For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दोन बळी घेऊन सुद्धा डंपर अपघात स्थळीच

01:17 PM Sep 03, 2025 IST | Radhika Patil
दोन बळी घेऊन सुद्धा डंपर अपघात स्थळीच
Advertisement

आळसंद / संग्राम कदम :

Advertisement

गेल्या दोन दिवसांपासून कुंडल विटा रस्त्यावर खंबाळे (भा) गावाजवळ उभ्या असलेल्या डंपरला सोमवारी सकाळी व रात्री पाठीमागून धडकून दोघा जणांचे बळी गेले. सोमवारी सकाळी झालेल्या अपघातात विटा येथील महेंद्र पांडुरंग शितोळे यांची मोटरसायकल पाठीमागून डंपरला धडकली. या धडकेत यांचा जागीच जीव गेला.

तर रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास आळसंद येथील अरलम मुल्ला हे आपल्या कुंटुंबासोबत अल्टो या चारचाकी गाडीने गणपती बघण्यासाठी विट्याला निघाले होते. त्यांचाही गाडीची याचं डंपरला पाठीमागून जोराची धडक बसली. यामध्ये अरलम मुल्ला हे जागीच ठार झाले. पण हा डंपर सोमवारीच येथून पोलिसांनी हलवला असता तर दुसरी घटना घडली नसती. आता या दुसऱ्या घटनेला जबाबदार कोण आणि सोमवारी एका दिवसात दोन बळी जाऊन सुद्धा मंगळवारी सायंकाळी सहावाजेपर्यंत हा डंपर आहे त्या जागीच उभा होता. मग अजून किती जणांचा बळी जायची वाट पोलीस बघत आहेत, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Advertisement

संबंधित डंपर रविवारपासूनच रस्त्याच्या कडेला पंक्चर झालेल्या अवस्थेत उभा होता. पण येणाऱ्या वाहन चालकाला सकाळच्या वेळी व अंधारात या डंपरचा अंदाज आला नाही. सकाळी विटा येथील महेंद्र पांडुरंग शितोळे हे आंधळी (ता.पलूस) येथून आपल्या नातेवाईकांकडून विटा येथे आपल्या घरी निघाले होते. त्यांना रस्त्याकडेला उभ्या असलेल्या डंपरचा अंदाज न आल्याने शितोळे यांनी या डंपरला जोराची धडक दिली. या धडकेत ते जागीच ठार झाले. यावेळी पोलिसांनी येऊन या ठिकाणचा पंचनामा केला. पण हा डंपर पोलीस ठाण्यात नेण्याची तरती घेतली नाही. याचं दिवशी रात्री आळसंद येथील अस्लम मुलांनी हे आपल्या कुंटुंबासोबत गणपती बघायला विट्याला निघाले होते. त्यांना ही या रस्त्याकडेला उभा असलेल्या डंपर न दिसल्याने त्याची अल्टो गाडी पाठीमागे जाऊन धडकली. ही धडक इतकी जोराची होती की अस्लम मुलाणी हे जागीच ठार झाले. तसेच पत्नी वहिदा, मुलगा व मुलगी हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सांगली येथे उपचार सुरू आहेत. पण या गंभीर दोन घटना बारा तासाच्या होऊन सुध्दा पोलिसांनी याकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही. या सलग भीषण अपघातामुळे स्थानिक नागरिक संतप्त झाले असून रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या वाहनांमुळे प्रवाशांना मोठा धोका निर्माण होत असल्याचे त्यांनी सांगितले. डंपर मालक व चालकाच्या निष्काळजी पणामुळे दोन निष्पाप बळी गेले. यासाठी जबाबदारावर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

रात्री उशिरा घटनास्थळी पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी भेट देऊन पाहणी केली होती. अपघाताची माहिती घेऊन पंचनामा ही केला होता. पण त्यांनी कडक पाऊले उचलून व कर्मचाऱ्यांना सांगून येथून डंपर हलवायला पाहिजे होता, असी घटनास्थळी मंगळवारी चर्चा सुरू होती.

  • पोलिसांना क्रेन मिळेना...

याबाबत विटा येथील पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, हा डंपर अवजड असून विटा व तासगाव येथे क्रेन मिळत नसल्यामुळे हा डंपर पोलीस स्टेशनला नेहता येत नाही. आम्ही कराडच्या क्रेनवाल्याशी संपर्क साधला आहे. कराडहून क्रेन आल्यानंतर आम्ही हा डंपर पोलीस स्टेशनला घेऊन जाणार आहे. पण हेच अधिकारी सोमवारी रात्री म्हणाले होते की, तासगाववरून क्रेन यायला लागली आहे. क्रेन आली आम्ही हा डंपर घेऊन जाणार आहे. दोन बळी जाऊन सुध्दा पोलीस अधिकाऱ्यांना क्रेन मिळत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

  • डंपरची हवा सोडली का पंक्चर झाला..

या पंक्चर झालेल्या डंपरला दोन दिवसांत पंक्चर काढता का आली नाही व काढण्याचा प्रयत्न का केला गेला नाही. हा डंपर मुरमाने भरलेला आहे. मग तो कुठल्या प्रशासनाने पकडून या डंपरची हवा सोडली की तो पंक्चर झाला, याची चर्चा दबक्या आवाजात घटनास्थळी सुरू होती. काहीजण तर हा डंपर पोलिसांनी पकडला आहे व त्यांनीच हवा सोडली आहे, असे म्हणत होते.

Advertisement
Tags :

.