For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बिहारमध्ये नव्या मंत्र्यांना विभागवितरण

07:00 AM Feb 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
बिहारमध्ये नव्या मंत्र्यांना विभागवितरण
Advertisement

वृत्तसंस्था /पाटणा

Advertisement

बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी त्यांच्या नव्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांच्या विभागांची घोषणा केली आहे. गृहविभाग त्यांनी स्वत:कडे ठेवला असून अर्थमंत्रीपद भारतीय जनता पक्षाला मिळाले आहे. गेल्या रविवारी कुमार यांनी विरोधी पक्षांच्या आघाडीशी नाते तोडून पुन्हा भारतीय जनता पक्ष प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीत प्रवेश केला होता. त्यापूर्वी त्यांनी मुख्यमंत्रीपद सोडले होते. मात्र, रविवारीच संध्याकाळी त्यांचा रालोआचे मुख्यमंत्री म्हणून शपथविधी झाला. भारतीय जनता पक्षाच्या राज्यशाखेचे अध्यक्ष सम्राट चौधरी यांचाही मंत्रिमंडळात समावेश झाला असून त्यांना अर्थमंत्रीपद मिळाले आहे. कुमार यांनी स्वत:साठी कॅबिनेट सचिव विभाग, निवडणूक विभाग, दक्षता विभाग, सामान्य प्रशासन तसेच इतर मंत्र्यांना न दिलेले विभाग ठेवून घेतलेले आहेत. माजी उपमुख्यमंत्री आणि राजदचे नेते तेजस्वी यादव यांच्याकडे असलेले सर्व विभाग भारतीय जनता पक्षाच्या  मंत्र्यांना मिळालेले आहेत. सम्राट चौधरी यांना अर्थविभागाशिवाय आरोग्य, व्यापारी कर, नगर विकास, गृहनिर्माण, क्रिडा, पंचायत राज, पशुसंगोपन आणि मस्त्यपालन हे विभाग सोपविण्यात आलेले आहेत. सम्राट चौधरी उपमुख्यमंत्रीही आहेत.

भाजपला अधिक वाटा

Advertisement

मंत्रिमंडळाच्या विभाग वितरणात भारतीय जनता पक्षाला संजदपेक्षा अधिक वाटा देण्यात आला आहे. भारतीय जनता पक्षाच्या आमदारांची संख्याही तितकीच अधिक आहे. या पक्षाकडे 78 आमदार असून संजदचे 45 आहेत. विजय कुमार सिन्हा या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनाही उपमुख्यमंत्रिपद देण्यात आले असून त्यांना कृषी, मार्गनिर्माण, महसूल, भूमीसुधारणा, खाण, भूगर्भसंपत्ती, साखर, कामगार कल्याण, कला आणि संस्कृती, युवा कल्याण, लघुपाटबंधारे आणि सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी हे विभाग सोपविण्यात आले आहेत.

प्रेम कुमार यांनाही विविध विभाग

मंत्रिमंडळातील भाजपचे तिसरे नेते प्रेम कुमार यांना सहकार, अन्यमागासवर्गिय कल्याण, अतिमागासवर्गिय कल्याण, आपत्तीनिवारण, पर्यटन आणि पर्यावरण संरक्षण हे विभाग देण्यात आले आहेत. संजदचे आमदार विजयकुमार चौधरी यांना जलस्रोत, परिवहन, वास्तूनिर्माण, शिक्षण आणि सूचना प्रसारण हे विभाग दिले आहेत. वीजविभाग बिजेंद्र यादव यांना संजदचे आणखी एक नेते आणि कुमार यांचे निकटवर्तीय बिजेंद्र यादव यांना वीज निर्मिती आणि वितरण, दारुबंदी आणि उत्पादनशुल्क, नियोजन आणि विकास, ग्रामीण कार्ये आणि अल्पसंख्य हे विभाग दिले गेले आहेत. संदजदचे श्रवणकुमार यांना ग्रामीण विकास, समाजकल्याण, अन्न आणि ग्राहक कल्याण हे विभाग देण्यात आले आहेत. हिंदुस्थानी आवाम मोर्चाचे संतोष कुमार सुमन यांना अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती कल्याण आणि माहिती तंत्रज्ञान हे विभाग देण्यात आले असून अपक्ष आमदार सुमित कुमार सिंग यांना विज्ञान, तंत्रज्ञान आणि तांत्रिक शिक्षण हे विभाग सोपविण्यात आले आहेत.

केवळ 9 मंत्री समाविष्ट

गेल्या रविवारी शपथग्रहण करताना मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यासह आणखी 8 मंत्र्यांचा समावेश करण्यात आला होता. यांच्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे तीन, संयुक्त जनता दलाचे तीन, हिंदुस्थानी आवाम मोर्चाचा एक आणि एक अपक्ष आमदाराचा समावेश करण्यात आला होता. मंत्रिमंडळाचा विस्तार नंतर आवश्यकतेनुसार करण्यात येणार आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.

लोकसभा निवडणुकीची तयारी

बिहारमध्ये भारतीय जनता पक्ष आणि संयुक्त जनता दल एकत्रितरित्या लोकसभा निवडणूक लढविणार असून आता दोन्ही पक्ष त्याच तयारीला लागतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच बिहारचा दौरा करणार असून नंतरच्या काळात दोन्ही नेत्यांच्या संयुक्त जाहीरसभाही होतील अशी माहिती देण्यात आली आहे. दोन्ही पक्ष आणि त्यांचे मित्रपक्ष यांच्यातील जागावाटपावरही लवकरच चर्चा होणार असून जागावाटप झाल्यानंतर प्रचारकार्याला वेग येणार आहे. दोन्ही पक्षांचे नेते प्रचाराची योजना एकत्रितरित्या करतील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

Advertisement
Tags :

.