डिप्रेशन
मागच्या लेखात आपण हे जाणून घेतले की उदासीनता वा औदासीन्य हा मनोविकार आहे. अनेकदा औदासीन्य(डिप्रेशन) आणि नैराश्य(फ्रस्ट्रेशन) या दोन संज्ञा बरेच जणं एकाच अर्थाने वापरतात. वस्तुत: या दोन्ही संज्ञा भावनेशी निगडीत असल्या तरी त्यांच्या तीव्रतेमध्ये फरक आहे. फ्रस्ट्रेशन म्हणजे अपेक्षाभंगामुळे आलेले वैफल्य वा नैराश्य तर डिप्रेशन म्हणजे टोकाचे औदासीन्य. फ्रस्ट्रेशन ही डिप्रेशनची पहिली पायरी आहे.
मानसिकदृष्ट्या सामान्य वर्तन आणि अपसामान्य (अॅबनॉर्मल)वर्तन कोणते हे ठरवणारी सीमारेषा स्पष्ट नसली तरी मनोविकाराकडे वाटचाल करणाऱ्या व्यक्तीची काही वैशिष्ट्यो, लक्षणे, डिप्रेशनचे प्रकार हे सारे आपण समजून घेतले. डिप्रेशन ज्यावेळी सौम्य प्रमाणात असते त्यावेळी केवळ समुपदेशनानेही त्यावर मात करता येते. परंतु त्याची जाणीव आणि योग्य दिशेने केलेले प्रयत्न खूप गरजेचे आहेत. समुपदेशनामध्ये विचारशैलीत बदल कसा घडवून आणायचा, भावनांना आवर घालण्यासाठी काय करायचे हे शिकवीले जाते. मात्र डिप्रेशन मध्यम वा तीव्र असेल तर औषधउपचारांना पर्याय नसतो. मेंदूत उद्भवलेला जैवरासायनिक असमतोल औषधांनी घालवता येतो. काही वेळा समुपदेशन व मानसोपचारांची जोड देऊनही समस्या सोडविण्यास मदत केली जाते.
योग, ध्यान अर्थात लक्ष देण्याचे कौशल्य विकसीत करणे, विचार, भावनांची सजगता यासाठी सजगतेची तंत्र शिकविणे, वर्तन उपचारांच्या माध्यमातून इष्ट वर्तन शिकवणे आदी अनेक थेरेपींची मदत घेतली जाऊ शकते. खरंतर केव्हा ना केव्हातरी प्रत्येकाच्या आयुष्यात निराशा येत असते. आपल्या मनाची ताकद वापरुनही आपण त्यावर मात करु शकतो. परंतु त्यासाठी काही गोष्टी आवर्जुन लक्षात घेणे आणि त्याबाबत सुरवातीपासूनच प्रत्येकानेच सजग असणे गरजेचे आहे.
आपण आपल्या शरीराची जशी काळजी घेतो. ते सुंदर रहावं, फिट रहावं म्हणून धडपडतो. तसंच मन सुंदर रहावं, निरोगी रहावं म्हणून प्रत्येकाने दररोज मनाच्या स्वच्छतेकडे लक्ष देणे आणि त्या दृष्टीने प्रयत्न करणे गरजेचे आहे.
डिप्रेशनमध्ये आढळणाऱ्या मुख्य तीन भावना-
होपलेसनेस- अगदी निराश वाटणे, कशातच काही रस न वाटणे.
हेल्पलेसनेस- हतबलता जाणवणे
वर्थलेसनेस- स्वत:ची काही किंमत नाही असे वाटणे.
सामान्यत: डिप्रेशनची आढळणारी लक्षणे-
उदास भावना हा या मनोवृत्तीचा केंद्रबिंदू आहे. बऱ्याचदा निराश वा उदास वाटणे
आत्मविश्वास ढळणे, कमीपणा वाटणे
मनोरंजनाचा आस्वाद न घेता येणे, नीरस वाटणे
उदास मूड सोबतच चिडचिड, काळजी, अनाठायी चिंता, क्वचित मंत्रचळेपणा(ऑबसेशन)ही लक्षणेंदेखील आढळतात.
निद्रानाश, शारिरीक हालचाली मंदावणे
भूक कमी लागणे वा अती लागणे
सतत थकवा वाटणे
एकाग्रता कमी होणे, चटकन निर्णय न घेता येणे
स्वत:बद्दल कमीपणाची, हीनपणाची, अपराधीपणाची भावना वाटणे
आत्महत्येचा विचार किंवा प्रयत्न
काही वेळा सतत डोकेदुखी, पोटदुखी अशा शारिरीक तक्रारी जाणवतात पण त्यामागे नैराश्य दडलेले असू शकते.
काही रुग्णांना अशा नैराश्याबरोबर कानांमध्ये आवाजाचे भास होणं, भास भ्रमाची लक्षणेही आढळू शकतात. ही लक्षणं ‘सायकॉटिक’ म्हणजे वास्तवाशी सुसंगत नसतात या प्रकाराला सायकॉटिक डिप्रेशन असेही म्हणतात.(हा डीप्रेशनचा प्रकार अधिक तीव्र असतो. आत्महत्येचा अधिक धोका असतो)
डिप्रेशनबाबत काही गैरसमजही आढळतात.
सुख बोचते म्हणून डिप्रेशन येते.
अनेकदा असे म्हटले जाते ‘झालंय काय डिप्रेशन यायला? सुख बोचते तिला वा त्याला म्हणून असे झाले असेल’. मुळातच आपण हे लक्षात घ्यायला हवे की डिप्रेशन हा एक मानसिक आजार आहे. जसे आपण शारिरीक आजारावर त्याच्या तीव्रतेनुसार उपचार करतो तसेच मानसिक आजारावरही त्याच्या तीव्रतेनुसार त्यावरही उपचार घ्यावे लागतात.
दुसरा एक गैरसमज असा असतो की एकदा
डॉक्टरांकडे गेलं की आयुष्यभर औषधे पाठ सोडत नाहीत-
हा गैरसमजही सर्रास पहायला मिळतो. परंतु असे नसते. मानसिक आजाराचे योग्य वेळी निदान झाले तर
बहुतांश वेळा समुपदेशन आणि सौम्य स्वरुपाच्या उपचार नीट घेतल्यास सहा महिन्यात यातून बाहेर पडता येऊ शकते.
गरजेल तो पडेल काय..या प्रकारे आत्महत्येचा इशारा देणारा माणूस कधीच आत्महत्या करत नाही.
खरंतर ज्यावेळी असं एखादी व्यक्ती असे बोलत असेल त्यावेळी दुर्लक्ष न करता तिच्या मनातली खळबळ समजून घेणे. मी आहे. हा आश्वस्त भाव निर्माण करणे आणि त्या तीव्रतेनुसार तिला उपचारांसाठी तयार करणे गरजेचे आहे.
ताणतणावाखाली असलेल्या व्यक्तीजवळ आत्महत्येविषयी बोलल्यास त्या व्यक्तीच्या मनात आपण आत्महत्येचा विचार भरवतो.
उलट जी व्यक्ती तणावाखाली असेल त्या व्यक्तीला योग्य रीतीने प्रश्न विचारुन मन मोकळे करण्यासाठी संधीच दिली जाते. तिच्या मनात येणाऱ्या भावना, विचार कळल्यास समुपदेशनाची, उपचारांची दिशा ठरविता येते. हे लक्षात घ्यायला हवे.
डिप्रेशनच्या दिशेने वाटचाल होऊ नये म्हणून खबरदारीचे उपाय-
- भावनिक मोजपट्टी तयार करणे-
अशी एक भावनिक मोजपट्टी आपणच तयार करायची. यातील शून्य ही स्थिती (वाईट ही नाही आणि चांगले ही नाही)अर्थात बॅलन्स स्थिती दर्शविते. यातील अधिक अंकाची बाजू ही किती चांगले वाटते आहे याकडे जाणारी आणि वजा अंकाची बाजू ही नकारात्मक विचार-भावना येणे, उदास वाटणे या गोष्टी दर्शविणारी आहे. अशी मोजपट्टी तयार करुन. रोज मनात डोकावून पहायचे आणि आपली तुलना आपल्यासोबतच करायची. त्याची नोंद करायची.
कधीतरी उदास वाटणे, मूड नसणे, काही नकारात्मक भावना विचार येणे हे अगदी नैसर्गिक आहे. म्हणजेच त्याची तीव्रता पाहता -1, -2 ही स्केल नैसर्गिक आहे. उदा. एखादा कोव्हिड आजार वेगाने पसरतोय तर वाटणारी काळजी ही स्वाभाविक आहे. हा आजार मलाही होईल का? हा विचार त्यावेळी येतो. आपण समजा -1 या पट्टीवर आहोत..ओके. परंतु त्या विचाराची, काळजीच्या भावनेची तीव्रता, वारंवारता, कालावधी हे वाढत जात नाही ना? याकडे लक्ष हवे. म्हणजे मला तो आजार होईल का, हा विचार वारंवार मनात यायला लागला आणि त्याचे चिंतेत रुपांतर होऊ लागले तर आपण -3,-4 या स्केलवर जातो आहोत. ते कमी करण्यासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्याची जाणीव आणि वेळीच घेतलेली खबरदारी यामुळे सतत वजा बाजूला राहणे म्हणजेच औदासीन्याच्या दिशेने होणारा प्रवास टाळता येईल.
खरंतर ताणविरहित जीवन नसते. परंतु ताणाचे प्रमाण योग्य हवे. जर आपल्याला अजिबातच काळजी वाटली तर बेफिकीरीच्या दिशेने आपला प्रवास सुरु होईल त्यामुळे गतीसाठी योग्य प्रमाणात ताण आवश्यक आहे. परंतु त्याचे प्रमाण वाढत नाही ना? याकडे या भावनिक मोजपट्टीद्वारे आपण लक्ष ठेऊ शकतो. वजा बाजूकडे जास्त वाटचाल होत असेल तर ते आपल्या लक्षात आल्याने योग्यवेळी मानसिक आरोग्य सुदृढ राखण्यासाठी प्रयत्न करता येतील, खरंतर आपले मानसिक आरोग्य तपासण्यासाठी स्वत:ला काही प्रश्न विचारणेही आवश्यक आहे. परंतु याविषयी अधिक जाणून घेऊया पुढच्या लेखात..
अॅड सुमेधा देसाई