For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राष्ट्रीय पक्षांना हिसका दाखविण्याचा निर्धार

11:06 AM Apr 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
राष्ट्रीय पक्षांना हिसका दाखविण्याचा निर्धार
Advertisement

म. ए. समितीच्या बैठकीत कार्यकर्त्यांच्या उमटल्या प्रतिक्रिया : आजपासून प्रचाराला प्रारंभ

Advertisement

बेळगाव : कोणत्याही निवडणुका येताच राष्ट्रीय पक्षांना मराठी भाषिकांची आठवण येते. त्यांना विविध आमिषे दाखविली जातात. मात्र त्या आमिषांना मराठी भाषिकांनी बळी न पडता लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा या राष्ट्रीय पक्षांना हिसका दाखविण्याचा निर्धार शहर व तालुका म. ए. समितीच्या संयुक्त बैठकीत गुरुवारी कार्यकर्त्यांनी केला. लोकसभा निवडणुकीसाठी म. ए. समितीच्यावतीने महादेव पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यानंतर निवडणुकीच्या प्रचाराचे नियोजन करण्यासाठी गुरुवारी रेल्वे ओव्हरब्रिजजवळील मराठा मंदिर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले. बैठकीच्या अध्यक्षस्थानी अॅड. राजाभाऊ पाटील होते. सीमाभागातील मराठी जनता गेली 67 वर्षे लोकशाहीमार्गाने लढा देत आहे. मात्र हा लढा दडपण्याचा प्रयत्न राष्ट्रीय पक्षांनी केला आहे. येथील मराठी भाषा संपविण्याचा विडाच त्यांनी उचलला असून लोकशाहीमार्गातून आता त्यांना धडा शिकवायचा आहे, असे मत कार्यकर्त्यांनी व्यक्त केले.

उमेदवार महादेव पाटील यांना मोठ्या मताधिक्क्यांनी विजयी करण्याचा निर्धार करण्यात आला. बेळगाव दक्षिण, बेळगाव ग्रामीण आणि बेळगाव उत्तर मतदारसंघामध्ये मोठ्या संख्येने मराठी भाषिक आहेत. त्या सर्वांनी एकजुटीने महादेव पाटील यांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले. मराठी भाषा टिकविण्यासाठी सर्वांनी एकत्रित यावे. हिंदुत्वासाठी एकत्र या, अशी हाक दिली जाते. मात्र त्याला बळी न पडता आता मराठीसाठी एकत्र या, असे आवाहनदेखील करण्यात आले आहे. या बैठकीमध्ये तालुका म. ए. समितीचे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर, शहर म. ए. समितीचे कार्याध्यक्ष रणजीत चव्हाण-पाटील, रमाकांत कोंडुस्कर, युवा समितीचे अध्यक्ष अंकुश केसरकर, आर. एम. चौगुले, प्रकाश मरगाळे, मदन बामणे, सागर पाटील, श्रीकांत कदम, मनोहर हलगेकर, अॅड. एम. जी. पाटील, अॅड. अमर येळ्ळूरकर, प्रशांत भोसले, रामचंद्र मोदगेकर, रणजीत हावळण्णाचे यांच्यासह इतर कार्यकर्त्यांनी निवडणूक लढविण्याबाबत मते व्यक्त केली.

Advertisement

उचगावातून आजपासून प्रचाराला प्रारंभ

उचगाव येथील मळेकरणी मंदिरामध्ये सकाळी 9 वाजता प्रचाराचा शुभारंभ करण्यात येणार आहे. त्यानंतर संपूर्ण उचगावसह परिसरात प्रचार केला जाणार आहे. तरी कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Advertisement
Tags :

.