गुन्हेगारी प्रकरणात सहभागी पाच जणांवर तडीपारीची कारवाई
बेळगाव ग्रामीण, टिळकवाडी पोलिसांच्या कार्यक्षेत्रातील गुन्हेगार
त. भा. प्रतिनिधी
बेळगाव : खून, खुनी हल्ला, गांजा विक्री, दरोडे, पोक्सो आदी प्रकरणात गुंतलेल्या पाच जणांना तडीपार करण्यात आले आहे. कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलीस उपायुक्त व विशेष दंडाधिकारीही असणारे नारायण बरमणी यांनी यासंबंधीचा आदेश दिला आहे. बेळगाव ग्रामीण, टिळकवाडी पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रातील प्रत्येकी दोन व उद्यमबाग पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रातील एका गुन्हेगाराचा या यादीत समावेश आहे.
पाचपैकी चौघा जणांना सहा महिन्यांसाठी तर एकाला तीन महिन्यांसाठी बेळगाव शहरातून तडीपार करण्यात आले आहे. नशामुक्त बेळगावसाठी गांजा विक्रेते, खून व खुनी हल्ल्याचे प्रयत्न करणारे, बेकायदा शस्त्रs बाळगणाऱ्यांवर कारवाईचा सपाटा सुरूच आहे. या उपक्रमाचा भाग म्हणून गांजा विक्रीबरोबरच सतत गुन्हेगारी प्रकरणात गुंतलेल्या पाच जणांची कर्नाटक पोलीस कायदा कलम 55 व 56 अन्वये त्यांना तडीपार करण्यात आले आहे.
पिराजी यल्लाप्पा येसूचे, राहणार गणपत गल्ली, हलगा याला 10 एप्रिलपासून 9 ऑक्टोबरपर्यंत, यश गणेश दावले ऊर्फ गवळी, आदित्य गणेश दावले ऊर्फ गवळी, दोघेही राहणार गवळी गल्ली, मंगळवार पेठ, टिळकवाडी या दोघा सख्ख्या भावांना 10 एप्रिल ते 9 ऑक्टोबरपर्यंत सहा महिन्यांसाठी तडीपार करण्यात आले आहे.
पार्वतीनगर येथील संतोष ऊर्फ अरमुग गोविंद दिवटगी याला 10 एप्रिलपासून 9 ऑक्टोबरपर्यंत तडीपार करण्याचा आदेश देण्यात आला आहे. रफिक ऊर्फ महम्मदरफिक इश्तियाक शेख, राहणार मच्छे याला 10 एप्रिल ते 9 जुलैपर्यंत तीन महिन्यांसाठी तडीपार करण्याचा आदेश देण्यात आला आहे. बेळगाव शहर व उपनगरातील गैरधंदे थोपविण्यासाठी ही कारवाई करण्यात आली आहे.
पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. यापुढेही सराईत गुन्हेगारांवर कारवाईचा सपाटा सुरूच राहणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. पिराजीवर अमलीपदार्थ प्रतिबंधक कायद्यांतर्गत चार गुन्हे दाखल झाले आहेत. यश व आदित्य या भावंडांवर खून व हल्ला प्रकरणी दोन गुन्हे दाखल झाले आहेत. संतोषवर खून व हल्ल्यासंबंधी पाच गुन्हे दाखल झाले आहेत. रफिक ऊर्फ मोहम्मदवर हल्ला, दरोड्याचे प्रयत्न व पोक्सो असे तीन गुन्हे दाखल झाले आहेत.