असुरी गुण
अध्याय दहावा
पूर्वकर्मानुसार उपलब्ध स्वभावातील रज, तम गुण ओळखून त्यांचे प्रमाण कमी करून सत्वगुणात वाढ करण्यासाठी उपयोगी ठरतील म्हणून आपण दैवी संपत्ती बाळगून असलेल्या माणसात कोणते गुण त्याचा अभ्यास करत आहोत. दैवी स्वभावाच्या माणसात अपैशुन्य, दया, अक्रोध, अचापल्य, धृती, आर्जव, तेज, अभय, अहिंसा, क्षमा, शौच आणि अमानिता हे बाप्पांनी सांगितलेले बारा गुण असतात. त्यापैकी अकरा गुण आपण अभ्यासले आता अमानिता ह्या बाराव्या गुणाची माहिती घेऊ.
अमानिता : मानिता म्हणजे मनाने अपेक्षा करणे. ही अपेक्षा दोन प्रकारची असते. पहिलीला संसारिक मानिता असे म्हणतात. धन, विद्या, गुण, बुद्धी, योग्यता, अधिकार यामुळे आपण कुणीतरी श्रेष्ठ आहोत असे समजून मानसन्मानाची अपेक्षा करणे ही झाली संसारिक मानिता. दुसऱ्या प्रकारात पारमार्थिक मानितेचा समावेश होतो. प्रारंभिक साधनाकाळात आपल्यात काही दैवी संपत्ती प्रकट होऊ लागते तेव्हा आपण कुणीतरी विशेष आहोत, असे साधकाला वाटत असते. तसेच इतरजनही हा परमात्म्याकडे जाणारा साधक मानून त्याचा विशेष आदर करतात. साधकाला जरी हे त्याचे वैशिष्ट्या वाटत असले तरी ती त्याच्या साधनेतील उणीव असते. कारण साधनेतून सर्वजण ईश्वरी अवतार असल्याने एकात कमी, एकात जास्त असं काही न दिसता सर्वजण सारखेच दिसावयास हवेत. म्हणून जेव्हा आपल्यातल्या विशेषत्वाचा भाव, मग तो संसारिक मानितेमुळे आलेला असो वा पारमार्थिक मानितेमुळे आलेला असो, नाहीसा होतो तेव्हा साधकाच्या स्वभावात अमानिता हा दैवी संपत्तीचा गुण प्रकट होतो.
साधकाने आत्तापर्यंत सांगितलेले सर्व गुण स्वभावात जागृत करण्याच्या उद्देशाने साधना करत रहावे. करत असलेल्या साधनेचे फल म्हणून त्याच्यातील उणिवा भगवतकृपेने नाहीशा होतील. त्या जसजशा नाहीशी होतील तसतसा साधकाचा उत्साह वाढू लागतो. काही गुण पूर्वसंस्कारानेही जागृत होतात. भगवंत त्याच्याकडून साधना करवून घेतात आणि त्याचा उद्धार करतात. दैवी स्वभावाचे गुण आपल्यात हळूहळू येऊ लागले आहेत, हे साधकाच्या प्रसंगाप्रसंगाने लक्षात येतं पण हे दैवी स्वभावाचे गुण साधकाने स्वत:चे मानू नयेत. कारण ही दैवी संपत्ती असते. ही स्वत:ची मानली की, त्याचा अभिमान वाटू लागतो आणि अभिमान वाटणे हा असुरी संस्कृतीचा प्रमुख गुण आहे. अभिमानामुळे भांडखोर वृत्ती किंवा अतिवाद, दर्प, अज्ञान, रागीटपणा हे असुरी स्वभावाचे गुण उफाळून येतात. त्यांचाही आपण अभ्यास करू.
अभिमान : आपण कुणीतरी विशेष आहोत असे माणसाला वाटू लागले की, त्या विशेषत्वाचा माणसाला मोठेपणा वाटू लागतो, त्याचा त्याला अवास्तव अहंकार होतो. हा दुर्गुण साधकाच्या नाशाला कारणीभूत ठरतो. स्वत:बद्दलच्या खोट्या भावना बाळगल्यामुळे आपल्या ताकदीबाहेरची कामे करण्याची ईर्षा निर्माण होते. परिणामी त्यात अपयश येते व नैराश्य व दु:ख यांना सामोरे जावे लागते.
अतिवाद : मी म्हणतो तेच खरे व बरोबर आहे, असा आग्रह धरून वाद करणे याला अतिवाद म्हणतात.
दर्प : दर्प म्हणजे उन्माद किंवा घमेंड स्वत:बद्दलच्या अवास्तव कल्पना बाळगल्याने माणूस घमेंडी होतो. हा दर्प विद्या, रूप, कुल, धर्म, कर्म, स्वजन, धन, ऐश्वर्य, सत्ता इत्यादीमुळे येत असतो. त्यामुळे मनुष्य उद्धट होतो. त्यातून दुसऱ्याला कमी लेखण्याचा स्वभाव तयार होतो.
अज्ञान : परमार्थात अविवेकाला अज्ञान म्हणतात. अविवेकी माणसाला सत्य-असत्य, सार-असार, कर्तव्य-अकर्तव्य इत्यादींचा बोध होत नाही कारण त्यांचं सर्व लक्ष नाशवंत पदार्थांचा संग्रह आणि भोग याकडेच लागलेलं असतं. त्यासाठी तो फारसा विचार न करता कोणत्याही थराला जाऊ शकतो. स्वत:साठी दु:खाचे डोंगर उभे करतो आणि जन्ममरणाच्या फेऱ्यात अडकतो.