सहा महिन्यात 9 जणांवर हद्दपारीची कारवाई
कुडाळ पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी ; उपविभागीय दंडाधिकारी यांनी दिले हद्दपारीचे आदेश
कुडाळ -
कुडाळ पोलीस ठाण्याचे कार्यक्षेत्रातील अभिलेखावरील गुन्हेगारी तसेच अवैध धंद्यामध्ये अग्रेसर असलेल्या नऊ जणांवर गेल्या सहा महिन्यात हद्दपारीची कारवाई करण्यात आली. कुडाळ पोलीसांनी हद्दपारी कारवाईबाबत सपाटा लावला असून पोलिसांची ही कामगिरी कौतुकास्पद व अभिनंदनाला पात्र आहे. या पोलिसांची ही कार्यवाही सुरूच असून आणखीन काही गुन्हेगारी प्रवृत्तीचे तसेच अवैध धंदेवाले कुडाळ पोलिसांच्या रडारवर असण्याची शक्यता आहे. सोमवारी रामचंद्र ऊर्फ अभय अंकुश घाडी (30, रा. आकेरी - घाडीवाडी ) व आप्पा ऊर्फ परेश कृष्णा धुरी (33 रा. माणगांव - कुंभारवाडी ) या दोन सराईत गुन्हेगारांना सिंधुदुर्गसह रत्नागिरी, कोल्हापूर या तीन जिल्ह्यातून प्रत्येकी एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले. सिंधुदुर्ग जिल्हयातील नागरीकाच्या जिवीताला तसेच मालमत्तेला कोणत्याही गुन्हेगाराकडून धोका निर्माण होवु नये. नागरीकांना भयमुक्त असे वातावरणात राहता यावे. यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. श्री मोहन दहीकर, अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम व उपविभागीय पोलीस अधिकारी, (सावंतवाडी ) विनोद कांबळे यांनी कुडाळ पोलीस ठाण्याचे हददीत सतत गंभीर गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांची माहीती संकलित करुन त्यांच्यावर कडक कारवाई करण्याबाबतचे आदेश कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांना दिले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक श्री.मगदुम यांनी गेल्या काही वर्षात तसेच सद्यस्थितीत सतत गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांची माहीती संकलित करुन कुडाळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घरफोडी चोरीचे 7 गुन्हे दाखल असणारा तसेच सावंतवाडी पोलीस ठाण्याचे अभिलेखावरील 4 गुन्हयात शिक्षा भोगून बाहेर आलेला अभिलेखावरील सराईत गुन्हेगार रामचंद्र ऊर्फ अभय अंकुश घाडी तसेच अवैध अग्निशस्त्र (बंदुका) बनविण्याचा कारखाना चालविणारा ज्यावर शस्त्र अधिनियमाखाली कुडाळ पोलीस ठाण्यात 2 व रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथे 2 असे एकूण 4 गुन्हे दाखल असलेला आप्पा ऊर्फ परेश कृष्णा धुरी या दोघांविरुध्द हद्दपारीची कारवाई करण्यासाठी स्वतंत्र अहवाल उपविभागीय दंडाधिकारी (कुडाळ ) यांच्याकडे पाठविण्यात आला होता. त्यानुसार येथील उपविभागीय दंडाधिकारी ऐश्वर्या काळुशे यांच्या न्यायालयात सदर प्रस्तावाची सुनावणी झाली. यात अभय घाडी व परेश धुरी या दोघांना सिंधुदुर्गसह लगतच्या रत्नागिरी व कोल्हापूर या तीन जिल्हयातुन एक वर्षासाठी हद्दपार करण्याचा आदेश सोमवारी पारित करण्यात आला. सदर आदेशाची बजावणी कुडाळ पोलीस ठाण्यामार्फत मंगळवारी करण्यात आली असून अभय घाडी याला गोवा राज्यात ,तर परेश धुरी याला विरार - मुंबई येथे पाठविण्यात आले.ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ मोहन दहीकर, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती साटम व उप विभागीय पोलीस अधिकारी श्री. कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. मगदुम यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गजेंद्र भिसे व दयानंद चव्हाण ,हवालदार कृष्णा केसरकर, प्रमोद काळसेकर, संजय कदम, योगेश वेंगुर्लेकर, सुजाता तेंडोलकर, समीर बांदेकर यांनी केली.वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक श्री मगदूम यांनी कुडाळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगारी प्रवृत्ती व अवैध धंदेवाल्याचे हद्दपारी कारवाईसाठी उपविभागीय दंडाधिकारी यांच्याकडे प्रस्ताव सादर केले होते. आतापर्यंत सहा महिन्यात नऊ जणांवर हद्दपार कारवाई करण्यात आली आहे.यात सिद्धेश अशोक शिरसाट (रा कुडाळ) , नदीम अब्दुल रहमान शेख ( रा.पिंगुळी ), खलील हुसेन वाडीकर ( रा कोलगाव- सावंतवाडी ) , हादी अब्दुल बारी खान (रा कुडाळ ), अनंत उर्फ अक्षय अशोक म्हाडेश्वर ( रा. कुडाळ),सलीम सादिक सय्यद (रा. पिंगुळी) आनंद शिरवलकर ( रा.कुडाळ) , रामचंद्र ऊर्फ अभय घाडी (रा.आकेरी ) व आप्पा ऊर्फ परेश धुरी (रा. माणगांव ) यांचा समावेश आहे.