Shahuwadi News : लग्नाच्या गडबडीतही लोकशाहीला प्राधान्य; वराने लग्नाआधी बजावला मतदानाचा हक्क
लग्नाच्या धावपळीतही नवरदेवाने बजावला मतदानाचा अधिकार
शाहूवाडी : मतदान हा प्रत्येक जागरूक नागरिकाचा पवित्र हक्क व कर्तव्य आहे, तर लग्नसोहळा हा आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा क्षण असतो. या दोन्ही जबाबदाऱ्या समतोलपणे पार पाडत शाहूवाडी तालुक्यातील परळे येथे लोकशाहीप्रती निष्ठा जपणारा एक प्रेरणादायी प्रसंग घडला.
परळे येथील वैभव विलास पाटील यांचा विवाह आज शुक्रवार, 7 फेब्रुवारी रोजी पार पडणार होता. लग्नाच्या दिवशी घरात लगबग, नातेवाईकांची वर्दळ आणि विधींची तयारी सुरू असतानाही वैभव पाटील यांनी मतदानाला प्राधान्य दिले. हळदीच्या कार्यक्रमासाठी काही वेळ उपलब्ध असताना त्यांनी प्रथम मतदान केंद्रावर जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला.
लग्नाच्या महत्त्वाच्या दिवशीही लोकशाही बळकट करण्याचे कर्तव्य पार पाडत त्यांनी समाजासमोर एक सकारात्मक आदर्श ठेवला. “लग्न आयुष्यात एकदाच येते, पण मतदान ही लोकशाही टिकवण्याची सततची जबाबदारी आहे,” अशी भावना यावेळी उपस्थित मतदारांमध्ये व्यक्त होत होती.
या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये विशेषतः तरुणांमध्ये मतदानाबाबत जागरूकता वाढली असून, अनेकांनी वैभव पाटील यांच्या कृतीचे कौतुक केले. अशा प्रेरणादायी उदाहरणांमुळे लोकशाही अधिक सक्षम होत असल्याचे चित्र शाहूवाडी तालुक्यात दिसून येत आहे.