For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

डिप्रेशन

06:52 AM Sep 23, 2026 IST | Tarun Bharat Portal
डिप्रेशन
Advertisement

मागच्या लेखामध्ये भावनिक मोजपट्टी कशी तयार करायची हे आपण पाहिले होते. केवळ डिप्रेशनच नाही तर आपले मानसिक आरोग्य सुदृढ ठेवण्याच्या दृष्टीने अशी मोजपट्टी फार आवश्यक आहे त्या दृष्टीने आपण ती परत पाहुया..

Advertisement

अशी एक भावनिक मोजपट्टी आपणच तयार करायची. यातील शून्य ही स्थिती (वाईटही नाही आणि चांगलेही नाही) अर्थात बॅलन्स स्थिती दर्शविते. यातील अधिक अंकाची बाजू ही किती चांगले वाटते आहे याकडे जाणारी आणि वजा अंकाची बाजू ही नकारात्मक विचार-भावना येणे, उदास वाटणे या गोष्टी दर्शविणारी आहे. अशी मोजपट्टी तयार करुन रोज मनात डोकावून पहायचे आणि आपली तुलना आपल्यासोबतच करायची. त्याची नोंद करायची.

कधीतरी उदास वाटणे, मूड नसणे, काही नकारात्मक भावना विचार येणे हे अगदी नैसर्गिक आहे. म्हणजेच त्याची तीव्रता पाहता -1 ,-2 ही स्केल नैसर्गिक आहे. उदा. एखादा कोव्हिड आजार वेगाने पसरतोय तर वाटणारी काळजी ही स्वाभाविक आहे. हा आजार मलाही होईल का? हा विचार त्यावेळी येतो. आपण समजा -1 या पट्टीवर आहोत..ओके. परंतु त्या विचाराची, काळजीच्या भावनेची तीव्रता, वारंवारता, कालावधी हे वाढत जात नाही ना? याकडे लक्ष हवे. म्हणजे मला तो आजार होईल का हा विचार वारंवार मनात यायला लागला आणि त्याचे चिंतेत रुपांतर होऊ लागले तर आपण -3,-4 या स्केलवर जातो आहोत. ते कमी करण्यासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्याची जाणीव आणि वेळीच घेतलेली खबरदारी यामुळे सतत वजा बाजूला राहणे म्हणजेच औदासीन्याच्या दिशेने होणारा प्रवास टाळता येईल.

Advertisement

खरंतर ताणविरहित जीवन नसते. परंतु ताणाचे प्रमाण योग्य हवे. जर आपल्याला अजिबातच काळजी वाटली नाही तर बेफिकीरीच्या दिशेने आपला प्रवास सुरु होईल त्यामुळे गतीसाठी योग्य प्रमाणात ताण आवश्यक आहे. परंतु त्याचे प्रमाण वाढत नाही ना? याकडे या भावनिक मोजपट्टी द्वारे आपण लक्ष ठेऊ शकतो. वजा बाजूकडे जास्त वाटचाल होत असेल तर ते आपल्या लक्षात आल्याने योग्य वेळी मानसिक आरोग्य सुदृढ राखण्यासाठी प्रयत्न करता येतील.

खरंतर आपले मानसिक आरोग्य तपासण्यासाठी स्वत:ला काही प्रश्न विचारणेही आवश्यक आहे.

  1. आपण स्वत:शी स्वस्थ आहोत का?

2.इतरांना आपल्या सहवासात स्वस्थ वाटते का?

3.आपल्यातल्या उणीवांचा शोध घेऊन त्या दूर करण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्नशील आहोत का?

याची उत्तरे नकारार्थी आल्यास मानसिक आरोग्यात काहीतरी बिघाड झाला आहे हे लक्षात घ्यायला हवे.

तसेच आपले ध्येय वास्तववादी ठेवण्यासाठी प्रयत्नशील असायला हवे.

एखादा छंद वा आवड जोपासणे

हलका व्यायाम, प्राणायाम, आपल्या मनात येणाऱ्या विचार भावना उत्सुकतेने न्याहाळणे, श्वासावर लक्ष केंद्रीत करत हालचाल नैसर्गिक श्वसनासोबत होणारी छाती पोटाची हालचाल जाणणे हे दररोज न चुकता करायला हवे.

1) आपण व्यक्त होऊ शकतो असे मित्र-मैत्रिणी जोडायला हवेत 2) होणारे बदल लक्षात घेऊन टाळाटाळ न करता योग्य व्यक्तीचा सल्ला घेणे आवश्यक 3) शरीरासारखे मनही आजारी पडू शकते याचा स्विकार 4) नकारात्मक भावनांची तीव्रता, वारंवारता, कालावधी कमी करण्याच्या दृष्टीने प्रयत्न आवश्यक आहेत.

मानसिक प्रथमोपचाराच्या दृष्टीने प्रयत्नशील राहणे गरजेचे आहे-

‘मानसिक प्रथमोपचार’ ही संकल्पना रुजविताना, आधार देताना भावनांची सजगता, हाताळणी ही कौशल्ये आपण स्वत: शिकणे आणि त्या व्यक्तीला ती आत्मसात करायला मदत करणे आवश्यक आहे. अशी मदत करायची असेल तर ‘न बोलता ऐकु येणारे कान’ तयार करणे आवश्यक आहे. म्हणजेच एखाद्या व्यक्तीमध्ये वरील पैकी काही लक्षणे दिसत आहेत, बदल जाणवत आहेत तर त्या व्यक्तीजवळ, त्या व्यक्तिच्या नातेवाईकांसोबत चर्चा करुन या भावनांची वारंवारता, तीव्रता, कालावधी जाणून घेणे गरजेचे आहे.

मागच्या दोन्ही लेखांमध्ये आपण डिप्रेशनची लक्षणे पाहिली होती. तशी लक्षणे एखाद्या व्यक्तीमध्ये दिसली तर जागरुकतेने आपण त्याच्याशी संपर्क साधायला हवा. हे करत असताना कदाचित तुमचे मित्र मैत्रीणी, कुटुंबीय याच्याकडून ‘लष्कराच्या भाकऱ्या भाजतो’ असे सूर कानावर पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु आपण आपल्या ध्येयावर ठाम रहात त्या व्यक्तीसाठी काय करता येईल याचा विचार करणे गरजेचे आहे.

1.डिप्रेशनच्या रुग्णाला भावनिक आधाराची गरज असते. 2.उपदेश न करता ती व्यक्ती काय म्हणते आहे ते ऐकुन घेणे. 3.त्या व्यक्तीच्या मनात मी आहे. हा आश्वासक भाव निर्माण करणे आवश्यक आहे. 4.त्या व्यक्तीला होणारा त्रास लक्षात आल्यावर कुटुंबियांना विश्वासात घेऊन त्यांच्यासोबत संवाद साधत त्या व्यक्तीला गरजेनुसार समुपदेशक वा मानसोपचार तज्ञांकडे जाण्यास राजी करणे.

5.फोनच्या माध्यमातून त्या व्यक्तीच्या संपर्कात राहणे गरजेचे.

समजा डिप्रेशनच्या उंबरठ्यावर एखादी व्यक्ती असेल. उदा. हल्ली जरा अस्वस्थ वाटतंय, मन लागत नाही, मन विचारात भरकटते, उदासी जाणवते असं जर कुणी आपल्याला वारंवार सांगत असेल तर..वरती दिलेल्या भावनिक पट्टीनुसार ती व्यक्ती नेमकी कुठे आहे हे पाहण्यासाठी आपण तिला मदत करु शकतो.

त्या व्यक्तीच्या नातेवाईंकांपर्यंत पोहचून ती व्यक्ती नेमकी कशी वागते आहे. तिच्या नजीकच्या संपर्कातील कुणाला काय बदल जाणवतात हेही जाणून घेऊ शकतो.

जसं की अलिकडेच ती/तो थोडा अलिप्त राहतोय.. काहीतरी बदलतंय हे लक्षात येत आहे. थोडं उदास वाटतं अशी सौम्य पध्दतीची लक्षणे असतील तर मन दुसरीकडे वळवणारे छंद जोपासणे, मनातील भावना विचार याकडे लक्ष देत त्याच्यातून वेगळे करण्याचे कौशल्य शिकवणे यामधूनही ती व्यक्ती बाहेर येऊ शकते. समजा त्या व्यक्तीची चिडचिड होते आहे, झोप लागत नाही, निराशा वाटते आहे तर अशावेळी वरील गोष्टींसोबतच त्या व्यक्तीला समुपदेशनासाठी तयार करणे, समुपदेशकांकडे जाण्यासाठी प्रेरीत करणे गरजेचे आहे.

डिप्रेशनची बऱ्यापैकी लक्षणे आहेत तर समुपदेशन व मानसोपचार याची सांगड घालणे आवश्यक ठरते. मानसोपचार तज्ञांच्या मदतीने डिप्रेशनवरील उपचार व समुपदेशन यामुळे ती व्यक्ती योग्य ट्रॅकवरती येऊ शकते. डिप्रेशन तीव्र स्वरुपातील असेल तर नातेवाईकांना सोबत घेत, समजावत तात्काळ मनोविकारतज्ञांची मदत, व्यवस्थित उपचार घेणे, त्या उपचारांमध्ये तज्ञांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार सातत्य ठेवणे, खंड न पडू देणे या गोष्टीही आवश्यक आहेत. त्यासाठी आपण त्या व्यक्तीच्या कुटुंबियांच्या संपर्कात राहू शकतो.

आपण काय करु शकतो-

कनेक्ट-अशा व्यक्तीला मी सोबत आहे या भावनेने आश्वस्त करणे

काउन्ट-तू माझ्यासाठी महत्त्वाचा आहेस ही भावना आपल्याला शक्य असेल तर आपण नाहीतर त्याच्या नातेवाईकांच्या माध्यमातून त्या व्यक्तीपर्यंत पोहचविणे गरजेचे आहे.

कॅपॅबिलीटी-तु सक्षम आहेस, हे तु नक्कीच करु शकशील ही भावना त्या व्यक्तीच्या मनात निर्माण करणे.

करेज-म्हणजेच ‘आताचे दिवसही निघून जातील’. तू नक्कीच या परिस्थितीतून पुढे प्रगतीच्या दिशेने जाशील हा उद्याचा आशेचा किरण निर्माण करणे.

अशा पध्दतीने भावनांची सजगता वाढविण्याच्या दृष्टीने आपण समाजासाठी काम केले तर निश्चितच मनोविकारांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्यास मदत होईलच आणि गरज असलेल्या व्यक्तीला योग्य वेळी योग्य मार्गदर्शन मिळून सामाजिक आरोग्यही निकोप राहण्यास मदत होईल हे मात्र निश्चित!

अॅड सुमेधा देसाई

Advertisement
Tags :

.