Kolhapur News : जिवबानाना पार्कातील युवकाचा डेंग्यूसदृश आजाराने मृत्यू
चार दिवसांपूर्वी ताप आल्याने एका खासगी दवाखान्यात दाखल केले होते
कोल्हापूर : नवीन वाशीनाका परिसरातील जिवबानाना जाधव पार्क येथील युवकाचा डेंग्यूसदृश आजाराने मृत्यू झाला असल्याची माहिती महापालिका आरोग्य विभागाने दिली. प्रथमेश हेमंत घाटगे (वय 22) असे त्याचे नाव आहे. गेल्या चार दिवसांपासून कळंबा येथील एका खासगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते.
प्रथमेश याला चार दिवसांपूर्वी ताप आल्याने एका खासगी दवाखान्यात दाखल केले होते. तेथे त्याच्यावर उपचार सुरु होते. त्यानंतर प्रकृतीत सुधारण न झाल्याने तेथील डॉक्टरांनी त्याला दुसऱ्या खासगी दवाखान्यात त्याला दाखल केले. पण तेथे उपचारास प्रतिसाद न मिळाल्याने मंगळवारी मध्यरात्री २ वाजता त्याचा मृत्यू झाला. यानंतर महापालिका प्रशासन खडबडून जागे झाले असून आजूबाजूच्या परिसरातील १०० घरांचा सर्व्हे करण्यात आला.
येथील एकूण ३१२ जणांची तपासणी केली. यामध्ये ७तापाचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू केले असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले. परिसरातील २०७ पाण्याच्या टाक्या तपासल्या. यामध्ये ५ ठिकाणी डेंग्यूच्या अळ्या आढळून आल्या. ४० नागरिकांचे रक्ताचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले असून परिसरात धूर फवारणी व औषध फवारणी करण्यात आली असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले.
ड्रेनेज, गटरचे पाणी रस्त्यावर
दरम्यान, येथील अस्वच्छतेसंदर्भात वारंवार तक्रार देऊनही महापालिकेचे दुर्लक्ष झाले असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. येथील एका बहुमजली इमारतीच्या ड्रेनेजचे पाणी तुंबून रस्त्यावर वाहत आहे. याचे कनेक्शन बेकायदेशीररित्या जोडले असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. त्याचबरोबर गटर्सही तुंबल्या असून मनपा प्रशासनाकडे वारंवार तक्रारी केल्या आहेत. मात्र, महापालिकेचे याकडे दुर्लक्ष झाल्याच्या भावना नागरिकांनी व्यक्त केल्या.
बांधकाम व्यावसायिकाला एक लाखाचा दंड
या परिसरात बहुमजली इमारतीचे काम सुरू आहे. येथील बेसमेंटमध्ये साठवलेल्या पाण्यात डेंग्यूच्या अळ्या आढळल्या आहेत. मागील वर्षी महापालिकेने त्याला सूचनाही दिल्या होत्या. याठिकाणी गटर व ड्रेनेजचे पाणी रस्त्यावरून वाहत आहे. मात्र, याकडे संबंधित बांधकाम व्यावसायिकाने दुर्लक्ष केल्याने महापालिकेने त्याला एक लाख रूपयांचा दंड केला असल्याचे उपायुक्त कृष्णात पाटील यांनी सांगितले.