महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

परवानगीस नकार, आज शिनोळीत हुंकार!

11:20 AM Dec 04, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

महामेळाव्याची धास्ती : कलम 144 ची सक्ती, रास्तारोकोद्वारे दाखविणार शक्ती

Advertisement

बेळगाव : मराठी भाषिकांची धास्ती घेत कर्नाटक सरकारने म. ए. समितीच्या महामेळाव्याला परवानगी नाकारली. ही एक प्रकारची दडपशाही असून या विरोधात सोमवार दि. 4 रोजी महाराष्ट्र हद्दीतील शिनोळी, ता. चंदगड येथे रास्तारोको करण्याचा निर्णय मध्यवर्ती म. ए. समितीने घेतला आहे. पोलिसांनी परवानगी नाकारल्याने तसेच महामेळावा स्थळी 144 कलम लागू केल्याने शिनोळी येथे रास्तारोको करून मराठी भाषिकांची ताकद दाखवून दिली जाणार आहे. कर्नाटक सरकारच्या हिवाळी अधिवेशनाला विरोध दर्शविण्यासाठी म. ए. समितीच्या नेतृत्वाखाली सोमवार दि. 4 रोजी महामेळावा होणार होता. यासाठी तयारी केली जात होती. 16 नोव्हेंबर रोजी परवानगी देण्यासंबंधीचे पत्र पोलिसांना दिले होते. शनिवारी दुपारी पोलीस आयुक्तालयातील बैठकीत महामेळाव्याला परवानगी देता येणार नाही, असे पोलिसांनी तोंडी सांगितले होते. लेखी उत्तर शनिवारी सायंकाळपर्यंत देण्याचे सांगूनही रात्री उशिरापर्यंत लेखी उत्तर आले नाही. त्यामुळे म. ए. समितीने महामेळावा करण्याचा निर्णय घेतला.

Advertisement

रविवारी सकाळी व्हॅक्सिन डेपो परिसरात म. ए. समितीचे कार्यकर्ते दाखल झाल्यानंतर मैदान परिसरात जाण्यास पोलिसांनी त्यांना मज्जाव केला. यामुळे पोलीस व कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमकी उडाल्या. म. ए. समितीच्या पदाधिकाऱ्यांना दहा मिनिटांची वेळ देऊन येथून निघून न गेल्यास ताब्यात घेण्याचा इशारा देण्यात आला. परंतु, म. ए. समितीचे पदाधिकारी लेखी उत्तर देण्यावर ठाम राहिल्याने अखेर दुपारी 12.30 च्या सुमारास महामेळाव्याला परवानगी नाकारल्याचे लेखी पत्र देण्यात आले.त्यानंतर पुढील दिशा ठरविण्यासाठी म. ए. समितीच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये महामेळाव्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. अखेर महाराष्ट्राच्या हद्दीतील शिनोळी येथे रास्ता रोको करण्याचे सर्वानुमते निश्चित करण्यात आले. यावर्षी महामेळाव्यासाठी वेळ कमी असल्याने रास्ता रोकोचा पर्याय निवडण्यात आला. परंतु, पुढील वर्षी प्रत्येक गल्लीमध्ये सत्याग्रह केला जाईल, असा इशाराही कर्नाटक सरकारला या बैठकीदरम्यान देण्यात आला. यावेळी माजी आमदार मनोहर किणेकर, प्रकाश मरगाळे, रणजित चव्हाण-पाटील, मालोजी अष्टेकर, अॅड. एम. जी. पाटील, गोपाळ देसाई, गोपाळ पाटील, बी. ओ. येतोजी, अॅड. राजाभाऊ पाटील, निरंजन सरदेसाई, नेताजी जाधव यांच्यासह इतर उपस्थित होते.

व्हॅक्सिन डेपो परिसराला पोलीस छावणीचे स्वरुप

रविवारी सकाळी 11 वाजता म. ए. समितीच्या पदाधिकाऱ्यांकडून महामेळावा होणाऱ्या जागेची पाहणी करण्यात येणार होती. परंतु, सकाळी 8 वाजल्यापासूनच व्हॅक्सिन डेपो परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलिसांच्या 8 ते 10 गाड्या व्हॅक्सिन डेपो परिसरात तैनात होत्या. तर 25 ते 30 पोलीस या ठिकाणी ठाण मांडून होते. केवळ जागेची पाहणी करण्यासाठी आलेल्या म. ए. समितीच्या पदाधिकाऱ्यांची धास्ती घेऊन पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता.

महाराष्ट्र सरकारचा निषेध

म. ए. समितीने यापूर्वी केंद्र तसेच कर्नाटक सरकारचा निषेध केला होता. परंतु, रविवारी पहिल्यांदाच महाराष्ट्र सरकारचा निषेध करण्यात आला. मराठी भाषा आणि संस्कृतीसाठी झटणाऱ्या सीमावासियांकडे पाहण्यासही महाराष्ट्र सरकारकडे वेळ नाही. मागील चार वर्षांत महामेळावा किंवा 1 नोव्हेंबरच्या बैठकीला महाराष्ट्रातील कोणताही नेता उपस्थित राहिलेला नाही. तसेच सीमाप्रश्नासाठी आग्रही भूमिका घेतानाही दिसत नाही. त्यामुळे ज्या महाराष्ट्रात मराठी भाषिक सामील होणार आहे, त्या महाराष्ट्र सरकारच्या दुर्लक्षाचा सीमावासियांनी निषेध नोंदविला.

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

बेळगाव-वेंगुर्ला महामार्गावर शिनोळी येथे म. ए. समितीच्यावतीने रास्ता रोको केला जाणार आहे. यावेळी महाराष्ट्रातील नेतेमंडळी उपस्थित राहणार आहेत. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे, विजय देवणे, उपजिल्हा प्रमुख प्रभाकर खांडेकर यांच्यासह इतर उपस्थित राहणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

शिनोळी येथे आज आंदोलन

सरकारने महामेळाव्याला परवानगी नाकारल्याने सोमवार दि. 4 रोजी सकाळी 11 वाजता शिनोळी येथे रास्तारोको केला जाणार आहे. बेळगाव-वेंगुर्ला महामार्गावर रास्तारोको करून महाराष्ट्र तसेच कर्नाटक सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न म. ए. समितीकडून केला जाणार आहे. सकाळी 10 वाजता हिंडलगा येथील हुतात्मा स्मारकाला अभिवादन करून सकाळी 11 वाजता शिनोळी येथे रास्तारोको होणार आहे. यावेळी आजी-माजी लोकप्रतिनिधी तसेच सीमावासियांनी उपस्थित रहाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article