देववाडीतील 'ती' मगर अखेर जेरबंद ! २०२१ पासून मगरीचा गावात वावर; ग्रामस्थांनी धाडसान पकडले
मांगले वार्ताहर
देववाडी ता. शिराळा येथील गावखणीत 2021 च्या महापुरामध्ये आलेल्या मगरीला २०२४ मध्ये पकडण्यात गावकऱ्यांना यश आले असून त्यामुळे गावातील लोकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. वनविभागाच्या अधिकाऱ्यांना वारंवार चकवा देणाऱ्या मगरीला पकडून आता तीच्या अधिवासात वनविभागाकडून सोडून देण्यात आले आहे.
२०२१ मध्ये आलेल्या महापुरामुळे मांगले गावामध्ये पाणी आले होते. या पाण्याबरोबर ही मगर आली होती. पण पाणी उतरताच हि मगर नदीत न जाता ती गावातील खाणीमध्येच राहीली.
दरम्यान, ही मगर अगदी बिनधास्तपणे या गावखणीच्या जवळ असणाऱ्या जि. प. शाळेच्या परिसरात तसेच मंदिर परिसरात फिरत होती. त्यामुळे ग्रामस्थांना आणि लहान मुलांनाही या मगरीपासून धोका निर्माण झाला होता. या गोष्टीची दखल घेऊन 'तरुण भारत'नेही यासंदर्भातील बातमी दिली होती.
जेव्हा या मगरीला पकडण्यासाठी वन विभागाचे कर्मचारीने अधिकारी येत होते तेव्हा ही मगर दृष्टीस पडत नव्हती. त्यामुळे मगर आहे की नाही याबद्दल वन अधिकारी आणि वन कर्मचाऱ्यांच्या मनामध्ये शंका निर्माण झाली होती. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना ही मगर आजपर्यंत सापडली नाही.
त्यानंतर, आज सकाळी साडेसहाच्या सुमारास नेहमीप्रमाणे ही मगर खणीतून बाहेर पडल्यानंतर ती गावकऱ्यांच्या दृष्टीस पडली. आज ग्रामस्थांनीच या मगरीला मोठ्या धाडसाने पकडले आणि वन विभागाच्या ताब्यात दिले. मगरीला जेरबंद केल्यानंतर संपूर्ण गावाने सुटकेचा निश्वास टाकला.
मगर पकडल्यामुळे ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांचा धोका नाहीसा झाला आहे. शेवटी ग्रामस्थांनीच ही मोहीम फत्ते केली त्यामुळे गावकऱ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.
शुभम खोत, सरपंच देववाडी