शिवसृष्टी आराखड्याच्या आर्थिक तरतुदीला उपमुख्यमंत्री अजित पवारांची मान्यता
मालवण राजकोट येथे भव्य शिवसृष्टी उभारणार ; पालकमंत्री नितेश राणेंची आग्रही भूमिका
मुंबई । प्रतिनिधी
मालवण राजकोट येथे शिवसृष्टी उभारण्या संदर्भात उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या मंत्रालयातील दालनात आज बैठक पार पडली.या बैठकीत नियोजित शिवसृष्टी आराखड्याच्या आर्थिक तरतुदीला मान्यता देण्यात आली.या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार हे दूरदृष्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.या शिवसृष्टीला अंदाजे ८३.४५ कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित असून आराखड्याच्या आर्थिक तरतुदीला मान्यता देण्यात आली आहे.पालकमंत्री नितेश राणे यांनी ही शिवसृष्टी लवकर होण्यासाठी आग्रही भुमिका मांडली.सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे व संबंधित अधिकारी बैठकीला उपस्थित होते.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण राजकोट येथे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्यामुळे पर्यटनाला भरघोस चालना मिळत आहे.पर्यटकांचा तेथे ओघ पाहता पुतळ्याच्या आजुबाजूचा परिसर सुशोभित करून शिवसृष्टी उभारण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे प्रयत्नशील व आग्रही होते.आज या बैठकीत संभाव्य शिवसृष्टीचे सादरीकरण करण्यात आले.सादरीकरण पाहून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना काही सूचना केल्या. ही शिवसृष्टी उभारतांना तेथील वाऱ्याच्या वेगाचा विचार करून निर्मिती करावी असे निर्देश ही उपमुख्यमंत्री अजितदादांनी दिले.