हैदराबादमध्ये मंदिरातील मूर्तीची विटंबना
भाजपकडून कठोर कारवाईची मागणी
वृत्तसंस्था/ हैदराबाद
तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये पासपोर्ट कार्यालयानजीक कुर्मागुडामध्ये मुथ्यालम्मा मंदिरात मूर्तीची विटंबना करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. घटनेनंतर स्थानिक लोकांनी एका इसमाला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्तांनी दिली आहे. तर मूर्तीच्या तोडफोडीच्या विरोधात स्थानिक लोकांनी सोमवारी मंदिराबाहेर निदर्शने करत आरोपींच्या विरोधात कारवाईची मागणी केली आहे.
केंद्रीय मंत्री आणि तेलंगणा भाजप अध्यक्ष जी. किशन रेड्डी यांनी मुथ्यालम्मा मंदिरात धाव घेतली आहे. मूर्तीची विटंबना ही दुसऱ्या समुदायाशी संबंधित व्यक्तीने केली आहे. हा प्रकार धक्कादायक आहे. तो चोरी करण्याच्या नव्हे तर हिंदू समाजाचा अपमान करण्याच्या उद्देशाने आला होता. हैदराबादमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी अशा घटना घडत आहेत. काही लोक जाणूनबुजून हैदराबादमध्ये तणाव निर्माण करण आणि सांप्रदायिक दंगली घडवून आणण्यासाठी असे करत असल्याचा आरोप रेड्डी यांनी केली आहे.
याप्रकरणी मी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत. मूर्ती तोडफोडीच्या विरोधात विस्तृत चौकशी व्हायला हवी. आगामी काळात हैदराबादच्या सर्व मंदिरांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जावेत. गरज पडल्यास पिकेट लावण्यात यावे आणि संवेदनशील भागांमध्ये सुरक्षा पुरविण्यात यावी असे जी. किशन रेड्डी यांनी म्हटले आहे.