बेळगाव-गोकाक रस्त्याची दयनीय अवस्था
बेळगाव : बेळगाव-गोकाक रोडवरील महांतेशनगर ब्रीज ते कलखांब क्रॉसपर्यंतच्या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था बनली आहे. रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता हेदेखील समजणे कठीण झाले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ही समस्या असतानाही खड्डे बुजविण्यासह रस्त्याचे काम करण्याकडे बांधकाम खात्याने दुर्लक्ष केल्याने संताप व्यक्त होत आहे. महांतेशनगर ब्रीज ते कणबर्गीपर्यंत रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. या रस्त्यावरून दररोज मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. अवजड वाहनेही कायम ये-जा करीत असतात. मात्र यंदा पावसाळ्यात रस्ता पूर्णपणे उखडून गेला आहे. परिणामी या मार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहनधारकांना धोका निर्माण झाला असून वारंवार विशेष करून रात्रीच्यावेळी अपघात घडत आहेत. वाहनेदेखील नादुरूस्त होण्याचे प्रमाण वाढत आहेत. पाऊस पडल्यास खड्ड्यांमध्ये पाणी तुंबत आहे. अशावेळी रस्त्याचा अंदाज येत नसल्याने अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. ऊन पडल्यास धुळीचा सामना करावा लागत आहे. गेल्या काही महिन्यापासून रस्त्याची दयनीय अवस्था बनली आहे. मात्र याकडे लोकप्रतिनिधी, बांधकाम खाते, महानगरपालिकेने दुर्लक्ष केले असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.