निदर्शक डॉक्टर हे कसाई : तृणमूल नेत्या
लवली मैत्रा यांच्या वक्तव्यावरून वादंग
वृत्तसंस्था/ कोलकाता
तृणमूल काँग्रेसच्या नेत्या लवली मैत्रा यांच्या वक्तव्यावरून वादंग निर्माण झाला आहे. मैत्रा यांनी कोलकात्यातील आरजी कर वैद्यकीय महाविद्यालयात ज्युनियर डॉक्टरवरील बलात्कार तसेच हत्येच्या विरोधात निदर्शने करणाऱ्या ज्युनियर डॉक्टरांची तुलना ‘कसाई’सोबत केली होती. याप्रकरणी आता भाजपने तृणमूल काँग्रेसला लक्ष्य केले आहे.
मैत्रा या कोलकाता पोलीस विभागातील एका आयपीएसच्या पत्नी आहेत. कोलकाता पोलीस हे डॉक्टरांना नोटीस आणि समन्स जारी करत आहेत. निदर्शक डॉक्टरांच्या विरोधात तृणमूल काँग्रेसला इतका द्वेष का? ममता सरकार आणि त्याच्या पोलिसांना उत्तरदायी ठरविण्यात येत असल्याने डॉक्टरांना लक्ष्य करण्यात येत असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे.
मैत्रा यांनी अलिकडेच तृणमूल काँग्रेसच्या एका कार्यक्रमात बोलताना वादग्रस्त वक्तव्य केले आहे. डॉक्टर हे विरोधाच्या नावावर कसाई होत चालले आहेत. गरीब आणि वंचित लोकांवर उपचार करण्यास नकार दिला जात असल्याचा दावा मैत्रा यांनी केला होता. या वक्तव्याप्रकरणी मैत्रा यांच्या विरोधात तक्रार नोंदविण्यात आली आहे.
वादानंतर स्पष्टीकरण
वाद निर्माण होताच मैत्रा यांना स्वत:च्या टिप्पणीसाठी स्पष्टीकरण द्यावे लागले आहे. डॉक्टर हे देव आहेत, गरीब लोक डॉक्टरांना देव मानतात. परंतु ज्याप्रकारे ते निदर्शने करत आहेत ते पाहता संशय निर्माण होतो. डॉक्टर लालबाजार येथे का जात आहेत, ते सीबीआयच्या कार्यालयाबाहेर का जमत नाहीत असे प्रश्नार्थक विधान मैत्रा यांनी केले आहे.