उपअभियंता अजित पाटील यांना शासनाचा प्रतिष्ठेचा पुरस्कार जाहीर
उल्लेखनीय कामगिरीबाबत शासनाकडून सन्मान ; मंत्र्यांच्या उपस्थितीत लवकरच होणार पुरस्काराचे वितरण
मालवण : प्रतिनिधी
सार्वजनिक बांधकाम विभागातील उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या तांत्रिक व अतांत्रिक संवर्गातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना सन २०२४-२०२५ या कालावधीसाठी देण्यात येणारे पुरस्कार शासनाच्या वतीने जाहीर करण्यात आले. सार्वजनिक बांधकाम विभाग मालवणचे उपअभियंता अजित पाटील यांनाही हा प्रतिष्ठेचा पुरस्कार जाहीर झाला आहे. मंत्री महोदयांच्या उपस्थितीत लवकरच पुरस्कारांचे वितरण होणार आहे.सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत रस्ते, पूल, विविध विभागांच्या इमारती व इतर सार्वजनिक बांधकामे करण्यात येतात. इमारती/पुलांची संकल्पना तयार करुन व इतर माध्यमांचा म्हणजे संगणकाचाही उपयोग करुन संकल्पनाचित्रे बनवताना तसेच, सार्वजनिक इमारतीची विद्युतीकरणाची कामे करताना व प्रकल्प राबविताना जे तांत्रिक कौशल्य पणाला लागते आणि ज्यामुळे अशा अभियंत्यांची सेवा समाजाला भविष्यात फायद्याची ठरते, अशा अभियंत्यांचे प्रशासकीय तसेच तांत्रिक कौशल्य लक्षात घेऊन त्यांचा वैयक्तिक पुरस्कार देऊन गौरव करण्यात येतो. भारतरत्न सर विश्वेश्वरय्या यांचा १५ सप्टेंबर हा जन्मदिवस दरवर्षी "अभियंता दिन" म्हणून साजरा करण्यात येतो. त्यानिमित्ताने उल्लेखनीय कामगिरी केलेल्या अभियंत्यांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात येते.सार्वजनिक बांधकाम विभागातील उल्लेखनीय कामगिरी केलेल्या तांत्रिक व अतांत्रिक संवर्गातील खालील विवरणपत्रात नमूद अधिकारी व कर्मचारी यांना सन २०२४-२५ या कालावधीकरीता वैयक्तिक सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र प्रदान करुन गौरव करण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्य स्तरावर हा सन्मान निश्चितच प्रतिष्ठेचा असाच आहे. शांत, संयमी आणि आदर्शवत सेवा बजावणारे अधिकारी अशी ओळख अजित पाटील यांनी आपल्या कार्यातून निर्माण केली. त्यांना मिळालेला पुरस्कार त्यांच्या आदर्शवत सेवेचा सन्मान आहे.