10 हजारपेक्षा अधिक घरांचा तपशील नोंद
ऑनलाईन गृहगणनेच्या पहिल्या टप्प्यात : उद्यापासून प्रत्यक्ष भेट देऊन घरगणना होणार
पणजी : जनगणना 2027 च्या पूर्वार्धात चालू असलेल्या स्वेच्छा ऑनलाईन गृहगणनेच्या पहिल्या टप्प्यातील 15 दिवसांच्या कालावधीत गोव्यातील 10 हजारपेक्षा अधिक घरांचा तपशील नोंद झाल्याची माहिती हाती आली आहे. स्वेच्छा गृहगणना नोंदीची मुदत आज बुधवार दि. 15 एप्रिल रोजी संपुष्टात येत असून उद्या गुरुवार 16 एप्रिलपासून महिनाभर म्हणजे दि. 15 मेपर्यंत प्रत्यक्ष घरी भेटी देऊन घरांची गणना व तपशील गोळा करण्याचे काम सुरु होणार आहे.
गोवा जनगणना संचालनालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या टप्प्यातील गृहगणना नोंदणीसाठी 1 ते 15 एप्रिल अशी मुदत देण्यात आली होती. त्या कालावधीत ऑनलाईन गृहनोंदणी आणि इतर तपशील भरण्याची सोय उपलब्ध करण्यात आली होती. त्याचा लाभ 10 हजारपेक्षा अधिक घरांनी घेतला असून घरांची संपूर्ण माहिती ऑनलाईन स्वरुपात सादर करण्यात आली आहे. ती माहिती सादर करणाऱ्यांना 11 आकडी आयडी नंबर देण्यात आला असून प्रत्यक्ष गृहगणनेसाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांना तो नंबर सांगायचा आहे. त्या नंबरवरुन माहिती दिल्याची खात्री कर्मचारी करणार असून ती अधिकृत केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.
उत्तर गोवा जिह्यात 5000 पेक्षा जास्त तर दक्षिण गोवा जिह्यातून 4200 च्या आसपास व कुशावती या नवीन जिह्यात 800 पेक्षा जास्त घरांची नोंदणी गणनेसाठी झाली असल्याची माहिती मिळाली आहे. उच्चस्तरीय व अतिमहनीय व्यक्तींनी या ऑनलाईन गृहनोंदणी व गणनेचा लाभ घेतला असून त्यात राज्यपाल, मुख्यमंत्री, इतर मंत्री, मुख्य सचिव, इतर सचिव, अॅडव्होकेट जनरल इत्यादींनी माहिती सादर केल्याचे सूत्रांनी सांगितले. पोर्टलच्या माध्यमातून ती माहिती सादर करण्यात आली असून 1 एप्रिल रोजी खुले झालेले सदर पोर्टल आज 15 एप्रिलपर्यंत खुले राहाणार आहे. आज ऑनलाईन नोंदणीची अखेरची तारीख असल्याने सर्वाधिक घरांचा तपशील पोर्टलवर ऑनलाईन स्वरुपात दाखल होण्याची शक्यता दिसून येत आहे.