उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांना ईडीकडून समन्स
पाटणा
ईडीने बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांना चौकशीसाठी नवा समन्स पाठविला आहे. तेजस्वी यांना 5 जानेवारी रोजी दिल्लीतील ईडीच्या मुख्यालयात चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. यापूर्वी ईडीकडून तेजस्वी यांना 22 डिसेंबर रोजी हजर राहण्यास सांगण्यात आले होते. परंतु तेजस्वींनी चौकशीच्या प्रक्रियेत भाग घेतला नव्हता. तर दुसरीकडे ईडीने 27 डिसेंबर रोजी लालूप्रसाद यादव यांना दिल्लीतील मुख्यालयात चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे. जमिनीच्या बदल्यात नोकरी देण्याचा घोटाळा आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी तेजस्वी आणि लालूप्रसाद यादव हे मुख्य आरोपी आहेत. लालूप्रसाद यादव आणि तेजस्वी यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील अनेक सदस्यांची ईडीकडून यापूर्वीही चौकशी करण्यात आली आहे. तर काही दिवसांपूर्वी लालूप्रसाद यांच्या कुटुंबीयांशी जवळीक असलेल्या आरोपींनी दिलेल्या माहितीच्या आधारावर ईडी आता तेजस्वी यादव यांची अधिक चौकशी करू पाहत आहे.
जमिनीच्या बदल्यात नोकरी देण्याचा घोटाळा सुमारे 600 कोटी रुपयांचा आहे. तपासादरम्यान आतापर्यंत सुमारे 250 कोटी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंगशी संबंधित पुरावे आणि अवैध व्यवहारासमवेत सुमारे 350 कोटी रुपयांच्या अवैध संपत्तीशी निगडित इनपूट्स प्राप्त करण्यात आले आहेत.