मायक्रो फायनान्सविरोधात संघटित लढ्याचा निर्धार!
चिपळूण :
मायक्रो फायनान्स कंपन्यांनी धुमाकूळ घातला असून 45 टक्के व्याज घेऊन सर्वसामान्यांची फसवणूक सुरू केली आहे. यातून मुक्ती मिळवण्यासाठी संघटित लढा उभारुया, असे आवाहन माजी खासदार तथा काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष हुसेन दलवाई यांनी केले.
जनता दल व कोकण जनविकास समितीच्यावतीने शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. दलवाई म्हणाले, ज्या लोकांना काही कारणांमुळे बँका कर्ज नाकारतात त्यांनाही कर्ज मिळावे, त्यातून त्यांचे लहान-लहान उद्योग सुरू व्हावेत, अशा अनेक उद्देशाने शासनाने मायक्रो फायनान्स कंपन्यांना परवानगी दिली आहे. मात्र त्याचा या कंपन्या गैरफायदा घेत असून ज्या लोकांनी हे कर्ज घेतले आहे, त्यांना प्रचंड त्रास दिला जात आहे. त्यांच्याकडून 45 टक्क्यांपर्यंत व्याज वसुली केली जाते. वसुलीसाठी दमबाजी, मारहाण करत मानसिक त्रास दिला जात आहे. महिलांना अपमानास्पद वागणूक दिली जात असल्याने काही महिलांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यामुळे मायक्रो फायनान्स कंपन्यांची वाढलेली दादागिरी ठेचण्याची वेळ आली आहे. शासन अंबानी, अदानींची मोठी कर्ज माफ करते, मग गरिबांना का सवलत देऊ शकत नाही. त्यामुळे हा आपला कंपन्या व सरकारविरोधात सत्याग्रह आहे. त्यासाठी लढण्याची तयारी आपण केली पाहिजे, असे आवाहन दलवाई यांनी केले.
- पोलिसांनी कठोर कारवाई करावी
आपल्या अडचणीसाठी घेतलेले कर्ज फेडलेच पाहिजे, या मताचे आपण सर्वजण आहोत. मात्र व्याज किती असावे याला काही मर्यादा आहेत की नाहीत, असा प्रश्न उपस्थित करीत यापुढे 5 ते जास्तीत-जास्त 7 टक्याच्यावर व्याज भरायचे नाही, असा निर्धार करण्याचा सल्लाही दलवाई यांनी दिला. यापुढे वसुलीसाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांना तुम्ही भरलेल्या पैशाचा हिशोब सांगा, यापुढे आम्ही पैसे भरणार नाही असे ठणकावून सांगा, असे आवाहन करत दलवाई यांनी महिलांना त्रास देणाऱ्या या कंपन्यांविरोधात पोलिसांनी कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली.
- कंपन्यांनी कायद्याच्या बंधनात रहावे - प्रभाकर नारकर
जनता दलाचे प्रभाकर नारकर यांनी कंपन्यांनी कायद्याच्या बंधनात रहावे, हा आमचा त्यांना प्रेमाचा सल्ला आहे. जर त्यांनी महिलांचा छळ केला तर गाठ आमच्याशी असून त्यांना त्याच भाषेत उत्तर दिले जाईल. मेळावे हा आंदोलनाचा पहिला टप्पा असून पुढील टप्यात मंत्रालयावर लाटणे आंदोलन करण्याचा इशारा देतानाच आतापर्यंत ज्या-ज्या कर्जदारांकडून जादा पैसे घेतले गेले आहेत ते परत घेतल्याशिवाय गप्प राहणार नाही, असेही नमूद केले. यावेळी नम्रता जाधव, संग्राम पेटकर, संजय परब, लियाकत शहा, अशोक जाधव, भरत लब्धे, प्रा. विनायक होमकळस, जगदीश नलावडे, ज्योती तोदेकर, नीलेश घाग, मिसबा दळवी, चेतना पटेकर आदी उपस्थित होते.
- महिलांची लक्षणीय उपस्थिती
मायक्रो फायनान्स कंपन्यांचे एजंट घराघरात जाऊन आपली कर्ज महिलांच्या माथी मारताना दिसतात. त्यानंतर मात्र हप्ते भरताना महिलांची दमछाक होत आहे. यातूनच महिलांचा छळ होत असल्याने या विरोधात आता महिला एकवटल्या असून या मेळाव्याला त्यांची उपस्थिती लक्षणीय होती.