For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सोने विकल्याच्या आरोपाचा इन्कार

07:00 AM Jun 04, 2026 IST | Tarun Bharat Portal
सोने विकल्याच्या आरोपाचा इन्कार
Advertisement

रिझर्व्ह बँकेकडे सर्व सोने सुरक्षित, खोडसाळ वृत्त

Advertisement

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

देशाच्या अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी रिझर्व्ह बँकेने तिच्याजवळील 12 अब्ज डॉलर्सच्या (साधारणत: 1 लाख 14 हजार कोटी रुपये) सोन्याची विक्री केली आहे, असे वृत्त तीन दिवसांपूर्वी काही माध्यमांमधून प्रसिद्ध करण्यात आले आहे. हे वृत्त धादांत खोटे असून रिझर्व्ह बँकेने कोणत्याही सोन्याची विक्री केलेली नाही. बँकेकडे असणारा सर्व सोन्याचा साठा सुरक्षित आहे, असे स्पष्टीकरण केंद्र सरकारने आणि रिझर्व्ह बँकेने दिले आहे. हे वृत्त ‘ब्लूमबर्ग’ वृत्तसंस्थेने दिले होते.

Advertisement

रिझर्व्ह बँकेनेही हे वृत्त स्पष्ट शब्दांमध्ये आणि साधार फेटाळले आहे. रिझर्व्ह बँकेने सोन्याची विक्री केलेलीच नाही. उलट बँकेकडे असलेल्या सोन्याच्या साठ्यात वाढच झालेली आहे. भारताकडे असलेल्या परकीय चलन साठ्यात समाविष्ट सोन्याचे प्रमाण सप्टेबर 2025 अखेरीस 13.92 टक्के होते. ते मार्च 2026 च्या अखेरीस 16.70 टक्के इतके झालेले आहे. मे 2026 अखेरीस या प्रमाणात आणखी वाढ होऊन ते 16.85 टक्के झालेले आहे, अशी माहिती देण्यात आली.

बुलेटिनमध्ये माहिती

रिझर्व्ह बँकेकडे सोन्याचा नेमका साठा मागच्या वित्त वर्षाच्या अखेरीस, अर्थात 31 मार्च 2026 या दिवशी किती होता, याची माहिती बँकेच्या बुलेटिनमध्ये देण्यात आलेली आहे. या बुलेटिनची नवी आवृत्ती रिझर्व्ह बँकेच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. या वेबसाईवरची माहिती पाहिल्यास रिझर्व्ह बँकेपाशी असलेल्या सोन्याच्या साठ्यात काहीही घट झालेली नाही. उलट तो वाढलेलाच आहे, असे दिसून येईल, असे बँकेने प्रसारित केलेल्या वक्तव्यात स्पष्ट करण्यात आले आहे.

अफवांवर विश्वास नको

देशाच्या अर्थव्यवस्था स्थितीसंबंधी समाजामध्ये भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न काही अपप्रवृत्तींकडून केला जात आहे. देशाच्या नागरिकांच्या मनात केंद्र सरकारसंबंधी अविश्वास निर्माण व्हावा. तसेच गोंधळ माजून देशात अस्थैर्य निर्माण व्हावे, या उद्देशाने काही देशविरोधी शक्ती सातत्याने खोटी वृत्ते प्रसिद्ध करुन जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहेत. रिझर्व्ह बँकेने सहस्रावधी कोटी रुपयांचे सोन्याची विक्री केली, हे वृत्त अशाच खोडसाळ वृत्तांपैकी एक आहे. अशा वृत्तांवर आणि अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

नको चिंता रुपयाच्या घसरणीची

डॉलरच्या तुलनेत रुपयाची सातत्याने घसरण होत असली, तरी तो फारशा चिंतेचा विषय नाही. रिझर्व्ह बँकेने रुपयाचे अवमूल्यन थांबविण्याचा प्रयत्न करू नये. कारण, भारताची अर्थव्यवस्था सध्या उत्तम अवस्थेत आहे. 2013 पासून देशाच्या अर्थव्यवस्थेत बऱ्याच प्रमाणात बळकटपणा आला आहे. त्यामुळे रुपयाचे अवमूल्यन पेलण्याइतकी अर्थव्यवस्था सक्षम आहे. रुपयाचे अवमूल्यन झाल्यास निर्यातीची स्थिती सुधारणार आहे, असे वक्तव्य 16 व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष आणि नीती आयोगाचे माजी उपाध्यक्ष अरविंद पनगारिया यांनी केले आहे. काही अर्थज्ञांच्या अनुसार रुपयाचे अवमूल्यन किती होत आहे, या पेक्षा ते कोणत्या परिस्थितीत होत आहे, याला अधिक महत्व आहे. देशांतर्गत आर्थिक दुर्बलतेमुळे रुपया कमजोर होत असेल तर तो चिंतेचा विषय असू शकतो. तथापि, बाह्या कारणांमुळे किंवा आंतरराष्ट्रीय परिस्थितीमुळे अवमूल्यन होत असेल, तर नैसर्गिक असते, अशी मांडणी त्यांच्याकडून केली जात आहे. रिझर्व्ह बँकेने सोने विकल्याच्या बनावट वृत्ताला रुपयाच्या अवमूल्यनाची पार्श्वभूभी असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यासंदर्भात पनगारिया यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

Advertisement
Tags :

.