डेन्मार्कची व्हिक्टोरिया मिस युनिव्हर्सची मानकरी
भारताचे प्रतिनिधित्व करणारी रिया सिंघा टॉप 12 बाहेर
वृत्तसंस्था/ मेक्सिको सिटी
डेन्मार्कची 21 वर्षीय व्हिक्टोरिया कजेर थिइलविग ही मिस युनिव्हर्स 2024 ठरली आहे. स्वत:च्या देशासाठी मिस युनिव्हर्सचा मान मिळविणारी ती पहिली सौंदर्यवती आहे. तिची आकर्षक कामगिरी आणि प्रश्नांना दिलेल्या उत्तरांनी परीक्षक भारावून गेले होते. मेक्सिकोची मारिया फर्नांडा बेलट्रान प्रथम उपविजेती तर नायजेरियाची सिंडीम्मा एडेटशिना ही द्वितीय तर व्हेनेझुएलाची इलियाना मार्केज चौथी उपविजेती ठरली आहे.
मागील वर्षाची मिस युनिव्हर्स राहिलेली निकाराग्वाची शेन्निस पालासियोस हिने व्हिक्टोरिया कजेरच्या डोक्यावर मिस युनिव्हर्सचा मुकूट परिधान केला. मिस युनिव्हर्स 2024 स्पर्धेचे आयोजन मेक्सिकोतील मेक्सिको सिटीत पार पडले आहे. या स्पर्धेत 125 देशांच्या सौंदर्यवतींनी भाग घेतला होता. यंदाच्या मुकूटाला ‘लुमिएरे डे ल इनफिनी’ नाव देण्यात आले होते, याचा अर्थ अनंताचा प्रकाश असा होतो.
21 वर्षीय व्हिक्टोरिया पेशाने उद्योजिका, नृत्यांगना आणि ब्युटी क्वीन आहे. डेन्मार्कमध्ये पालनपोषण झालेल्या व्हिक्टोरियाने बिझनेस आणि मार्केटिंगमध्ये पदवी मिळविली आहे. व्हिक्टोरियाला डेन्मार्कमध्ये ‘ह्यूमन बार्बी’ या नावाने संबोधिले जाते. सप्टेंबर महिन्यात ती मिस युनिव्हर्स डेन्मार्कची विजेती ठरली होती.
रिया सिंघाला मिळाले नाही यश
मिस युनिव्हर्स 2024 च्या टॉप 12 सौंदर्यवतींमध्ये दक्षिण अमेरिकन स्पर्धकांचा दबदबा राहिला. डेन्मार्क, मेक्सिको, नायजेरिया, थायलंड आणि व्हेनेझुएलाच्या स्पर्धकांनी टॉप-5 मध्ये स्थान मिळविले होते. तर या स्पर्धेत भारताच्या पदरी निराशाच आली. रिया सिंघाने स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले होते. अंतिम 12 स्पर्धकांमध्ये रियाला स्थान मिळविता आले नाही. रिया 19 वर्षांची असून मिस युनिव्हर्स इंडिया 2024 जिंकून ते प्रकाशझोतात आली होती. रिया ही गुजरातमधील रहिवासी असून ती मिस टीन अर्थ 2023 ची विजेती ठरली होती.