लोकशाही, विचारवंत आणि विरोधक
चार राज्ये आणि एक केंद्रशासित प्रदेश यांच्या विधानसभा निवडणुकांचा परिणाम समोर आला आहे. या निवडणुकांमध्ये सर्वात गाजविण्यात आली ती पश्चिम बंगालची निवडणूक. इतकी, की इतर निवडणुका आहेत की नाहीत, असाच प्रश्न पडावा. या निवडणुकीत कथित ‘विचारवंतां’च्या लाडक्या ममता बॅनर्जी नक्की जिंकणार, असा अपप्रचार प्रचंड प्रमाणात याच विचारवंतांनी केलेला. इतकेच नव्हे, तर त्या जिंकल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कसा ‘समर्थ’ पर्याय मिळणार आहे, याची रसभरीत वर्णनेही याच विचारवंतांनी करुन ठेवलेली. ‘बाजारात तुरी...’ या म्हणीचे प्रत्यंतर इतक्या प्रमाणात कोणत्याच निवडणुकीत आले नसावे. अशा स्थितीत मतगणना झाली आणि भ्रमाचे बरेच भोपळे एकाच वेळी फुटले. ममता बॅनर्जी यांचा दारुण पराभव पाहण्याचे दुर्भाग्य ‘याची देही, याची डोळा’ या कथित विचारवंतांना लाभले. पण त्याचे विशेष नाही. कारण हे दुर्भाग्य गेल्या 12 वर्षांमध्ये या विचारवंतांच्या वाट्याला कितीदा तरी आले आहे. त्यामुळे त्यांनाही त्याची सवय झाली असावी. पण नेहमी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकशाहीचे धडे देणाऱ्या विरोधी पक्षांची लोकशाहीची ‘यत्ता कंची’ आहे, याचाही प्रत्यय त्वरितच आला. निवडणुकीत चारी मुंड्या चीत होऊनही ममता
बॅनर्जी ‘त्यागपत्र’ देण्यास राजी नाहीत. ‘मला हवे तर काढून टाका, पण मी पद सोडणार नाही’ असे त्या निदान गुरुवार दुपारपर्यंत तरी म्हणत होत्या. नैतिक विजय माझाच आहे, असा त्यांचा अद्भूत दावा. प्रचंड पराभवानंतरही जी काही अब्रू उरली सुरली असेल, तीही स्वत:च्या हातानेच नष्ट करुन घरी जायचे, असा त्यांचा निर्धार दिसतो. अशा वर्तणुकीनेच चुकीचे पायंडे पडत जातात आणि लोकशाही धोक्यात येते. लोकशाहीच्या संरक्षणाचे घाऊक कंत्राट कोणी न देता घेतलेले विचारवंत आणि स्वत:ला पुरोगामी म्हणवणारे पक्ष यासंबंधी ‘मूग गिळून’ आहेत. ‘आपला तो बाब्या, दुसऱ्याचं ते कार्ट’ ही म्हणही सार्थ ठरते. मराठी भाषेतल्या अनेक म्हणी पुराव्यानिशी सिद्ध करण्याचा चंगच गेल्या काही दिवसात या विचारवंतांनी बांधलेला दिसतो. हे पुरेसे नाही म्हणून, आता त्यांनी नवीनच टूम काढून सामान्यांची नव्या जोमाने दिशाभूल चालविलीय. भारतीय जनता पक्ष प्रादेशिक पक्षांचा ‘विनाश’ करीत आहे,’ असा या विचारवंतांचा नवा गंमतशीर फंडा आहे. अगदी अग्रलेख लिहून तो लोकांसमोर आणला जात आहे. इतिहासातील घटनांचे चुकीचे अर्थ लावून आणि जनतेची दिशाभूल करण्यासाठी हा ‘नॅरेटिव्ह’ रुजविण्याचा हास्यास्पद प्रयत्न केला जात आहे. त्यांना या निवडणुकांच्या निमित्ताने एवढेच सांगावेसे वाटते, की लोकशाहीत कोणताही पक्ष अन्य कोणत्याही पक्षाचा ‘विनाश’ करु शकत नाही. हे काम लोकशाहीचा ‘प्राण’ असणारा मतदार करत असतो. तसेच जे पक्ष आजवर नाश पावले, ते कोणत्याही अन्य पक्षामुळे नव्हे, तर त्यांच्या स्वत:च्या कर्माने नष्ट झाले आहेत. घराणेशाही, गुंडगिरी, भ्रष्टाचार, विशिष्ट समाजघटकांचे लांगूलचालन (शुद्ध मराठीत चाटूगिरी), मतदारांनाच धमक्या देणे, आदी कारणांनी लोकांनीच त्यांना दूर सारले आहे. जो पर्यंत लोक पाठराखण करतात तो पर्यंत कोणत्याही पक्षाचा नाश होत नाही. तेव्हा आपल्या कथित विचारवंतगिरीची हौस ‘वड्याचे तेल वांग्या’वर (पुन्हा मराठी म्हण) काढून भागविल्याने काही क्षणांपुरते मानसिक समाधान मिळत असेल, पण अनंत काळपर्यंतचे आपलेच हसे होते, हे भानही त्यांना रहात नाही. या निवडणुकांनंतर जे काही घडत आहे, त्यातून केवळ ममता बॅनर्जी यांचा तृणमूल काँग्रेस पक्षच नव्हे, तर इतरही विरोधी पक्षांच्या लोकशाही प्रेमाचे पितळ उघडे पडत आहे. सत्ता दिसू लागली, की पाच पाच दशकांपासून मित्रपक्षाशी असलेली युती कशी एका रात्रीत तोडली जाते आणि नवी हातमिळवणी कशी केली जाते, याचे उदाहरण तामिळनाडूत दिसत आहे. ही लोकशाहीची महान सेवा आहे, असे विचारवंतांचे म्हणणे असेल, तर लोकशाहीची व्याख्या बदलणे भाग आहे. विचारवंत तेही करतील, कारण ‘सारे काही आपल्यालाच कळते’ ही त्यांची स्वत:संबंधीची अंधश्रद्धा आहे. या निवडणुकांनी जसा अनेक राजकीय पक्ष आणि त्यांचे नेते यांना दणका दिला आहे, तसा अनेक विचारवंती अंधश्रद्धांनाही सुरुंग लावला आहे. आत्मपरीक्षण करण्याऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचा पक्ष कसे लोकशाहीच्या ‘नरड्याला नख’ लावत आहेत, याच्या बनावट कहाण्या तिखट-मीठ लावून आणि ‘बेंबीच्या देठापासून’ ओरडून सांगून स्वत:ची वैचारीक दिवाळखोरी सिद्ध करणारे हे विचारवंत आणि त्यांच्याशी मैत्र असलेले राजकीय पक्ष जनतेच्या मनातून आणखी उतरतील, यात काय संशय? पूर्वीच्या अनुभवांवरुन जो शिकतो आणि सुधारतो, तो खरा विचारवंत. पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्षाने 2021 च्या विधानसभा निवडणुकीत ज्या त्रुटी राहिल्या होत्या, त्या शांत डोक्याने या निवडणुकीत दूर केल्या. त्यामुळे यशाची प्राप्ती झाली. याच्या उलट ममता बॅनर्जी यांनी केले. त्यामुळे त्यांची गच्छंती झाली.