पत्रकारांना धक्काबुक्कीच्या निषेधार्थ पोलीस आयुक्त कार्यालयासमोर धरणे
पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी
प्रतिनिधी/ बेळगाव
विधानपरिषदेत मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांना अपशब्द वापरल्याच्या आरोपावरून बेळगाव पोलिसांनी माजी मंत्री सी. टी. रवी यांना अटक केल्यानंतर वृत्तसंकलनासाठी गेलेल्या पत्रकारांना पोलीस व अधिकाऱ्यांनी केलेल्या धक्काबुक्कीच्या निषेधार्थ शुक्रवारी दुपारी पोलीस आयुक्त कार्यालयासमोर पत्रकारांनी धरणे धरले.
गुरुवार दि. 19 डिसेंबरच्या सायंकाळपासून वृत्तसंकलनासाठी वेगवेगळ्या ठिकाणी गेलेल्या पत्रकारांना धक्काबुक्की करण्यात आली आहे. काही ठिकाणी तर त्यांच्या वाहनांना धक्का देण्यात आला आहे. खानापूर पोलीस स्थानक, रामदुर्ग व गोकाक तालुक्यात पोलीस अधिकाऱ्यांनी पत्रकारांचा अपमान केला आहे, असा आरोप करीत धरणे धरण्यात आले.
पोलीस आयुक्त यडा मार्टिन मार्बन्यांग, उपायुक्त रोहन जगदीश आदी अधिकाऱ्यांनी धरणे धरलेल्या पत्रकारांशी चर्चा केली. जिल्ह्यातील काही अधिकाऱ्यांनीही पत्रकारांवर हल्ला केल्यामुळे जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद यांनाही पोलीस आयुक्त कार्यालयासमोर बोलाविण्यात आले. यावेळी पत्रकारांनी अधिकारी व पोलिसांविरुद्ध घोषणाबाजी केली. पत्रकारांना धक्काबुक्की करणाऱ्या अधिकारी व पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
जिल्हा श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष दिलीप कुरुंदवाडे, श्रीकांत कुबक•ाr, मनीषा सुभेदार, रमेश हिरेमठ, मंजुनाथ पाटील, सहदेव माने, चंद्रकांत सुगंधी, चंद्रू श्रीरामुलू, संतोष श्रीरामुलू, श्रीधर कोटारगस्ती, अनिल काजगार, रवी उप्पार, संतोष चिनगुडी, सुनील पाटील, राजू हिरेमठ, मैलारी पटात, संजय सूर्यवंशी आदींसह विविध वृत्तवाहिन्या व दैनिकांच्या प्रतिनिधींनी या धरणे कार्यक्रमात भाग घेतला. पत्रकारांना धक्काबुक्की करणाऱ्या, त्यांच्या वाहनांवर हल्ला करणाऱ्या अधिकारी व पोलिसांवर लेखी तक्रार द्या, या घटनेची चौकशी करून कारवाई करू, असे आश्वासन पोलीस अधिकाऱ्यांनी दिले.