चन्नम्मा चौक दुभाजकांवरील झाडांची नासधूस
बेळगाव : महापालिकेकडून आरटीओ सर्कल ते राणी चन्नम्मा चौकापर्यंतच्या मुख्य रस्त्याच्या दुभाजकांमध्ये झाडे लावण्यात आली होती. मात्र या झाडांची नासधूस झाली असून जवळजवळ नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. राज्योत्सवादरम्यान चन्नम्मा सर्कलमध्ये मोठी गर्दी झाली होती. परिणामी दुभाजकामधील झाडांची मोठ्या प्रमाणात नासधूस झाली आहे. यामुळे महापालिकेने सदर झाडांच्या देखभालीसाठी पावले उचलणे गरजेचे आहे. महापालिकेकडून हरितक्रांतीच्या दृष्टीने दुभाजकांवर झाडे लावण्याचा संकल्प हाती घेतला होता. त्यानुसार दुभाजकांमध्ये झाडे लावण्यात आली. पाण्याअभावी काही झाडे वाळून गेली होती. मात्र महापालिका आयुक्तांनी याची दखल घेऊन झाडे जगविण्यासाठी प्रयत्न केले. दरम्यान राज्योत्सवावेळी त्याच झाडांना तुडविण्यात आल्याने झाडांची नासधूस झाली आहे. परिणामी झाडे नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. याकडे लक्ष देऊन झाडे जगविण्यासाठी महापालिकेने पावले उचलण्याची आवश्यकता आहे.