धाराशिवमध्ये रेशनच्या तांदळात दातांची कवळी आढळल्याचा दावा; परिसरात खळबळ
धाराशिव : लोहारा तालुक्यातील जेवळी येथे स्वस्त धान्य दुकानातून आणलेल्या तांदळात दातांची कवळी आढळल्याचा दावा करण्यात आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकारामुळे रेशनच्या धान्याच्या गुणवत्ता आणि स्वच्छतेबाबत नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, जेवळी येथील भागाबाई बाबुराव बिराजदार यांनी शुक्रवारी स्थानिक स्वस्त धान्य दुकानातून रेशनचे तांदूळ घेतले होते. सायंकाळी त्यांच्या सुनेने भात शिजविण्यासाठी तांदूळ चाळणीत घेऊन निवडण्यास सुरुवात केली. त्यावेळी तांदळामध्ये दातांची कवळी दिसून आल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. या कवळीमध्ये सुमारे 6 ते 7 दात असल्याचे सांगण्यात येत आहे.
हा प्रकार लक्षात येताच बिराजदार कुटुंबीयांना धक्का बसला. घटनेची माहिती परिसरात पसरल्यानंतर नागरिकांमध्येही संताप व्यक्त करण्यात येत आहे.
दात मानवी की प्राण्याचे? तपासणीनंतर स्पष्ट होणार
तांदळात आढळलेली कवळी काही प्रमाणात खराब झालेल्या अवस्थेत असल्याचे सांगण्यात येत आहे. ती मानवी दातांची आहे की एखाद्या प्राण्याची, हे अद्याप निश्चित झालेले नाही. त्यामुळे या प्रकरणाची अधिकृत तपासणी होणे आवश्यक आहे.
सुदैवाने तांदूळ शिजविण्यापूर्वीच ही बाब कुटुंबीयांच्या निदर्शनास आल्याने तो भात सेवन करण्याची वेळ आली नाही.
रेशनच्या धान्याच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
रेशनच्या धान्यात अशा प्रकारची वस्तू आढळल्याचा दावा समोर आल्याने धान्याची साठवणूक, वाहतूक आणि वितरण प्रक्रियेबाबतही प्रश्न उपस्थित झाले आहेत. प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने चौकशी करून तांदळाचा नमुना तपासणीसाठी पाठवावा, तसेच दोष आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
दरम्यान, कवळी नेमकी कोणत्या प्रकारची आहे आणि ती रेशनच्या तांदळात कशी आली, याचा तपास झाल्यानंतरच या घटनेमागील वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे.