डिप्रेशन
सध्याच्या काळात मानसिक आरोग्याचे प्रश्न ऐरणीवरती आहेत. वेगवेगळ्या वयोगटांमध्ये उद्भवणाऱ्या विविध समस्या आपण पाहतोच आहोत. आत्महत्यांचे वाढते प्रमाण, डिप्रेशनच्या अनेक केसेस यात होणारी वाढ पाहता मानसिक आणि भावनिक आरोग्याच्या दृष्टीने सजग असणे फार गरजेचे आहे. शारिरीक सुदृढतेबाबत बोलायचे तर वजन, उंची, काम करण्याची क्षमता अशा मोजमापांच्या आधारे आपण शारिरीक आरोग्य मोजत असतो. तसंच मानसिक आरोग्याच्या दृष्टीने व्यक्तीच्या स्वभावाचे विविध पैलुंचे निरीक्षण आवश्यक असते.
रिरीक सुदृढता म्हटली की आपल्या डोळ्यासमोर पटकन् बलवान शरीरयष्टी येते परंतु निरोगी वा सुदृढ असण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला तेवढे बलवान असण्याची गरज असते का? तर नाही. तसेच निरोगी मन वा सुदृढ मन याचा अर्थ एखाद्या व्यक्तीमध्ये, स्वभावामध्ये एकही दोष नसणे, ती व्यक्ती सर्वगुणसंपन्न असणे असा नाही. व्यक्तीमध्ये त्रुटी, दोष असतातच परंतु त्याची योग्य जाणीव आणि सुधारणेच्या दृष्टीने प्रामाणिक प्रयत्न ही गोष्ट मात्र सुदृढ मानसिक आरोग्याच्या दिशेने नेणारी आहे.
एकविसावे शतक त्यातील समोर उभी ठाकलेली अनेक आव्हाने पाहता मानसिक आरोग्याच्या दृष्टीने आपण सर्वांनीच सजग असणे गरजेचे आहे. डिप्रेशनच्या उंबरठ्यावर असतानाच योग्य काळजी घेतली गेली तर भविष्यात उद्भवणाऱ्या अनेक समस्या, धोके टाळता येतात. ज्या पध्दतीने आपण भाजले, कापले तर डॉक्टरांकडे जाण्यापूर्वी प्रथमोपचार घेतो तसेच ‘नातेसंबंधाच्या माध्यमातून, भावनिक सजगता वाढविण्यासाठी प्रेरीत करुन आपण शास्त्राrय पध्दतीने मानसिक प्रथमोपचार करु शकतो’. समाजभान असलेल्या व्यक्तींनी यात सहभागी होणे गरजेचे आहे.
‘त्याचे ना कशातच लक्ष लागत नाही, जीवनातले रंग अगदी उडाल्यासारखे वाटतात त्याला..नक्कीच डिप्रेशन असणार’ असं आपण अगदी सहजतेने म्हणतो. परंतु डिप्रेशन म्हणजे काय? त्याचे प्रकार, कारणे, आपल्याला काय करता येऊ शकते याचा अगदी थोडक्यात आढावा आपण या लेखाच्या माध्यमातून घेणार आहोत.
डिप्रेशन-
उदासीनता वा औदासीन्य हा मनोविकार आहे. अनेकदा औदासीन्य(डिप्रेशन) आणि नैराश्य(फ्रस्ट्रेशन) या दोन संज्ञा बरेच जणं एकाच अर्थाने वापरतात. वस्तुत: या दोन्ही संज्ञा भावनेशी निगडीत असल्या तरी त्यांच्या तीव्रतेमध्ये फरक आहे. फ्रस्ट्रेशन म्हणजे अपेक्षाभंगामुळे आलेले वैफल्य वा नैराश्य तर डिप्रेशन म्हणजे टोकाचे औदासीन्य. फ्रस्ट्रेशन ही डिप्रेशनची पहिली पायरी आहे.
मानसिक दृष्ट्या सामान्य वर्तन आणि असामान्य (अॅबर्नार्मल)वर्तन कोणते हे ठरवणारी सीमारेषा स्पष्ट नसली तरी मनोविकाराकडे वाटचाल करणाऱ्या व्यक्तीची काही वैशिष्ट्यो सांगता येतील.
- व्यक्तीला मानसिक क्लेश असणे.
- कार्यक्षमता कमी होणे
- स्व नियंत्रण कमी होणे
- अमर्थता/दुबळेपणा निर्माण होणे.
खरंतर औदासीन्याचा विकार लहानांपासून मोठ्यांपर्यंत कोणालाही आणि केव्हाही जडू शकतो. या विकाराची लक्षणे अनेक आहेत. शारिरीक आहेत तशी भावनांशी आणि वर्तणूकीशीही निगडीत आहेत. अगदी ढोबळमानाने त्याचे वर्गिकरण पुढीलप्रमाणे-
1 ़ शारिरीक लक्षणे-
लवकर झोप न लागणे, सकाळी उठल्यावर झोप लागल्याचे समाधान न मिळणे, सतत झोपमोड होणे, अती झोप येणे, थकवा जाणवत राहणे, वजन वाढणे वा घटणे, अती भूक लागणे वा भूक मंदावणे, अकारण पाठ, डोके वा पोट दुखणे, अपचन, मरगळ इ.
2़ वर्तनाशी निगडीत लक्षणे-
गती, लय मंदावणे, निर्णयक्षमता कमी होणे, कार्यक्षमता घटणे, जबाबदाऱ्या, कपडे, नेटकेपणा स्वत:च्या दिसण्याकडे दुर्लक्ष होणे, लैंगिक इच्छा कमी होणे, कुटुंबिय, मित्र यांच्याबद्दल आस्था न वाटणे, कशातही मन न रमणे इ.
3़ भावनिकतेशी निगडीत लक्षणे-
सतत चिडचिड, एकाग्रता न साधता येणे, हताशपणा, अपराधीपणाची भावना वाढीस लागणे, चिंताग्रस्त वा निर्विकार असणे, निराशा, असहाय्यता, सतत उदासी या गर्तेत फिरत राहणे, टोकाचे नकारात्मक विचार वा आत्महत्येचा प्रयत्न करणे, इ.
इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायला हवी अनेक मानसिक विकारांच्या लक्षणांमध्ये खूप साम्य असते. बऱ्याचदा ती ओव्हरलॅप करणारी असतात. त्यामुळे आपण स्वत:च त्याचे थेट निदान न करता मानसोपचार तज्ञांची मदत घेणे हितावह ठरते. आपल्याला एखाद्या व्यक्तीत अशी लक्षणे आढळल्यास संवादाच्या माध्यमातून तिला आधार देत योग्य व्यक्तीचे मार्गदर्शन घेण्यासाठी तयार करणे आवश्यक आहे.
खरंतर प्रत्येकाच्या आयुष्यात असे काही टप्पे येत असतात की त्या दिवसात मन खिन्न होते, आयुष्यातील रंग फिके पडल्यासारखे भासू लागतात. अपयश, अपेक्षाभंग, मानहानी, विश्वासघात, ताटातूट असे छोटे मोठे प्रसंग आनंदावर विरजण पाडत असतात. जसं जसा काळ जाईल तसं दु:खाची जखम भरुन येते. परंतु डिप्रेशेनमध्ये या जखमा सतत चिघळत राहतात. अनेकदा कुठली विशेष घटना औदासीन्याला कारणीभूत आहे, असेही दिसत नाही. जसं चिंता व भीती या विकृतीमध्ये क्षुल्लक कारणावरुन किंवा कारणाशिवाय माणूस ज्याप्रमाणे भयभीत वा चिंताक्रांत होऊ लागतो, तसंच काहीसं डिप्रेशन या विकारात होतं. स्वाभाविक दु:ख व विकृत औदासीन्य यामधील फरक कधी ठळक, तर कधी पुसट असतो.
डिप्रेशनचे प्रकार-
डिस्थायमिया-(सौम्य औदासीन्य)
या प्रकारामध्ये पीडित व्यक्तीला सौम्य प्रमाणात उदास वाटत राहते. उदासीन वाटण्याचा हा कालावधी दोन वर्षांपर्यंतचा असू शकतो. मनावर नुसते दडपण असेल तरी ती व्यक्ती नित्याचे व्यवहार सुरळीतपणे पार पाडते. परंतु या औदासीन्यामुळे त्या व्यक्तीच्या कामावर, नातेसंबंधावर, समायोजनक्षमतेवर परिणाम होऊ लागतो.
मेजर डिप्रेशन-(तीव्र औदासीन्य)
उदासीनतेची लक्षणे तीव्र असतात आणि दिर्घकाळ टिकतात. दैनंदिन कामावर परिणाम होतो. तीव्र औदासीन्याचे झटके येत राहतात.
मीक्स्ड एन्झायटी डिप्रेशन-
औदासीन्यासोबतच चिंता, भीती, बेचैन वाटणे, हातापायांची थरथर, कमालीची अस्वस्थता ही लक्षणे या प्रकारात दिसतात.
बायपोलर डिप्रेशन-(द्विमनावस्था औदासीन्य)
या औदासीन्याच्या प्रकारात रुग्ण आलटून पालटून उत्तेजीतता किंवा उदासीनता अशा दोन भिन्न अवस्थांमधून जातो.
पहिल्या अवस्थेत क्रियाशीलता खूपच वाढते ती अवस्था संपली की, काही काळ सामान्य व्यक्तीप्रमाणे वागणे होते नंतर परत तो नैराश्याच्या गर्तेत जातो. हे चक्र सुरुच राहते.
औदासीन्याचे स्त्रियांमध्ये आढळणारे प्रमाण पुरुषांमधील प्रमाणाच्या दुप्पट आहे. अर्थात मासिक पाळी, प्रेग्नन्सी, बाळंतपण, रजोनिवृत्ती या साऱ्या टप्प्यावर हार्मोनल चेंजेस अर्थात संप्रेरकातील बदलांमुळे औदासीन्याची लक्षणे दिसू शकतात.
तसेच समाजातील दुय्यम स्थान, घर आणि नोकरी ही डबल ड्युटी करतानाची कसरत, निर्णयस्वातंत्र्य नसणे, जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन या सर्वांची परिणीतीही औदासीन्याकडे वाटचाल होण्यात होऊ शकते. अलिकडे मुलांमध्येही औदासीन्याच्या प्रमाणात लक्षणीय वाढ होताना दिसते आहे. घरच्यांचा अती धाकधपटशा, तर काही ठिकाणी अनिर्बंध जगण्याइतके पूर्ण स्वातंत्र्य, नकार ऐकायची सवयच नसणे, शाळा-क्लास-अभ्यास-परीक्षा मार्क्स् प्रवेश-पालकांच्या अपेक्षा, क्षमता नसताना निवडलेला अभ्यासक्रम, अफाट स्पर्धा, निर्माण होणारी खंत अशा अनेक छोट्या मोठ्या कारणांमुळे डिप्रेशन आलेले पहायला मिळते.
या विषयाची व्याप्ती पाहता एकाच लेखामध्ये हा विषय मांडता येणे अवघड आहे. याविषयी अधिक जाणून घेउया पुढच्या भागात..
अॅड सुमेधा देसाई