श्रमाचे अवमूल्यन...
कामाच्या अतिताणामुळे पुण्यातील एका आंतरराष्ट्रीय कंपनीत काम करणाऱ्या मुलीचा मृत्यू झाल्याची समोर आलेली माहिती नक्कीच धक्कादायक म्हटली पाहिजे. याबाबत अॅना सेबॅस्टियन हिच्या आईने कंपनीच्या भारतातील प्रमुखांना लिहिलेले पत्र व्हायरल झाले आहे. चारच महिन्यांपूर्वी अॅनाची नियुक्ती झाली होती. मात्र, गेल्या काही दिवसांपासून ती खूप तणावाखाली होती. तिच्यावर कामाचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी दबाव टाकण्यात आला होता, त्या दडपणाखाली असताना कार्यालयात काम करत असताना तिला हृदयविकाराचा झटका आला व त्यातच तिचे निधन झाल्याकडे तिच्या आईने लक्ष वेधले आहे. 26 वर्षांच्या अॅनाला काही वैद्यकीय त्रास होता वगैरे चर्चाही आता सुरू झाल्या आहेत. मात्र, त्यात कोणतेही तथ्य नसल्याचे दिसून येते. तिच्या वडिलांच्या म्हणण्यानुसार तिला डॉक्टरांकडेही नेण्यात आले होते. मात्र, योग्य आहार व पुरेशी झोप तिला मिळत नसल्याचे डॉक्टरांनी तपासणीनंतर स्पष्ट केले होते. या पार्श्वभूमीवर अतिताणानेच तिचा बळी घेतला, या शंकेस वाव मिळतो. वर्कलोड, वाढत्या जबाबदाऱ्या, टार्गेट पूर्ण करण्यासाठी वरिष्ठांकडून सातत्याने टाकण्यात येणारा दबाव हा सध्याचा नित्यक्रम बनला आहे. पूर्वी कामगाराला, त्याच्या श्रमाला मूल्य होते. कामगारहिताच्या संरक्षणासाठी तसे कायदेही अस्तित्वात होते. मात्र, टप्प्याटप्प्याने कामगार कायद्यांची ऐशीतैशी करण्यात आली. अनेक पळवाटा काढण्यात आल्या. कंत्राटीकरणाला मोकळे रान देण्यात आले. त्यातून कामगाराच्या श्रमाचे अवमूल्यन होत गेल्याचे दिसून येते. आज जवळपास सर्वच कंपन्यांमध्ये पंचिंग मशिन वा तत्सम व्यवस्था आहेत. त्यानुसार प्रत्येकावर वेळेचे बंधन आहे. काही मिनिटे विलंब झाला, तरी पगारात कपात केली जाते. मात्र, ड्युटीचे तास वाढविताना हा नियम लावला जात नाही. आठ ते नऊ तासांची ड्युटी असतानाही अनेकदा कर्मचाऱ्यांना दहा ते बारा तास काम करावे लागते. अनेकांना त्याचा ओव्हरटाईमही दिला जात नाही. हे सगळे भयंकरच म्हटले पाहिजे. आजचे जग हे धावपळीचे असून, महानगरांमध्ये टॅफिकचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे येथील कर्मचाऱ्यांचे दोन ते चार तास हे प्रवासातच जातात. कामाचे तास व प्रवासाचा वेळ याची बेरीज बारा, चौदा तासांवर जात असेल, तर झोप व इतर दैनंदिन कामकाजाचे नियोजन कसे करायचे हा प्रश्नच असतो. आज बहुतेकांपुढे हीच समस्या आ वासून उभी राहिली आहे. निरोगी व निरामय जीवनासाठी सातत्यपूर्ण व्यायाम, पुरेशी झोप व योग्य आहार ही त्रिसूत्री मानली जाते. मात्र, धावत्या लाईफस्टाईलमध्ये आजची पिढी इतकी गुरफटून गेली आहे, की त्यांना व्यायामकरिता वेळच नाही. नाही म्हणायला काही आयटी कंपन्यांमध्ये वगैरे जीम वा व्यायामशाळांची उभारणी केल्याचे दिसून येते. मात्र, ही सेंटर्स म्हणजे निव्वळ शोभेचे पीस असतात. तेथे जाण्याकरिता कर्मचाऱ्यांना वेळच मिळत नसेल, तर त्यांच्या उभारणीचे प्रयोजन काय? सध्याचे जग हेच मुळात भपक्याचे आहे. आपण किती कर्मचाऱ्यांच्या हिताचा विचार करतो, हे कंपन्यांना केवळ दाखवायचे आहे. प्रत्यक्षात त्यांना कर्मचाऱ्यांची पिळवणूक करण्यातच अधिक रस असतो. चांगल्या झोपेवरच शरीराचे व मनाचे आरोग्य अवलंबून असते. मात्र, कामाचे तास संपल्यानंतरही कर्मचारी घाण्यासारखा कंपनीच्या कामाला जुंपला जात असेल, तर त्याला सुखाची झोप कशी मिळणार? मेट्रो सिटी वा मोठ्या शहरांमध्ये रात्री बारापूर्वी झोपणारा नोकरदार आज दुर्मिळ बनल्याचे चित्र आहे. त्यात मुलांची शाळा, डबा व इतर जबाबदाऱ्यांमुळे पालकांसमोर सकाळी लवकर उठण्याशिवाय पर्याय नसतो. किमान सहा तासही झोप मिळणार नसेल, तर अतिकामातून शरीर व मनाला येणारा थकवा जाण्याकरिता मार्गच राहत नाही. आहाराबाबतही तेच. शांतपणे व समरसतेने जेवणाचा आस्वाद घेणे, ही कंन्सेप्टच आज इतिहासजमा झाली आहे. कार्यालयात असताना बहुतांशांचा कल हा जेवण उरकण्याकडे असतो. त्यात जेवणानंतर लगेच कॉम्प्युटरला चिकटणे, हा तर शिरस्ताच बनला आहे. त्यातून बद्धकोष्ठता व पोटाच्या आजारांचे प्रमाण वाढताना दिसते. कुठल्याही कंपनीमध्ये कर्मचाऱ्यांमध्ये शिस्त आणण्याकरिता कामाचे नियम हे काटेकोर असायलाच हवेत. याबाबत दुमत नाही. मात्र, पगारवाढ वा इतर सुविधा देताना हात आखडायचा आणि नियमांचा मात्र अतिरेक करायचा, अशी सध्याची स्थिती आहे. कुठल्याही कंपनीचा बेस हा कामगार असतो. प्रामाणिक, कष्टाळू कामगारांच्या जीवावर छोट्या कंपन्यांचे ऊपांतर मोठ्या उद्योगात झाल्याची कितीतरी उदाहरणे आहेत. अर्थात तेव्हाच्या उद्योगपतींना सामाजिक भान असे. त्यांची कामगारहितवादी दृष्टी, सहकाऱ्यांवरील विश्वास यामुळे कामगार व मालक यांच्यात एक गहिरे नाते असायचे. तथापि, आजमितीला व्यवस्थापन व कामगार यांच्या नात्यावर कामच होताना दिसत नाही. त्यामुळे बहुतेकदा या दोघांचे संबंध हे ताणलेलेच दिसतात. म्हणूनच आगामी काळात तरी कामगारहित हा प्रत्येक कंपनीचा प्राधान्यक्रम असला पाहिजे. कंपनी व कर्मचारी यांच्यातील नाते जितके हेल्दी राहील, तेवढा ताण कमी होईल व त्याचा आऊटपूटही चांगला असेल. माणूस म्हणून प्रत्येकाच्या काही मर्यादा आहेत. यंत्रही अतिरिक्त ताणानंतर कुरकुरते. हे लक्षात घेऊन अतिकामाचा ताण कुणावर येणार नाही, याची दक्षता घेतली पाहिजे. त्याचबरोबर कामगारांच्या शारीरिक व मानसिक स्वास्थ्याकरिता कंपनीने कार्यक्रम हाती घ्यावा. कंपनीने विश्वास व बळ दिले, तर कामगार नक्कीच पूर्ण क्षमतेने योगदान देऊ शकतात. अशा घटना टाळण्यासाठी केंद्रानेही कृती आराखडा तयार करणे काळाची गरज आहे.