महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

डेंग्यूचा वेढा अन् उपमुख्यमंत्रिपदांचा तिढा!

06:30 AM Jun 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

कर्नाटकात वेगवेगळया घडामोडींनी आपला ठसा उमटवण्याचा प्रयत्न केला आहे. राज्याच्या किनारपट्टी भागात दमदार पावसाला सुरुवात झाली असून त्याची आता राज्यभर खऱ्या अर्थाने गरज आहे. दुसरीकडे डेंग्यूची राजधानीत रुग्णसंख्या वाढली असून इतर जिल्ह्dयातही तो आपले प्रस्थ वाढवू पाहतो आहे. आरोग्य यंत्रणेची मात्र आगामी काळात कसरत असणार आहे. उपमुख्यमंत्रीपदांची संख्या वाढवण्याबाबतचा मुद्दा जोर धरु लागला आहे. डेंग्यूसह उपमुख्यमंत्रीपदाचा तिढा कसा सुटतो हे पाहावे लागणार आहे.

Advertisement

कर्नाटकातील किनारपट्टी परिसरात पावसाला सुरुवात झाली आहे. संततधार पावसामुळे कोडगू जिल्ह्यात पडझड झाली आहे. राजधानी बेंगळूरसह कर्नाटकातील वेगवेगळ्या जिल्ह्यात डेंग्यूचे रुग्ण वाढले आहेत. बेंगळूरमध्ये तर डेंग्यू रुग्णांची संख्या झपाट्याने वाढते आहे. बीबीएमपीचे मुख्य आयुक्त तुषार गिरीनाथ हे स्वत: डेंग्यूने त्रस्त आहेत. त्यामुळे राजधानीतील परिस्थिती काय आहे, हे लक्षात येते. बेळगाव शहर व जिल्ह्यातही डेंग्यू रुग्ण वाढत आहेत. सरकारी इस्पितळात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढती आहे. राजधानीतील डेंग्यू रुग्णांच्या संख्येने 1200 चा आकडा पार केला आहे.

Advertisement

म्हैसूर, चिक्कमंगळूर, शिमोगा, चित्रदुर्ग, हावेरी, मंगळूरमध्येही रुग्णसंख्या वाढते आहे. यासंबंधी सरकारी यंत्रणेकडून जितक्या प्रमाणात जनजागृती व्हायला हवी होती, तेवढी होताना दिसत नाही. आरोग्य यंत्रणाही सज्ज ठेवण्याची गरज आहे. संपूर्ण राज्यात साडेपाच हजारहून अधिक डेंग्यूचे रुग्ण आढळून आले आहेत. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी रोगराईच्या नियंत्रणासाठी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन उपचारासाठी आवश्यक औषध साठा प्लेटलेट्स तयार ठेवण्याची सूचना केली आहे.

कर्नाटकात उपमुख्यमंत्रिपद वाढविण्यासंबंधी लोकसभा निवडणुकीनंतर सुरू झालेल्या राजकीय चर्चेला उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी जशास तसे उत्तर दिले आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या समर्थक नेते ही चर्चा घडवून आणण्यात आघाडीवर आहेत. सर्व जातीधर्मांना प्रतिनिधित्व मिळाले पाहिजे. त्यामुळे उपमुख्यमंत्रिपद वाढविले तर गैर काय आहे? असा प्रश्न सिद्धरामय्या समर्थक उपस्थित करू लागले आहेत. गुरुवारी कर्नाटकातील खासदारांबरोबर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री सिद्धरामय्या व उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार हे दोन्ही नेते नवी दिल्लीला गेले आहेत. त्याआधी उपमुख्यमंत्रिपदाच्या चर्चेला केम्पेगौडा जयंती कार्यक्रमात वक्कलिग समाजाच्या स्वामीजींनी केलेल्या मागणीमुळे कलाटणी मिळाली आहे.

सध्या डी. के. शिवकुमार हे एकटेच उपमुख्यमंत्री आहेत. उपमुख्यमंत्र्यांची संख्या वाढली तर त्या पदालाच किंमत राहणार नाही. त्यामुळे एकच उपमुख्यमंत्री पदासाठी शिवकुमार आग्रही आहेत. त्यांना डिवचण्यासाठीच अतिरिक्त उपमुख्यमंत्र्यांची मागणी केली जात आहे.

बेंगळूर येथे गुरुवारी केम्पेगौडा जयंतीनिमित्त शासकीय कार्यक्रम झाला. कंठीरवा क्रीडांगणावरच झालेल्या या कार्यक्रमाच्या निमंत्रणपत्रिकेत माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा आणि केंद्रीयमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांची नावे नव्हती. त्यांना निमंत्रणही देण्यात आले नाही. बेंगळूरचे संस्थापक असणारे केम्पेगौडा हे एक कुशल प्रशासक होते. केम्पेगौडांच्या जयंती कार्यक्रमात त्यांच्याच वक्कलिग समाजामध्ये फूट पाडण्याचे काम काँग्रेसने केले आहे, असा आरोप भाजप नेते करू लागले आहेत.

या कार्यक्रमात मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या समक्ष जागतिक वक्कलिग महासंस्थान मठाचे श्री चंद्रशेखर स्वामीजींनी आता डी. के. शिवकुमार यांना मुख्यमंत्री करा, सिद्धरामय्या यांनी मनात आणले तर ते शक्य आहे. अनेक जण मुख्यमंत्री होऊन गेले. डी. के. शिवकुमार यांनाही मुख्यमंत्री व्हायचे आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी खुर्ची खाली करा, असा सूर आळवला आहे. या कार्यक्रमानंतर लगेच मुख्यमंत्र्यांनी स्वामीजींच्या मागणीवर प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेस हायकमांडवर चालणारा पक्ष आहे. जे काही निर्णय घ्यायचा आहे, ते हायकमांड ठरवेल, असे सांगत सिद्धरामय्या यांनी हायकमांडकडे बोट दाखवले आहे.

डी. के. शिवकुमार यांच्या नेतृत्वाखाली कर्नाटकात विधानसभा निवडणूक लढवण्यात आली. पक्षाला बहुमत मिळाल्यानंतर मुख्यमंत्रिपदावर त्यांचाच दावा होता. सिद्धरामय्या यांनी हट्ट धरल्याने अडीच वर्षांचा सत्ताकाळ ठरवून देऊन हायकमांडने तोडगा काढल्याचे सांगितले जाते.

सिद्धरामय्या यांनी एक वर्ष पूर्ण केले आहे. खरोखरच सत्तावाटपाचे सूत्र ठरले असेल तर त्यासाठी डी. के. शिवकुमार यांना आणखी दीड वर्षांची प्रतीक्षा करावी लागणार आहे. खरेतर आतापासूनच यासंबंधीची चर्चा घडवून आणण्याची गरज नव्हती. काँग्रेसमधील सत्तासंघर्ष व गटबाजीमुळेच संघर्षाला धार आली आहे. या मुद्द्यावर जाहीरपणे वक्तव्य करू नका, असे हायकमांडने सूचवल्यानंतरही उपमुख्यमंत्र्यांची संख्या वाढवण्यासंबंधी चर्चा घडू लागली आहे. इतकेच नव्हे तर प्रदेश काँग्रेस अध्यक्ष बदलासंबंधी चर्चेला तोंड फुटले आहे. डी. के. शिवकुमार यांची नाराजी दूर करण्यासाठी हायकमांडने उपमुख्यमंत्रिपदाबरोबरच पक्षाध्यक्षपदही त्यांच्याकडेच ठेवले होते. आता बदलाची चर्चा सुरू झाली आहे. डी. के. शिवकुमार यांचे बंधू डी. के. सुरेश यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाला. पराभवानंतर शिवकुमार विरोधक सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे.

लोकसभा निवडणुकीच्या आधीपासूनच कर्नाटकातील धक्कादायक, अप्रिय घडामोडींमुळे समाजमन ढवळून निघाले होते. अनपेक्षित घटनांची मालिका सुरूच आहे. ऐन लोकसभा निवडणुकीत तत्कालिन खासदार प्रज्ज्वल रेवण्णा यांचे अश्लील व्हिडिओ असलेले पेनड्राईव्ह प्रकरण उजेडात आले. त्यानंतर दक्षिणेतील आघाडीचा चित्रपट अभिनेता दर्शन तुगुदीप व त्यांच्या साथीदारांनी रेणुकास्वामी या युवकाचा खून केला. या खून प्रकरणामुळे प्रज्ज्वल रेवण्णा प्रकरण मागे पडले. आता माजी मंत्री रेवण्णा यांच्या आणखी एका मुलाचे कारनामे उघडकीस आले आहेत. विधान परिषद सदस्य सूरज रेवण्णा यांच्यावर अनैसर्गिक संबंधांविषयी पोलिसात फिर्याद दाखल झाली आहे. राज्य सरकारने हे प्रकरणही सीआयडीकडे सोपविले आहे.

प्रज्ज्वल रेवण्णा सध्या परप्पनअग्रहार कारागृहात आहे. एच. डी. रेवण्णा हे जामिनावर मुक्त झाले आहेत. त्यांची पत्नी भवानी रेवण्णा यांना न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. संपूर्ण कुटुंब अडचणीत असतानाच सूरज रेवण्णाने हे कृत्य केले आहे. सूरजलाही अटक झाली असून सीआयडीचे अधिकारी या प्रकरणाची चौकशी करीत आहेत. अनैसर्गिक लैंगिक संबंधांप्रकरणी सूरजवर दोन स्वतंत्र गुन्हे दाखल झाले आहेत. कर्नाटकातील अनपेक्षित घटनांची ही मालिका कधी थांबणार? हाच खरा प्रश्न आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article