उत्तराखंडमध्ये लागू होणार देवभूमी परिवार योजना
वृत्तसंस्था/ देहरादून
उत्तराखंडमध्ये आता देवभूमी परिवार योजना लागू करण्यात येणार आहे. देवभूमी परिवार योजनेच्या अंतर्गत उत्तराखंडमध्ये वास्तव्य करत असलेल्या परिवारांचे ओळखपत्र निर्माण केले जाणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत यासंबंधी निर्णय घेण्यात आला आहे. याचबरोबर आणखी 12 प्रस्तावांना मंजुरी मिळाली आहे.
मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्या अध्यक्षतेत झालेल्या या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. बैठकीत 12 प्रस्तावांना मंजुरी मिळाली आहे. उत्तराखंड माजी सैनिक कल्याण महामंडळ कर्मचाऱ्यांना स्थायी नियुक्ती आणि वेतनप्रकरणी मंत्रिमंडळाची उपसमिती स्थापन करण्यात येणार आहे. ही समिती दोन महिन्यांच्या आत राज्य सरकारला स्वत:चा अहवाल सोपविणार आहे.
तर आपत्तीत मृत्यू झालेल्या लोकांच्या परिवारांना आता 4 लाख रुपयांऐवजी 5 लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे. तर आपत्तीत घर जमीनदोस्त झाल्यास 5 लाख रुपयांची मदत केली जाणार आहे.