टिळकवाडी येथील अनधिकृत बांधकाम तात्काळ पाडा
माजी नगरसेवक गुंजटकर यांची महापालिकेकडे मागणी
बेळगाव : स्वयंभू गणेश मंदिर टिळकवाडी परिसरात अनधिकृत बांधकाम केले जात आहे. याठिकाणी कॉलम उभारणी करण्यात आली असून यामुळे भविष्यात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे अनधिकृत बांधकाम तात्काळ थांबवावे, अशी मागणी माजी नगरसेवक विनायक गुंजटकर यांनी शुक्रवारी मनपा आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली. सीडीपी आराखड्याप्रमाणे स्वयंभू गणेश मंदिरापासून दुसरे रेल्वे गेटपर्यंतचा रस्ता हा 60 फुटांचा आहे. पहिले रेल्वे गेट येथे बॅरिकेड असल्यामुळे सर्रास वाहतूक दुसरे रेल्वे गेट मार्गे केली जाते. त्यामुळे या परिसरात नेहमीच मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. स्वयंभू मंदिराच्या मागील बाजूला काही दिवसांपासून बांधकाम सुरू करण्यात आले आहे. कॉलम उभारणी करण्यात आली असून पुढील कामही केले जात आहे.
स्वयंभू मंदिरामागील खुल्या जागेचा वापर हा पे अँड पार्किंगसाठी केला जाऊ शकतो. परंतु याठिकाणी दुकान गाळे बांधण्याची योजना असल्याचे दिसून येत आहे. परंतु महापालिकेकडून याबाबत स्पष्टता नसल्याने आयुक्तांनी या बांधकामाची पाहणी करून ते तात्काळ पाडावे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. महापालिका आयुक्त सुवर्णसौध येथील बैठकीला गेले असल्याने ते उपलब्ध झाले नाहीत. परंतु लवकरच आयुक्तांची भेट घेऊन या प्रकल्पाबाबतची संपूर्ण माहिती घेतली जाणार असल्याचे गुंजटकर यांनी सांगितले. निवेदनावर आर. एम. बोकडे, भावेश ताशिलदार, अजित चौगुले, अजय सातेरी, अमित हंगिरगेकर, एन. ए. आमरोळकर, डी. के. सावळे, महेश कणबर्गी यासह इतरांच्या सह्या आहेत.