनुकूल असल्याने त्याचा लाभ लंकेच्या गोलंदाजांनी उठविला. पण या खेळपट्टीवर चेंडू अनपेक्षित उसळत असून रिषभ पंतला दुखापत झाल्याने तो केवळ 3 धावा जमवित निवृत्त झाला.

या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यशस्वी जैस्वाल आणि केएल राहुल या सलामीच्या जोडीने 64 चेंडूत 37 धावांची भागिदारी केली. कुमाराच्या गोलंदाजीवर राहुल डिकवेलाकरवी झेलबाद झाला. त्याने 1 षटकार आणि 2 चौकारांसह 18 धावा जमविल्या. जैस्वालने कुमाराच्या गोलंदाजीवर एका षटकात सलग 2 चौकार ठोकले. तसेच त्याने जयसूर्यालाही कव्हरड्राईव्हचा चौकार ठोकला. पण फर्नांडोच्या इनस्विंगरवर फटका मारण्याच्या नादात जैस्वालचा त्रिफळा उडाला. त्याने 53 चेंडूत 9 चौकारांसह 45 धावा जमविल्या. उपाहारावेळी भारताने 25 षटकात 2 बाद 88 धावा जमविल्या. पडिक्कल 13 तर कर्णधार गिल 11 धावांवर खेळत होते. पडिक्कलला या कालावधीत दोन जीवदाने मिळाली. नुवांताच्या गोलंदाजीवर धनंजय डिसिल्व्हाकडून पडिक्कलला जीवदान मिळाले. त्यावेळी तो केवळ एका धावेवर होता. तत्पूर्वी खाते उघडण्यापूर्वी त्याला लंकेकडून पहिले जीवदान मिळाले होते. या जीवदानाचा लाभ घेत त्याने या सामन्यात शतक झळकवले.

 

शतकी भागिदारी

पडिक्कल आणि गिल या जोडीने संघाला सुस्थितीत नेताना तिसऱ्या गड्यासाठी 120 धावांची शतकी भागिदारी केली. पडिक्कलने या सत्रामध्ये आपले अर्धशतक 90 चेंडूत 7 चौकारांच्या मदतीने झळकवले. गिल आणि पडिक्कल यांनी तिसऱ्या गड्यासाठी शतकी भागिदारी 166 चेंडूत नोंदविली. यानंतर गिलने आपले अर्धशतक 99 चेंडूत 6 चौकारांच्या मदतीने झळकाविले. चहापानापूर्वी गिल असिता फर्नांडोच्या गोलंदाजीवर डिकवेलाकरवी झेलबाद झाला. त्याने 108 चेंडूत 6 चौकारांसह 50 धावा जमविल्या. चहापानावेळी भारताची स्थिती 52 षटकात 3 बाद 187 अशी होती. पडीकल 63 धावांवर खेळत होता.

पडिक्कलचे शतक

शेवटच्या सत्राला प्रारंभ झाला आणि लंकेचा वेगवान गोलंदाज लाहिरु कुमाराचा वेगवान उसळता चेंडू पंतच्या कोपरावर आदळल्याने त्याला मैदान सोडावे लागले. पंतने केवळ 3 धावा जमविल्या. पंतच्या निवृत्तीमुळे साहजिकच पडिक्कलवर अधिकच दडपण आले. केवळ 4 कसोटींचा अनुभव असलेल्या पडिक्कलला या खेळपट्टीवर शतक झळकविताना अधिक कसरत करावी लागली. खेळपट्टीवर चेंडू बऱ्यापैकी उसळत असल्याने त्याला फटक्यांची निवड करताना खूपच अवघड गेले. पण यावर त्याने मात करत या मालिकेतील आपले सलग दुसरे शतक झळकविले.

पंत निवृत्त झाल्यानंतर अष्टपैलू रवींद्र जडेजा फलंदाजीसाठी मैदानात आला. पडिक्कल आणि जडेजा यांनी चौथ्या गड्यासाठी 74 धावांची भागिदारी केली. पडिक्कलने जयसूर्याच्या चेंडूवर चौकार ठोकून आपले अर्धशतक 90 चेंडूत 7 चौकारांच्या मदतीने पूर्ण केले. नंतर त्याने जयसूर्याला आणखी एक चौकार ठोकून 99 धावांवर झेप घेतली. यानंतर दोन चेंडूंच्या अंतराने त्याने एकेरी धाव घेत आपले शतक 168 चेंडूत 10 चौकारांच्या मदतीने झळकवले. पडिक्कलच्या शतकानंतर लंकेने दुसरा नवा चेंडू घेतला. नुवांताच्या गोलंदाजीवर फटका मारण्याच्या नादात पडिक्कलचा त्रिफळा उडाला. त्याने 193 चेंडूत 12 चौकारांसह 117 धावा झळकविल्या. पडिक्कल बाद झाल्यानंतर रवींद्र जडेजा पाठोपाठ तंबूत परतला. फर्नांडोच्या गोलंदाजीवर जडेजा त्रिफळाचीत झाला. त्याने 83 चेंडूत 4 चौकारांसह 43 धावा जमविल्या. दिवसअखेर भारताने 85 षटकात 5 बाद 300 धावा जमविल्या. दिवसअखेर जुरेल 7 तर कसोटी पदार्पण करणारा सारांश जैन 4 धावांवर खेळत आहे. लंकेतर्फे असिता फर्नांडोने 46 धावांत 3 तर कुमारा आणि नुवांता यांनी प्रत्येकी 1 बळी मिळविला. अंधुक प्रकाशामुळे पंचांनी निर्धारित षटकांपैकी 5 षटके बाकी असताना खेळ थांबविला.

संक्षिप्त धावफलक - भारत प. डाव 85 षटकात 5 बाद 300 (जैस्वाल 45, केएल. राहुल 18, देवदत्त पडिक्कल 117, शुभमन गिल 50, रिषभ पंत दुखापतीने निवृत्त 3, रवींद्र जडेजा 43, जुरेल खेळत आहे 7, सारांश जैन खेळत आहे 4, अवांतर 13, असिता फर्नांडो 3-46, कुमारा 1-38, नुवांता 1-93).

Advertisement
Tags :

.