जात-संप्रदायावर अपमानास्पद टिप्पणी अस्वीकारार्ह
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांचा इशारा : मोजावी लागणार मोठी किंमत
वृत्तसंस्था/ लखनौ
कुठल्याही जात, पंथ, धर्म किंवा संप्रदायाशी निगडित देवी-देवता, महापुरुष किंवा साधू-संतांच्या विरोधात अपमानास्पद टिप्पणी अस्वीकारार्ह आहे, परंतु विरोधाच्या नावावर अराजकता देखील सहन केली जाणार असल्याचा इशारा उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सोमवारी दिला आहे. सणांच्या पार्श्वभूमीवर मुख्य सचिव, पोलीस महासंचालक, अप्पर मुख्य सचिव (गृह) तसेच अन्य विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत योगींनी कायदा-सुव्यवस्थेची समीक्षा केली आहे.
प्रत्येक पंथ, संप्रदायाच्या श्रद्धेचा आदर केला जावा. महापुरुषांबद्दल प्रत्येक नागरिकाच्या मनात कृतज्ञतेचा भाव असायला हवा. परंतु याकरता बळजबरी केली जाऊ शकत नाही आणि बळजबरीने स्वत:ची श्रद्धा इतरांवर थोपता येणार नसल्याचे योगींनी म्हटले आहे. अराजकतेच्या नावावर तोडफोड, जाळपोळ सहन करण्यात येणार नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.
कुठलाही व्यक्ती जर श्रद्धेला ठेच पोहोचवित असेल, महापुरुष, देवी-देवता, संप्रदाय इत्यादींच्या श्ा़dरद्धेच्या विरोधात अभद्र टिप्पणी करत असेल तर त्याला कायद्याच्या कक्षेत आणून कठोर शिक्षा मिळवून दिली जाणार आहे, परंतु सर्व पंथ, धर्म, संप्रदायांच्या लोकांना परस्परांचा सन्मान करावा लागणार आहे. विरोधाच्या नावावर कुणी दुस्साहस करत असेल तर त्याला त्याची किंमत मोजावी लागणार असल्याचा इशारा योगी आदित्यनाथ यांनी दिला आहे.
सणांवरून दिशानिर्देश
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पोलीस प्रशासनाला शारदीय नवरात्री विजयादशमीचा सण आनंदात, शांतता आणि सौहार्दपूर्ण वातावरणात होईल याची खबरदारी घेण्याचा निर्देश दिला आहे. वातावरण बिघडवू पाहणाऱ्या घटकांची ओळख पटवून कठोर कारवाई करण्यात यावी. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांच्या विरोधात कठोर भूमिका घेण्यात यावी. महिला सुरक्षा सुनिश्चित करत गर्दीयुक्त भागांमध्ये फूट पेट्रोलिंग आणि पीआरव्ही 112 चे गस्त वेगवान करण्यात यावी. महिला, मुलींची सुरक्षा आणि सुविधा सुनिश्चित व्हावी म्हणून सर्व विभागांनी मिळून काम करावे असे योगींनी अधिकाऱ्यांना सांगितले आहे.
वादग्रस्त वक्तव्याची पार्श्वभूमी
गाजियाबादचे महंत यति नरसिंहानंद यांच्याकडून करण्यात आलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर उत्तरप्रदेशातील वातावरण चांगलेच तापले आहे. त्यांच्या या वक्तव्याच्या विरोधात उत्तरप्रदेश समवेत अनेक राज्यांमध्ये निदर्शने झाली आहेत. तर गाजियाबादपासून हैदराबादपर्यंत अनेक ठिकाणी त्यांच्या विरोधात एफआयआर नोंदविण्यात आले आहेत. डासना मंदिराबाहेर मोठ्या संख्येत पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तत्पूर्वी नरसिंहानंद यांच्या वक्तव्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर मोठ्या संख्येत लोक गाजियाबाद येथील डासना देवी मंदिराबाहेर जमा झाले होते आणि त्यांना आक्षेपार्ह घोषणाबाजी केली होती. यति नरसिंहानंद यांना पोलिसांनी शनिवारीच ताब्यात घेतले आहे.