जागतिक स्पर्धेसाठी देवरमणीची निवड
जागतिक अॅथलेटिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व
वार्ताहर /उचगाव
उचगावचे सुपुत्र ज्येष्ठ क्रीडापटू चन्नम्मा नगरचे रहिवासी एस. एल. देवरमणी यांनी स्वीडनमधील गोटेनबर्ग येथे 13 ते 25 ऑगस्ट झालेल्या जागतिक मास्टर्स अॅथलेटिक स्पर्धेसाठी भारताचे प्रतिनिधित्व करून उत्तम कामगिरी केली आहे. स्वीडनमधील जागतिक मास्टर्स अॅथलेटिक स्पर्धेत जगभरातील 117 देशातील आठ हजार खेळाडूंनी भाग घेतला होता. त्यामध्ये भारताच्या एस. एल. देवरमणी यांनी 70 वर्षावरील पुऊष गटाच्या 10 किलो मी. रोड रेस, 5000 मी. धावणे, 5000 मी. चालणे आणि 4×400 मी. रिले शर्यतीत भाग घेऊन पुढील प्रमाणे यश मिळविले.
(1)10 कि.मी. रोड रेस वेळ 1:02:26 33 वे स्थान, (2) 5000 मी. धावणे वेळ 29.31.10 29 वे,स्थान (3) 5000 मी. चालणे वेळ 43.00.00 20 वे. स्थान (4) 4×400 मी. रिले (65 वर्षांवरील पुऊष) वेळ 5.36.19 8 वे स्थान . सदर कामगिरी लक्षात घेऊन एस.एल. देवरमणी यांची आता सिंगापूर आणि मलेशिया येथे येत्या 22 ते 30 सप्टेंबर या कालावधीत होणाऱ्या एसबीके.एफ. 10 आंतरराष्ट्रीय क्रीडा महोत्सवासाठी भारतीय संघात निवड झाली आहे.
बेळगावच्या अॅथलेटिक्स जगतातील एक आदरणीय व्यक्तिमत्व असलेले देवरमणी हे भारतीय सेनादलाचे सेवानिवृत्त कर्मचारी आहेत. स्थानिक आणि परगावच्या देशांतर्गत स्पर्धांसह नेपाळ, श्रीलंका, दुबई वगैरे प्रदेशातील आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये सहभाग दर्शविणाऱ्या 75 वषीय एस.एल. देवरमणी यांनी कॉलेज जीवनापासून धावण्याच्या शर्यतीत सुमारे 400 पदके व अनेक बक्षिसे मिळवली आहेत. भारत देशाबरोबरच अटकेपार क्रीडा स्पर्धेत रोवलेला हा झेंडा उचगाववासियांना एक अभिमानास्पद असल्याच्या प्रतिक्रिया उचगाववासीयांतून व्यक्त होत आहेत. त्यांचाच आदर्श घेऊन उचगाव परिसरातील खेळाडूंनीही असे क्रीडा स्पर्धेत उच्चांक गाठावेत आणि क्रीडा स्पर्धेत नावलौकिक कमवा, असे देवरमणी यांचे म्हणणे आहे.