डेराप्रमुख राम रहीम 15व्यांदा पॅरोलवर मुक्त
वृत्तसंस्था/ रोहतक
साध्वींच्या लैंगिक शोषण आणि पत्रकाराच्या हत्येप्रकरणी रोहतकच्या सुनारिया तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहीम पुन्हा एकदा तुरुंगातून सुटला आहे. त्याला 40 दिवसांचा पॅरोल मंजूर करण्यात आला असून सोमवारी तो कडक सुरक्षा व्यवस्थेपत आपल्या आश्रमाच्या ठिकाणी पोहोचला. शिक्षा सुनावल्यापासून त्याला तब्बल 15 वेळा पॅरोल मंजूर करण्यात आला असून आता त्याची पॅरोल रजा 406 दिवसांवर पोहोचली आहे. यापूर्वी पंचकुला येथील सीबीआय न्यायालयाने ऑगस्टमध्ये त्याला पॅरोल मंजूर केला होता.
2025 मध्ये राम रहीम 91 दिवसांसाठी तुरुंगाबाहेर होता. आतापर्यंत दिलेले पॅरोल सहसा एक-दोन दिवस किंवा एक-दोन आठवड्यांसाठी नसून एका महिन्यासाठीही दिलेले आहेत. 2025 मध्ये देखील, राम रहीमला वर्षाच्या सुरुवातीला, 28 जानेवारी ते 28 फेब्रुवारी या कालावधीत पूर्ण महिना पॅरोल मिळाला. त्यानंतर, तो तुरुंगात परतल्यानंतर केवळ 40 दिवसांत पुन्हा दुसऱ्यांदा पॅरोल मिळाला होता. राम रहीमला 2017 मध्ये डेरा सच्चा सौदाच्या दोन महिलांच्या लैंगिक शोषणासाठी दोषी ठरवण्यात आले होते. 2017 मध्ये त्याला 10 वर्षांची शिक्षा आणि मोठा आर्थिक दंड ठोठावला होता. सीबीआयने सहा वर्षांनंतर या प्रकरणात पीडितांचे जबाब नोंदवले. हे लैंगिक शोषण 1999 मध्ये झाले होते, परंतु पीडितांचे जबाब 2005 मध्ये नोंदवण्यात आल्यानंतर न्यायालयाने राम रहीमला दोषी ठरवले होते.