जुनी पेन्शन योजनेबाबत लवकरच अध्यादेश काढणार! टप्पा अनुदानाबाबत लवकरच निर्णय घेऊ
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आमदार असगावकर यांना ग्वाही
कोल्हापूर /प्रतिनिधी
कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना व टप्पा अनुदान देण्याचा निर्णय आमच्या सरकारने घेतला आहे .याबाबतचा अध्यादेश लवकरच काढणार अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदार जयंत आसगावकर यांना दिली. जुनी पेन्शन योजना टप्पा अनुदान यासह शिक्षण क्षेत्रातील अनेक प्रलंबित प्रश्नाबाबत आमदार जयंत आसगावकर शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करत आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री नामदार अजितदादा पवार कोल्हापूर दौऱ्यावर आले असता आमदार आसगावकर यांनी त्यांची भेट घेऊन कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी व टप्पा अनुदानावरील शाळांनाअनुदानाचा पुढील टप्पा द्यावा अशी मागणी केली .यावेळी नामदार अजितदादा पवार म्हणाले नागपूर अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस व आपण तुमच्या मागणी बाबतीत निर्णय घेतलेला आहे. लवकरच २००५ पूर्वीच्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करण्याबाबतचा अध्यादेश काढण्यात येईल. त्याचबरोबर ३ जानेवारी २०२४ पासून वाढीव टप्पा अनुदान मिळण्यासाठी शिक्षक समन्वय संघाचे मुंबई येथील आझाद मैदानावर आंदोलन सुरू आहे.याबाबत लवकर तोडगा काढावा व पुढील टप्पा अनुदान जाहीर करावे आशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे आमदार जयंत आसगावकर यांनी केली.यावेळी याबाबत सरकारला पूर्ण कल्पना असून याबाबतचे सरकार लवकरच निर्णय घेईल अशी ग्वाही नामदार अजित पवार यांनी यावेळी दिली.
निर्णय घेतला आहे जरासा धीर धरा
शिक्षण क्षेत्रातील प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी आमदार आसगावकर यांची असणारी आग्रही भूमिका पाहून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार म्हणाले आमदारसाहेब जरासा धीर धरा आम्ही निर्णय घेतलाच आहे, लवकरच अध्यादेश काढतो. अशा अगदी स्पष्ट शब्दांमध्ये अजितदादा पवार यांनी अगदी होकारात्मक व विश्वासात्मक संवाद साधला आहे.
यावेळी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन कोर कमिटी व शिक्षण संघर्ष संघटनेचे कार्याध्यक्ष सुदेश जाधव कोल्हापूर, कोल्हापूर जिल्हा काँग्रेस सेलचे जिल्हाध्यक्ष विजय जाधव, टप्पा अनुदान शाळेचे कार्यकर्ते को.जि.मा.शी पतपेढीचे संचालक शिवाजीराव लोंढे, कोल्हापूर जिल्हा क्रीडा संघटनेचे सचिव संदीप पाथरे यांचे सहशिक्षक कर्मचारी उपस्थित होते